आपल्या देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. यातील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले असून १ जून पर्यंत सात टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे. ४ जून रोजी या मतांची मोजणी होणार असून देशात पुढच्या चार वर्षात कोणाची सत्ता राहिल हे स्पष्ट होणार आहे. लोकशाहीचा महाकुंभ म्हणून या सर्व निवडणूक प्रक्रियेचे वर्णन करण्यात येते. यासोबत देशामधील सर्वात पवित्र मानल्या जाणा-या महाकुंभ मेळ्याचीही तयारी सुरु झाली आहे. (Maha Kumbh Mela)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी होणारा महाकुंभ २०२५ संस्मरणीय बनवण्यासाठी योगी सरकारने तयारी सुरु केली आहे. प्रयागराजच्या संगम स्थळांचा कायापालट करण्यात येत असून प्रयागराजमध्ये होणा-या आधुनिक प्रकल्पांनी त्याचे स्वरुप पलटणार आहे. यासाठी संपूर्ण प्रयागराजमध्ये विकासकामांचा धडाका सुरु आहे. येथे डिजिटल कुंभ संग्रहालयाच्या उभारणीचे कामही सुरु आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. महाकुंभ मेळ्यासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांसाठी महाकुंभ कायम संस्मरणीय राहील याची काळजी घेण्यात येत आहे. (Maha Kumbh Mela)
भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये होणारा महाकुंभ जगभरात प्रसिद्ध आहे. देशातील पुढचा महाकुंभ प्रयागराजमध्ये होणार आहे. २०२५ मध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरु होणार आहे. दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. ज्योतिषीय मान्यतेनुसार जेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो. ही परिस्थिती १२ वर्षातून एकदाच येते. कारण देवगुरु गुरु प्रत्येक राशीत १ वर्ष राहतो. अशा प्रकारे एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी त्यांना १ वर्ष लागतात.
या वर्षी १ मे २०२४ रोजी गुरू ग्रहानं वृषभ राशीत प्रवेश केला आहे. एप्रिल २०२५ पर्यंत गुरु वृषभ राशीत राहील. यावरुनच महाकुंभच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा महाकुंभ मेळा राहणार आहे. या महाकुंभातील पहिले शाही स्नान १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी होणार आहे. दुसरे शाही स्नान २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. तिसरे शाही स्नान ३ फेब्रुवारी रोजी बसंत पंचमीला होईल. याशिवाय १३ जानेवारीला पौष पौर्णिमेचे स्नान, १२ फेब्रुवारीला माघी पौर्णिमेचे स्नान आणि २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे स्नान होणार आहे.(Maha Kumbh Mela)
या महाकुंभाच्या तारखा जाहीर झाल्यावर प्रयागराजमध्ये विकासकामांचा जोर वाढवण्यात आला आहे. त्यात रोपवेचे काम प्रमुख आहे. याशिवाय अरैल, प्रयागराज येथे डिजिटल कुंभ संग्रहालय तयार केले जात आहे. ४० हजार चौरस मीटरमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचाही कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी ४५ कोटींहून अधिक खर्च होणार आहे. प्रयागराजच्या संगमापर्यंत भाविकांचा प्रवेश सुलभ व्हावा यासाठी रोपवे तयार होत आहे. १२८१.५ मीटर लांबीचा आणि ६२ मीटर उंच रोपवे प्रकल्प शंकर विमान मंडपम ते अरैलमधील संगम जवळील त्रिवेणीपुष्प येथे त्याचे काम चालू आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
प्रयागराज येथे येणा-या भाविकांना महकुंभमेळ्याची माहिती संग्रहलयातर्फे देण्यात येणार आहे. एरेल मार्गावरील ४० हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या डिजिटल कुंभ संग्रहालयाचे कामही सुरू झाले आहे. डिजिटल कुंभ संग्रहालयात आखाड्यांचा विकास, समुद्र मंथनाशी संबंधित गॅलरी, त्रिवेणी संगम गॅलरी तसेच कुंभचा इतिहास आणि अध्यात्म दर्शविणारी गॅलरी VR च्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे.(Maha Kumbh Mela)
=============
हे देखील वाचा : विमानतळावर कोणत्या शब्दांचा वापर करण्यावर बंदी? अन्यथा तुरुंगात जावे लागेल
=============
याशिवाय कुंभाच्या उत्पत्ती आणि पौराणिक कथांशी संबंधित गॅलरी, कुंभमेळा गॅलरीचा ऐतिहासिक विकास, प्रयागराज कुंभमेळा गॅलरी, हरिद्वार-नाशिक-उज्जैन कुंभमेळा गॅलरी, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व गॅलरी, २१ व्या शतकातील कुंभमेळा आदी दाखवण्यात येणार आहे. तसेच भाविकांसाठी पार्किंग सुविधा, सांस्कृतिक बाजार, फूड प्लाझा, लँडस्केपिंग आदी सुविधाही विकसित केल्या जात आहेत. प्रयागराज मधील या सर्वच कामांची मुदत डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर सर्व प्रयागराजला विविध चित्रांनी सजवण्यात येणार आहे. जसजसा डिसेंबर महिना जवळ येईल, तसे या बदललेल्या प्रयागराजचे स्वरुप उघड होणार आहे.
सई बने