प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने ओळखली जाते. एकादशी ही विष्णूची अत्यंत प्रिय तिथी असल्याची मान्यता आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंनी आणि विष्णुभक्तांनी एकादशी हे व्रत केलेच पाहिजे असे सांगितले जाते. मात्र काही जणं वर्षात येणाऱ्या महत्वाच्या आणि प्रसिद्ध असणाऱ्या एकादशी करतात. यात आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, पुत्रदा एकादशी आदींचा समावेश आहे. प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे महत्व आहे. उद्या १६ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिचे महत्व, व्रत, आणि कथा जाणून घेऊया.
एकादशी तिथी एका महिन्यात दोनदा येते. एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात. उद्या शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी येणार आहे. हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे. श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते हे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते.
हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिली पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. तर दुसरी पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. श्रावण महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे हे व्रत विशेष आहे. ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे.
पुत्रदा एकादशीची तिथी १६ ऑगस्टला असणार आहे. एकादशीची तिथी १५ ऑगस्टला सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल तर १६ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार या एकादशीचे व्रत १६ ऑगस्टला पाळले जाईल. १७ ऑगस्टला सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून ते ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत उपवास सोडू शकता.
मान्यता आहे की हे व्रत केल्यास भगवान विष्णूच्या कृपेने उत्तम अपत्य प्राप्त होते. या एकादशीचे व्रत पाळल्याने घर धन-धान्यांनी भरलेले राहाते. तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्र प्राप्तिसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते. याशिवाय ज्या व्यक्तीला धन, संतती, स्वर्ग, मोक्ष, सर्व काही मिळवायचे आहे, त्यांनी हे व्रत पाळावे. दुसरीकडे, ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करणे चांगले आहे.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दैनंदिन कार्य करून शुचिर्भूत व्हावे. देवाजवळ आधी दिवा लावावा. भगवान विष्णूंना गंगाजलाने आणि दुधाने अभिषेक करावा. भगवान विष्णूला फुल आणि तुळशीची पाने अर्पण करा. देवाची आरती करावी. देवाला नैवेद्य अर्पण करा. तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्न ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. या शुभ दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करा. या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे.
एकादशीला भगवान विष्णूचे स्मरण करून नदी, तलावात दीपदान करावे. शक्य नसल्यास तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने देखील लाभ मिळतो. दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे दिवे बनवून त्यात थोडे तेल किंवा तूप टाकले जाते, कापसाची पातळ वात पेटवली जाते, ती पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत दिवा सोडावा.
एकादशीला दिवसभर उपवास ठेवा म्हणजे अन्न खाऊ नका. फळे, फळांचे रस आणि दूध यांचे सेवन करता येते. सकाळ संध्याकाळ विष्णुपूजेत ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. एकादशीनंतर म्हणजेच द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून श्रीविष्णूची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावे. त्यानंतर स्वतः जेवण करावे. अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते.
पुत्रदा एकादशी कथा
युद्धिष्ठर म्हणाला हे परमेश्वरा! एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली. आता मी विनंती करतो की, पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते. त्याची विधी काय याबद्दल सांगावे.
श्रीकृष्ण म्हणाले हे राजन! श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या दिनी विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते. तसेच तो विद्वान आणि धनवान होतो. हे व्रत का केले जाते जाणून घेऊया
भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होतो. त्याला संतान प्राप्ती नव्हती. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते. तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दु:खी असायची. राजाकडे अफाट संपत्ती होती. धन, हत्ती, घोडे, धान्य सगळं होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते.
मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा. मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा. आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे. त्यासाठी काही तरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत. याविचारात राजा नेहमीच असायचा.
राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला. परंतु, आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा-फुलाना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्तसंचार करत होते. हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावाधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता- ‘मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राम्हण देवताला भोजन करून तृप्त केले तरी ही माझ्या वाट्याला दु:खच का आले असावे?’
विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे-तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहुबाजुंनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला.
राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे, तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पुर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र, धनप्राप्ती होत असते.
=======
हे देखील वाचा : जाणून घ्या नागपंचमीचे महत्व, पूजाविधी आणि कथा
=======
राजाला पाहाताच ऋषीचे म्हटले – ‘हे राजन! आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले. महाराज आपण कोण आहात, येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय?
ऋषीमुनींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहे. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ‘ऋषीदेवता मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या.’
ऋषीमुनी म्हणाले -‘हे राजन! आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला.