रवींद्रनाथ टागोरांना जाऊन ७९ वर्ष झाली. वयाच्या८०व्या वर्षी, १९४१ साली रवींद्रनाथ टागोरांनी अखेरचा श्वास घेतला पण इतकी वर्ष उलटल्यानंतरही त्यांची लेखणी जुनी किंवा कालबाह्य वाटत नाही. आजही त्यांच्या कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं अगदी आपली वाटतात, त्यातील व्यक्तिरेखा अगदी आजच्या काळातील वाटाव्यात किंवा आजच्या काळापेक्षाही पुढारलेल्या वाटाव्या अशा असतात. फक्त भारतातच नव्हे तर सबंध आशिया खंडात साहित्यातील नोबेल पारितोषिक पटकवणारे ते पहिलेच.
टागोर आपल्याला सगळ्यांनाच पहिल्यांदा भेटतात ते ‘जन गण मन’ मधून. त्यानंतर हळू हळू ते आपल्याला ‘छुट्टी’ (दी होमकमिंग) मधल्या फटीकच्या खोड्यांमधून, तर कधी ‘काबूलीवाल्या’ मार्फत ते आपल्याला शालेय जीवनात भेटले नंतर शांतिनिकेतन सारखी शाळा आपलीही असावी अशी स्वप्न त्यांनी आपल्या मनात पेरली. मग महाविद्यालयीन जीवनात ‘भयशून्य चित्त जेथे’ आणि ‘एकला चलो रे’ म्हणत आपल्याला जीवनाचे धडे ते देतात आणि मग टागोर या महान लेखकाबद्दल कुतूहुल निर्माण होतं आणि अशाप्रकारे टागोरांच्या इतर कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, लेखांच्या सागरातून आपल्या छोट्याशा अवकाशात शक्य तितके शिंपले सामावण्याची धडपड सुरू होते आणि ही धडपड दर वेळीच तुम्हाला काहीतरी नवीन देऊन जाते, आणि म्हणूनचं कदाचित ही धडपड अजूनही सुरू आहे.
टागोरांच्या कथा १९ आणि २०व्या शतकातील फाळणी पूर्वीच्या बंगाल मधल्या खेड्यापाड्यात, उपनगरांत वसलेल्या. बंगाली संस्कृती, रुढी, परंपरा, तिथली साधारण माणसं, त्यांची सामाजिक परिस्थिती, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या इच्छा, त्यांच्यावरील बंधने आणि शोषण हे सारं गुरुदेव त्यांच्या लेखणीतून अगदी सहज पण तितक्याच ताकदीने आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. गुरुदेवांच्यालेखणीतून अवतरलेल्या या प्रचंड साहित्यात मला कायमचं एक गोष्ट खुणावत आली आहे. ती म्हणजे त्यांच्या साहित्यातील स्त्री. टागोर वाचताना, एक पुरुष स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचं, तिच्या वागण्या बोलण्याचं, इतकंच नव्हे तर तिच्या मनाचं, तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, तिचं भावविश्व या साऱ्याचं इतकं सुंदर सखोल वर्णन करू शकतो याचं सतत आपल्याला आश्चर्य वाटत राहतं. स्त्रीची ममता, तिचा त्याग, तिचं शोषण, प्रथा परंपरांमध्ये होणारी तिची घुसमट, या साऱ्या प्रथांना मनोमन प्रश्न विचारणारी स्त्री, छोट्या छोट्या प्रथा झुगारणारी स्त्री, तर आपल्या आचरणातून समाजाच्या थेट विरोधात उभी राहिलेली स्त्री या सर्व आपल्याला त्यांच्या साहित्यात भेटतात. त्यांच्या लेखणीतल्या या पुढारलेल्या स्त्रियांनी तत्कालीन पुरोगामी भारतीय मनांना नवं क्षितिज, नवा दृष्टीकोन दिला.
‘बहू रहने दो चुल्हा चोका’ किंवा ‘शृंगार को रहने दो’ या गुलजारांनी अनुवादीत केलेल्या कविता ऐकताना टागोरांचं स्त्री जीवनातील बारीक निरीक्षण दिसून येते. पतीला शरीर सुख देणं हेच कसं स्त्रीचं आद्य कर्तव्य मानलं जायचं, यावर त्यांनी सहज बोट ठेवले आहे. तर दुसरीकडे मृत्यूच्या दारात असणारा आणि पत्नीसोबत प्रेमाचे काही क्षण घालवता यावे अशी इच्छा असणारा जतीन, पण संसारात आणि आजारी नवऱ्यात काही एक स्वारस्य नसणारी त्याची बायको मणी पण या सगळ्यात जतीनची माशी (मावशी) जतीनची काळजी घेते, जतीनला मणीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं सांगून खूष ठेवते. स्वतःचं घर जतीनच्या नावावर करते आणि जाताना तो ते मणिच्या नावावर करतो तरी राग न मानता त्याचं सगळं ती करत असते. स्वतःला विसरून समोरच्यावर प्रेम करणारी, आपल्या माणसासाठी सर्वस्व अर्पण करणारी मायाळू स्त्री आपल्याला ‘माशी’ या कथेत दिसते. ‘फ्रुट गॅदरिंग’ या त्यांच्या काव्यसंग्रहात, एका कवितेत जिथे धनवान सुद्धा गरिबांची भूक भागवताना हात आखडता घेतात, तिथे सुप्रिया ही गरीब स्त्री मी गरिबांची भूक शमवेन असं देवाला सांगते. स्वतःपेक्षा इतरांच्या सुखाचा विचार करणारी, इतरांची दुःख समजून घेणारी आणि त्याविरोधात लढायला पदर खोचून उभी राहणारी स्त्री आपल्याला इथे दिसते.
