Home » Alaska : पुतिन-ट्रम्प भेटीसाठी अलास्कालाच का निवडले ?

Alaska : पुतिन-ट्रम्प भेटीसाठी अलास्कालाच का निवडले ?

by Team Gajawaja
0 comment
Alaska
Share

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांची 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेट होत आहे. या भेटीमध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर साडेतीन वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध संपुष्ठात येण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच या भेटीबाबत शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. पुतिन यांनी ही भेट जाहीर झाल्याबरोबर युक्रेनमधील भागावर आपला कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन अलास्कामधील वाटाघाटीमध्ये युद्ध थांबवले तर हा सर्व भागावर रशियाचा ताबा मान्य करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ही भेट जाहीर झाल्याबरोबर युक्रेन आपल्या देशातील एक इंचही जागा दुस-या देशाला देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. यासोबत या भेटीपूर्वी एक प्रश्नही विचारला जात आहे, तो म्हणजे, पुतिन आणि ट्रम्प हे अलास्कामध्येच का भेटणार आहेत. हे दोन्ही नेते पहिल्यांदाच अमेरिकन भूमीवर भेटत आहेत. रशियाने यापूर्वी या भेटीसाठी यूएईची शिफारस केली होती. (Alaska)

मात्र ट्रम्प यांनी बैठकीसाठी अलास्काची निवड केली. त्यामागे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची म्हणजेच आयसीसीची पुतिन यांच्यावर असलेली अटकेची तलवार आहे. युक्रेन युद्धासाठी आयसीसीनं पुतिन यांच्यावर अटकेचा वॉरंट जाहीर केलेले आहे. यापासून पुतिन यांचे संरक्षण करण्यासाठी अलास्काची निवड झाली आहे. एकेकाळी ज्या अलास्कावर रशियाची सत्ता होती, तेच अलास्का आता अमेरिकेचा खजिना म्हणून उल्लेख केला जातो. 15 ऑगस्ट रोजी होणा-या या बैठकीमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पुतिन यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. या दोन देशांमध्ये ट्रम्प खरोखरच शांतता आणतात की त्यांच्यामधील युद्धाला अधिक भडकवतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादेमिर पुतिन अलास्का या अमेरिकेच्या राज्यात 15 ऑगस्ट रोजी भेटणार आहेत. हे दोन्ही नेते अमेरिकन भूमीवर भेटण्याची ही पहिलीच आहे. (International News)

ही शिखर परिषद अमेरिका-रशिया संबंधांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच यातून रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठीही निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. मात्र ही संभाव्य भेट होण्याआधीच युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कारण या संभाव्य भेटीमध्ये जो करार होईल, त्यात काही जमिनीची देवाणघेवाण देखील समाविष्ट असेल, हे आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले. त्यामुळे नाराज झालेल्या झेलेन्स्की यांनी, प्रादेशिक मुद्द्यांवर युक्रेन आपल्या संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. युक्रेनचे नागरिक त्यांची जमीन कोणालाही देणार नाहीत, असे सांगून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यामुळे या भेटीमध्ये काही करार झालाच तर तो किती सर्वमान्य असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Alaska)

यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा अलास्काबाबत आहे. या बैठकीसाठी अलास्काची निवड का करण्यात आली, हे जाणण्यासारखे आहे. पुतिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने युक्रेन युद्धामुळे रशियन राष्ट्राध्यक्षांना अटक वॉरंट जारी केले आहे. म्हणजेच पुतिन जर आयसीसी सदस्य देशांच्या हद्दीत गेले तर त्यांना ताब्यात घेण्यास ते देश बांधील असतील. अमेरिका आयसीसीचा सदस्य नाही त्यामुळे पुतिन यांना अटक करण्याचे कायदेशीर बंधन रहाणार नाही. याशिवाय अलास्काच्या भौगोलिक स्थानामुळे देखील ही निवड करण्यात आली आहे. अलास्का रशियापासून फक्त 88 किलोमीटर अंतरावर आहे. (International News)

