ब्रिटनच्या राजघराण्यात सध्या नवं वादळ आलं आहे. या वादळाचं नाव आहे, 16 व्या शतकातील फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्राडेमस. नॉस्टाडेमसनं 16 व्या शतकात केलेल्या त्याच्या भविष्यवाणींमध्ये ब्रिटीश घराण्याबाबत अनेक भविष्ये वर्तविली होती आणि ती खरीही ठरली आहेत. अगदी राणी एलिझाबेथ द्वितीयची कारर्कीद आणि तिचा होणारा मृत्युही.(Prince Harry)
यानंतर नॉस्टाडेमसनं आपल्या भविष्यवाणीत ब्रिटन राजघराण्याच्या भावी राज्याबद्दलही भाष्य केलं होतं. त्याच्या मते वयोवृद्ध राजा होईल आणि तो लवकरच राजीनामा देईल. त्याच्याजागी सर्वांची नापसंती असलेला व्यक्ती राजा होईल, असे नॉस्टाडेमसनं सांगितले आहे. काही दिवसापूर्वीच राजा चार्ल्स यांना कॅन्सर झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासोबत वडिलांच्या बिघडलेल्या तब्बेतेमुळे त्यांच्यापासून दुरावलेला प्रिन्स हॅरीही राजवाड्यात हजर झाला आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचा पुढचा वारस हा प्रिन्स हॅरीच असेल असे नॉस्टाडेमसनं आपल्या भविष्यवाणीत लिहून ठेवलं आहे. त्यामुळेच इंग्लडमध्ये आपला भावी प्रिन्स हॅरी असेल का याची चर्चा होत आहे. घटस्फोटीत, अमेरिकन अभिनेत्री मेघन हिच्याबरोबर लग्न झालेला प्रिन्स हॅरी ब्रिटीश राजघराण्यापासून दूर झाला आहे. अमेरिकेत रहात असलेला हा प्रिन्स हॅरी आता वडिलांच्या तब्बेतीची बातमी ऐकून इंग्लडमध्ये परतला आहे. त्यामुळे राजा चार्ल्स त्यालाच भावी राजा घोषित करणार की काय, अशी चर्चा इंग्लडच्या सोशल मिडियामध्ये होत आहे.(Prince Harry)
ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कर्करोग झाल्याचे बकिंगहॅम पॅलेसच्या डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. 75 वर्षांचे चार्ल्स हे वर्षभरापूर्वी ब्रिटनचे राजे झाले. आधीच राजा चार्ल्सबद्दल ब्रिटनच्या जनमानसात राग आहे. प्रिन्सेस डायनाचे चाहते, राजा चार्ल्स यांना कायम विरोध करत आहेत. त्यातच राजा चार्ल्स यांना कर्करोग झाल्याची बातमी आली. शिवाय वय आणि आजार यामुळे राजा चार्ल्स हे आपल्या पदाचा त्याग करुन नवा राजा नियुक्त करणार असल्याचीही बातमी चर्चेत आहे. याबातमीसोबत नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी प्रसिद्धीझोतात आली आहे. सोळाव्या शतकात या नॉस्टाडेमसनं 2024 मध्ये राजा चार्ल्सच्या जागी नवा राजा येईल, असे भविष्य सांगितले होते.
2022 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय च्या मृत्यूनंतर, प्रिन्स चार्ल्स वयाच्या 74 व्या वर्षी ब्रिटनचे राजे झाले. त्यांच्या पुढच्या कारकिर्दीबाबत नॉस्ट्रॅडॅमसने अनेक भाकिते केली आहेत. ‘नॉस्ट्रॅडॅमस : द कम्प्लीट प्रोफेसीज फॉर द फ्युचर’ या पुस्तकामध्ये नॉस्ट्रॅडॅमसच्या अशा भविष्यांचा समावेश आहे. ब्रिटिश लेखक मारियो रीडिंग यांनी काव्यस्वरुपात असलेल्या नॉस्ट्रेडॅमेसच्या भविष्यांना डिकोड करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकानुसार, एक माणूस ज्याला अपात्र मानले जात होते. लोक राजाला सत्तेतून काढून टाकतील. एक माणूस त्याची जागा घेईल ज्याने कधीही राजा होण्याची अपेक्षा केली नाही. असे लिहिण्यात आले आहे. यात ज्याला कधीही राजा होण्याची अपेक्षा नाही, अशी व्यक्ती म्हणजे, प्रिन्स हॅरी (Prince Harry) असल्याचे मत मारियो रीडिंग यांचे आहे.
दरम्यान, राजा चार्ल्सचा मुलगा प्रिन्स हॅरी (Prince Harry) वडिलांना कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर लंडनला परतला आहे. हॅरी त्याची पत्नी मेघन आणि मुलांसह कॅलिफोर्नियामध्ये राहतो. प्रिन्स हॅरीनं राजघराण्याचा त्याग केला आहे. त्याची पत्नी मेघनमुळे राजघराण्यात आणि त्याच्यात दरी निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. मेघन ही घटस्पोटीत आहे, शिवाय तिचा वर्णही या दुराव्यासाठी कारणीभूत असल्याचे मत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ब्रिटीश राजघराण्याच्या सिंहासनाचा वारसदार म्हणून प्रिन्स हॅरीचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम याच्याकडे बघितले जात आहे. त्याची पत्नी राजकुमारी कैथरीन, सोबत प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस शार्लोट, प्रिन्स लुईस या त्याच्या तीन मुलांनाही ब्रिटनच्या सिंहासनाचे वारसदार मानण्यात येते.
=============
हे देखील वाचा : भारताच्या स्कॉटलंडला पाहिलंत का ?
=============
या यादीपासून सध्यातरी प्रिन्स हॅरी खूप दूर आहे. प्रिन्स हॅरीने (Prince Harry) लिहिलेल्या पुस्तकात राजघराण्यातील अनेक वादांवर वक्तव्य केल्यानं त्याचे राजघराण्यातील अनेकांबरोबरचे संबंधही दुरावले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर त्याचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम आणि त्याचे कुटुंब आहे. असाच प्रिन्स हॅरी आता वडिलांच्या विनंतीनुसार ब्रिटनच्या सिंहासनावर बसणार असल्याचे फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमसनं लिहून ठेवलं आहे. 1555 मध्ये लिहिलेल्या लेस प्रोफेटीज यात नॉस्ट्राडेमसने राजाला राजीनामा द्यावा लागेल असे भाकीत केले आहे. तसेच राजा चार्ल्सने राजीनामा दिल्यानंतर प्रिन्स हॅरी सिंहासन स्वीकारतील. त्यानंतर राजघराण्यात असंतोष निर्माण होईल. अर्ध्या जगावर राज्य करणारे अनेक ‘बेटांचे राजे’ बळाने हाकलले जातील असेही त्यात नमुद केले आहे. आता राजा चार्ल्सच्या आजारानंतर हिच नॅस्ट्राडेमसची भविष्यवाणी ब्रिटनमध्ये चर्चिली जात आहे. प्रिन्स हॅरीबद्दल राजघराण्यात नाराजी आहे. तो जर राजा झाला तरी ही नाराजी असंतोषामध्ये रुपांतरीत होईल, असे मानले जाते.
सई बने