बिंदूची फरफट पाहू न शकणारी, ‘स्त्रीर पत्र’ किंवा ‘स्त्रीची पत्रं’ मधील मृणाल. एकीकडे पितृसत्ताक रूढींना आपलंसं करून जगणारी मृणालची जाऊ तर दुसरीकडे याच पितृसत्ताक समाजाच्या जाचक बंधनांना कंटाळून आत्महत्या करणारी बिंदू, या दोघींना मृणाल पाहत असते. स्त्रियांना या जगात काय किंमत आहे हे मृणालला बिंदूकडे पाहून कळतं. त्यामुळे मृणाल एकटी घर सोडून बाहेर पडते आणि आपल्या वैवाहिक आयुष्याकडे स्त्री म्हणून तटस्थपणे पाहात नवऱ्याला पत्र लिहिते. स्त्रियांना सन्मानाने जगता यावे हेच या कथेतून गुरुदेव सांगत आहेत. समाजाची बंधनं झुगारून सुखाच्या शोधात निघालेली नंदिनी, खाण कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणारी ही ‘रक्तकरबी’ मधील इतरांच्या सबमनासाठी झटणारी एक प्रेरणादायी स्त्री.
टागोर त्यांच्या ‘राईदास’ या कवितेत चित्तोडची राजकन्या एका सफाईकर्मचाऱ्या सोबत लग्न करते आणि भटजींना ही गाठ खुद्द ईश्वराने बांधली आहे असं सुनावते. आजच्या काळातही जिथे प्रेमाला जातीपातीच्या बंधनात तोललं जातं, अनेक मुलींना स्वतःचं जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाहीये पण टागोर जवळ जवळ १०० वर्ष आधी ही कविता लिहितात. तरुण विधवांची स्वप्नं, प्रेम, शरीरसुख याबाबत आपण आजही उघड उघड बोलायला कचरतो पण १०० वर्षांपूर्वी टागोरांनी ‘चोखेर बाली’च्या माध्यमातून बिनोदिनी या तरुण विधवेचे प्रेमकहाणी ते आपल्याला सांगतात.
आजही अनेक मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न स्वप्नचं राहतं, पण टागोरांच्या नायिका त्याही काळात स्वतःचे विचार मांडायच्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहायच्या. ‘घर बैरे’ मधील एक आज्ञाधारक आणि समंजस गृहिणी असलेल्या बिमलाचा, घरातील ओटी पडवी मध्ये येऊन आत्मविश्वासाने पुरुषांशी संवाद साधणं हा प्रवास टागोर बिमलाच्या मनाचे कंगोरे उलगडत आपल्याला घडवतात तर परस्त्रीच्या नादी लागलेला आपला नवरा सोडून जातो, तेव्हा त्याला तिजोरीच्या चाव्या द्यायला ठाम नकार देते आणि खचून न जाता स्वतःच्या पायावर उभी राहते , ते सुद्धा चक्क नाटकात काम करून! ही ‘गिरीबाला’ची कथा, गिरीबाला त्या काळात २१व्या शतकातील स्त्रियांचं प्रतिनिधित्व करत होती असंच वाटतं. या पलीकडे जेव्हा आपल्या कवितेत ते स्त्रीला, तू अर्धी स्त्री आहेस आणि अर्ध स्वप्न आहेस असं म्हणतात तेव्हा प्रत्येक स्त्री त्या कवितेशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही.
या सगळ्या स्त्रीया जणू आपल्या आजूबाजूच्या आहेत इतक्या खऱ्या आणि आपल्याशा वाटतात. माझ्यातील स्त्री मनावर संस्कार करतात. माशी, मणी, सुप्रिया, मृणाल, बिंदू, नंदिनी, राईदासशी लग्न करणारी राणी, बिनोदिनी, बिमला, गिरीमाला या आणि अशा बऱ्याच नायिका, केवळ टागोरांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा नाहीत. त्या काळाच्या पटलावर त्यांच्यासारख्या अनेक स्त्रियांचं, तुमच्या माझ्या सारख्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करत उभ्या आहेत. सामाजिक चाली रितींना बळी पडलेल्या, शोषणाच्या बळी झालेल्या, समाजाविरुद्ध जाऊन काहीतरी करू पाहणाऱ्या, अन्याया विरुद्ध आवाज उठवणाऱ्या, स्वतःची ओळख निर्माण करू पाहणाऱ्या, सगळ्या स्त्रियांचा त्या आवाज आहेत. येणाऱ्या पिढीतील स्त्रियांचं सुद्धा त्या प्रतिनिधित्व करतील, त्यांना प्रेरणा देतील, त्यांचा आवाज होतील… कारण गुरुदेव होतेच काळाच्या पुढचे!
– रसिका कुळकर्णी