अलास्कापासून जवळचे रशियन लष्करी तळ सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रदेशात काही रशियन हवाई दलाचे तळ आणि लष्करी देखरेख केंद्रे आहेत. तसेच येथे रशियन अण्वस्त्रे देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे अलास्का हे स्थान पुतिन यांच्यासाठी सर्वात सोयीचे ठरणार आहे. अलास्काचे रशियाशी असलेले संबंध दोन शतकांहून अधिक जुने आहेत. रशियन साम्राज्याने 18 व्या शतकात या प्रदेशाचे काही भाग शोधून काढले आणि नंतर त्यावर निर्माण कार्य सुरु केले. एकेकाळी याच अलास्काला रशियाचे स्वर्ग म्हटले जात असे पण आता हे राज्य अमेरिकेचा खजिना म्हणून ओळखले जाते. रशियाच्या ताब्यात असलेले अलास्का 30 मार्च 1867 रोजी 7.2 डॉलर्सना अमेरिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. (Alaska)

या करारामुळे उत्तर अमेरिकेतील रशियाची 125 वर्षांची मक्तेदारी संपली. अलास्का विकण्याचा विचार रशियाचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर मिखाइलोविच गोर्चाकोव्ह यांच्या मनात आला. तेव्हा अँड्र्यू जॉन्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. गोर्चाकोव्ह यांनी हा प्रस्ताव रशियन झार अलेक्झांडर दुसरा यांच्यासमोर ठेवला, जो त्यांनी स्वीकारला. रशियातील नागरिकांनी या विक्रीला मोठा विरोध केला. पण झारने अलास्का विकण्यासाठी कागदपत्रावर स्वाक्षरी केली. अलास्का विकण्यामागे अनेक कारणे होती. त्यावेळी रशियाला अमेरिका आपल्यावर ब्रिटनच्या मदतीनं हल्ला करणार अशी धास्ती होती. अलास्का इतका मोठा प्रदेश होता की तेथे मोठ्या संख्येने सैनिक तैनात करणे रशियाला कठीण वाटत होते. त्यामुळे अलास्काचा ताबा अमेरिकेकडे देण्यात आला. मात्र अजूनही रशियाला या कराराबद्दल पश्चात्ताप आहे. 2014 मध्ये जेव्हा रशियाने क्रिमिया ताब्यात घेतले तेव्हाच अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक दिवस अमेरिकेकडून अलास्का परत घेतील, अशा घोषणाही दिल्या गेल्या. (International News)

याच अलास्कामध्ये आता पुतिन आणि ट्रम्प यांची युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी बैठक होत आहे. अलास्काचा सर्वच प्रदेश नैसर्गिक संपत्तीमुळे ओळखला जातो. येथे तेल, सोने, हिरे यासारख्या खनिज संपत्तीचे प्रचंड साठे आहेत. या भागाचा अमेरिकेने पूर्व आशियाशी व्यापारासाठी संभाव्य प्रवेशद्वार म्हणून त्याचा वापर केला. या प्रदेशातून वर्षानुवर्षे मोठी संपत्ती अमेरिकेला मिळाली. त्यात व्हेल तेल, तांबे, सोने, लाकूड, मासे, प्लॅटिनम, जस्त, शिसे आणि पेट्रोलियम यांचा समावेश होता. आजही अलास्कामध्ये मुबलक तेलाचे साठे आहेत. 15ऑगस्ट रोजी अलास्काच्या कुठल्या शहरात या दोन नेत्यांची बैठक होणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या बैठकीत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की उपस्थित राहतील की नाही, याबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली आहे. (Alaska)

===============

हे देखील वाचा : Six Triple Eight : दुसऱ्या महायुद्धात इतिहास रचणाऱ्या 6888 महिला बटालियन…

===============

शिवाय झेलेन्स्की उपस्थित राहिले तर पुतिनची भूमिका काय असेल, याबाबतही कुठलिही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. झेलेन्स्की या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही आहेत. कारण या बैठकीची घोषणा झाल्याबरोबर रशियन सैन्याने संपूर्ण पूर्व युक्रेन ताब्यात घेण्याचे मिशन सुरू केले आहे. अलिकडेच पुतिन यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात त्यांनी डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया आणि खेरसन या प्रदेशावर रशियाचा ताबा असल्याचे जाहीर केले होते. अर्थात झेलेन्स्की यांनी याचा विरोध केला. त्यामुळेच 15 ऑगस्ट रोजीच्या बैठकीमध्ये युक्रेनला तोडण्याचा करार होणार असल्याची भीती झेलेन्स्की व्यक्त करीत आहेत. पण या सर्वात पुतिन हे शांत आहेत. त्यांच्या या शांततेमुळेच अलास्का भेटीबाबत जगाची उत्सुकता वाढली आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.