Home » प्रिन्स हॅरीला स्पेअर भोवणार…

प्रिन्स हॅरीला स्पेअर भोवणार…

by Team Gajawaja
0 comment
Prince Harry
Share

ब्रिटीश राजघराण्याचा कायम वादात राहणारा राजकुमार आता स्वतःच निर्माण केलेल्या एका वादात पुन्हा सापडण्याची चिन्हे आहेत. ब्रिटीश राजघराण्याचा राजकुमार हॅरी (Prince Harry) कायम कोणत्या ना कोणत्या वादात सापडलेला असतो. त्याचे ब्रिटीश राजघराण्याबरोबर झालेले मतभेद, मेघन मार्केल सारख्या अमेरिकन अभिनेत्रीबरोबर केलेले लग्न ते ब्रिटीश घराण्यापासून घेतलेली फारकत यामुळे राजकुमार हॅरी कायम चर्चेत राहिला आहे. या राजकुमारानं आपल्या अनुभवावर एक पुस्तकही लिहिलं आहे. या स्पेअर पुस्तकात त्यांनं आपल्या वडिलांवर, राजे चार्ल्स यांच्यावरही टीका केली आहे. तसेच मोठा भाऊ राजकुमार विल्यमवरही आरोप केले आहेत. राजघराण्यातील संघर्ष अशाप्रकारे पहिल्यांदाच पुस्तक स्वरुपात पुढे आला आहे. यामुळे हॅरीवर (Prince Harry) संपूर्ण राजघराणे नाराज झाले आहे. त्याची एक झलक गेल्या महिन्यात झालेल्या राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेक समारंभात बघायला मिळाली होती. आता हाच राजकुमार हॅरी (Prince Harry) स्वतःच्याच जाळ्यात फसलेला दिसत आहे. त्यासाठी त्यानं लिहिलेलं स्पेअर हे पुस्तक कारणीभूत ठरत आहे. या पुस्तकात हॅरीनं आपण ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. या कबुलीमुळं त्याच्यावर अमेरिकन सरकारच्या कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.  

ब्रिटीश राजकुमार हॅरीने (Prince Harry) जानेवारीमध्ये त्यांचे ‘स्पेअर’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. या पुस्तकामुळे बराच गदारोळ झाला. याचवेळी त्याच्या वडिलांकडे ब्रिटनच्या राजघराण्याची गादी आली. खुद्द राजे होणा-या चार्ल्स यांच्यावरही या पुस्तकात आरोप करण्यात आले आहेत.  तसेच या राजगादीचा भावी वारसदार म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते, त्या राजकुमार विल्यमवरही हॅरीनं आरोप केले आहेत. हे पुस्तक बरेच गाजले. मात्र याच पुस्तकात हॅरीनं  गांजा, कोकेन आणि सायकेडेलिक मशरूम यांसारखं अंमली पदार्थ घेतल्याचे कबूल केले आहे. या सर्वांबाबत अमेरिकन व्हिसाचे नियम अतिशय कडक आहेत. त्यामुळे राजकुमार हॅरीचा (Prince Harry) अमेरिकन व्हिसाच रद्द होण्याची शक्यता आहे.   यामुळे राजकुमार हॅरी न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकला आहे. हॅरीने यापूर्वी ड्रग्ज घेतल्याचे उघड केल्यानंतर त्याचा व्हिसा अर्ज सार्वजनिक करावा, अशी मागणी एका याचिकाकर्त्याने केली आहे. यासंदर्भात चालू असलेल्या खटल्यात, फाऊंडेशनच्या वकिलांनी राजकुमार हॅरीला (Prince Harry) व्हिसा देतांना त्यानं योग्य नियमांचे पालन केले होते का,अशी विचारणा केली आहे. हॅरी जानेवारी 2020 पासून त्याची पत्नी मेगन मर्केलसोबत अमेरिकेत राहत आहे. त्याला आर्ची आणि लिलिबेट अशी दोन मुलंही आहेत. अमेरिकेत वास्तव्य करणा-या या जोडप्याला सेलिब्रिटी व्हिसाच्या अटीतून परवाना देण्यात आला आहे. आता हॅरी नशिले पदार्थ घेत असल्याचे मान्य झाल्यास हा व्हिसा नाकरण्यात येऊ शकतो. परिणामी हॅरी  आणि मेघनचे अमेरिकेतील वास्तव्य अडचणीचे ठरु शकते.  

========

हे देखील वाचा : पुराना नव्हे पांडवकालीन पुराण किल्ला…

=======

राजकुमार हॅरी (Prince Harry) यांनी त्याच्या स्पेअर पुस्तकात कबूल केले आहे की, तो किशोरवयीन असतांना आणि वयाची 38 वर्षे पार केली असतानाही काही प्रतिबंधित औषधे घेत होता. त्याने किशोरवयात कोकेन वापरला होता आणि इटनमध्ये विद्यार्थी म्हणून गांजा ओढला होता. ही दोन्ही औषधे यूकेमध्ये बेकायदेशीर आहेत. यासोबतच त्यांनी 2016 मध्ये कॅलिफोर्नियाच्या सहलीदरम्यान सायकेडेलिक मशरूम घेतल्याचेही सविस्तर वर्णन केले आहे. कॅलिफोर्नियामध्येही या औषधावर बंदी आहे. हॅरीनं (Prince Harry) हे सर्व वर्णन आपल्या पुस्तकाच्या खपासाठी अधिक सविस्तर केल्याचे बोलले जात होते. मात्र त्याचा चांगलाच फटका त्याला बसला आहे. या पुस्तकामुळे त्याला त्याच्या राजघराण्याच्या नाराजीचा फटका सहन करावा लागला. वडील राजे चार्ल्स यांच्या राज्यारोहण समारंभात काही तासासाठी आलेल्या हॅरीकडे त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी दुर्लक्ष केले होते. अगदी मोठा भाऊ, राजकुमार विल्यमही त्याच्यापासून दूर राहिला. हा क्षण त्याच्यासाठी खूप वेदनादायी असणार. पण आता या सर्वांचा दुसरा भाग सुरु झाला आहे. कारण राजघराण्यातील व्यक्ती कधीही कोर्टात जात नाहीत, पण आपल्याच पुस्तकामुळे हॅरीला कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. हॅरीची पत्नी  मेघन ही अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकन सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या अधिकृत नियमांनुसार, व्हिसा अर्जदार जर ड्रग्स वापरणारे किंवा व्यसनी असल्याचे आढळून आले तर त्यांचा व्हिसा नाकारण्यात येईल. आता राजकुमार हॅरीचे अमेरिकेतील वास्तव्य या एका नियमांच्या आधारावर अवलंबून राहणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.