अयोध्येत होणा-या राममंदिरानं (Ram Mandir) अवघा देश राममय झाला आहे. सर्वत्र श्रीरामांच्या नामाचा महिमा आहे. सर्व रामभक्तांना 22 जानेवारीची प्रतीक्षा आहे. या दिवशी भव्य अशा मंदिरात प्रभू श्रीरामांची मुर्ती विराजमान करण्यात येणार आहे. तमाम भारतीयांसाठी हा दिवस खास ठरणार आहेत. प्रभू रामांच्या या मंदिराची किर्ती चारीदिशांना होत असतांना आपल्या शेजारच्या देशातून, म्हणजेच पाकिस्तानमधूनही एका राममंदिराची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्येही एक राममंदिर आहे.
या रामंदिराची उभारणी एका राजपूत राजानं केली होती. फाळणीपूर्वी या सर्व भागात हिंदूची वस्ती मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्यासाठी हे राममंदिर (Ram Mandir) मोठे पवित्र स्थान होते. अतिशय संपन्न अशा या मंदिराची दुर्दशा फाळणी झाल्यावर झाली. फाळणी झाली आणि या मंदिरातील प्रभू श्री रामांची पूजा करण्यावरही बंदी घालण्यात आली. कधीकाळी हिंदू नागरिकांनी गजबजलेल्या या भागात आता काही हातावर मोजण्याइतकी हिंदू कुटुंबे राहत आहेत. अयोध्येतील राममंदिराची उभारणी सुरु झाल्यापासून इस्लामाबादमधील हे राममंदिरही नव्यानं चर्चेत आलं आहे. या मंदिराची दुरुस्ती करुन तिथे पुन्हा प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची पुजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी आता तेथील हिंदू कुटुंबे प्रयत्न करीत आहेत.
पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या सय्यदपूर गावातील प्रभू श्रीरामांचे मंदिर (Ram Mandir) आता चर्चेत आले आहे. 16 व्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या परिसरात प्रभू श्रीराम वनवासात असतांना काही काळ राहिले असल्याची माहिती स्थानिक देतात. त्यामुळेच एका राजपूत राजाने या स्थानाचे महत्त्व जपण्यासाठी येथे प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे भव्य मंदिर उभारल्याचे सांगण्यात येते.
पाकिस्तानमधील हे एकमेव राममंदिर आहे. या राममंदिराला, राम कुंड मंदिर म्हणूनही ओळखले जाते. प्रभू श्रीरामांनी आपल्या वनवासातील काही काळ या भागात व्यतित केल्याची धारणा आहे. त्यामुळे श्रद्धेनं 16 व्या शतकात मानसिंग प्रथम याने हे मंदिर बांधले. हे मंदिर राजा मानसिंग यांनी अतिशय भव्य उभारले होते. तेव्हा इस्लामाबादच्या आसपास अनेक हिंदू कुटुंब राहत होती. त्यामुळेच या परिसरात अनेक मोठी मंदिरे होती. फाळणीपूर्वी ही सर्व मंदिरे भव्यतेसाठी ओळखली जात होती. मात्र, फाळणीनंतर या सर्व मंदिरांना लुटण्यात आले. काहींना पाडण्यात आले. त्यातही प्रभू श्रीरामांचे मंदिर (Ram Mandir) पूर्णपणे मोकळे करण्यात आले. एकेकाळी संपन्न असणारे मंदिर भग्नावस्थेत बदलले.
इस्लामाबादच्या कायद-ए-आझम विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फाळणीनंतर या भागातील सर्वच मंदिरांची देखभाल बंदी करण्यात आली. 1950 च्या लियाकत-नेहरू करारात ही सर्व मंदिरे रिफ्युजी प्रॉपर्टी ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, सय्यदपूर गाव आणि तिथले राम मंदिर (Ram Mandir) परिसर अजूनही इस्लामाबादच्या राजधानी विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आहे. या भागात हिंदू कुटुंबे आहेत. त्यांच्यासाठी हे राममंदिर मोठे श्रद्धेचे स्थान आहे. त्यांनी सरकारकडे केलेल्या वारंवार मागणीमुळे 2016 मध्ये या मंदिराचा परिसर नूतनीकरण करून हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात आला.
याच सय्यदपूर गावात राम मंदिरासोबत गुरुद्वारा आणि धर्मशाळाही होती. या गावात दरवर्षी सुमारे आठ हजार भाविक येत असत. फाळणीनंतर बहुतांश हिंदू भारतात गेले. यानंतर सय्यदपूर गाव आणि राम मंदिर परिसर शत्रू मालमत्ता म्हणून सील करण्यात आली होती. सद्यस्थितीत इस्लामाबादमध्ये सुमारे 300 हिंदू कुटुंब आहेत. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गावाभोवती अतिशय पुरातन गुहाही सापडल्या आहेत. शिवाय या गावात प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या नावाने तलावही होते. आता देखभाली अभावी हे तलाव बुजले आहेत आणि त्यांची नावेही बदलण्यात आली आहेत.
इस्लामाबादच्या राजधानी विकास प्राधिकरणाने 2008 मध्ये सय्यदपूरच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि त्याला ‘हेरिटेज व्हिलेज‘ हा दर्जा देण्यात आला. पुनर्बांधणीदरम्यान राम मंदिर (Ram Mandir) परिसराला रंगरंगोटीही करण्यात आली. पण या मंदिरातून मूर्ती काढून घेण्यात आल्या. मुर्ती नसलेल्या या मंदिराचा दरवाजा कायम भक्तांसाठी उघडा असतो. पण येथे आता पुजा करण्यासाठीही बंदी आहे. या राममंदिर संकुलात 1960 मध्ये मुलींची शाळा सुरु करण्यात आली. त्याला येथील हिंदू समाजातर्फे झालेल्या प्रदीर्घ विरोधानंतर शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली. 2006 मध्ये मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. तरीही हिंदूंना पूजा करण्याची परवानगी मात्र नाही.
================
हे देखील वाचा : दुबई, अमेरिकेसह ‘या’ देशांमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणी हे आहेत कायदे
================
पख्तुनख्वा ते थारपारकरपर्यंतच्या चाळीस मंदिरांवर ‘हिस्टोरिक टेंपल्स इन पाकिस्तान- अ कॉल टू कॉन्शियनेस‘ हे पुस्तक लिहिणाऱ्या पाकिस्तानी लेखिका रीमा अब्बास यांच्या मते, पाकिस्तानमधील मंदिरे सरकारने जाणूनबुजून ताब्यात घेतली आहेत. राम मंदिराशिवाय (Ram Mandir) पाकिस्तानातील कराचीमध्ये रामभक्त हनुमानाचे मंदिरही आहे. या मंदिरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. 1882 मध्ये मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. या मंदिरात हिंदू भाविकांची गर्दी असते. सतीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक असलेले हिंगलाज भवानीचे मंदिर बलुचिस्तानपासून 120 किलोमीटर अंतरावर हिंगोल नदीच्या काठावर आहे. येथे सतीचे मस्तक पडले होते असे मानले जाते. भारतासह अनेक देशांतून भाविक येथे येतात. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराची महिमा जगभर होत असताना पाकिस्तानमधील प्रभू श्री रामांच्या मंदिराचीही माहिती चर्चीली जात आहे.
सई बने