प्रयागराज येथील पवित्र संगमस्थानावर आखाड्यांनी आपली ध्वजपताका उभारली आहे. 13 जानेवारी 2025 पासून सुरु होणा-या महाकुंभमेळ्यासाठी 14 आखाड्यांचे ध्वजपूजन झाले असून त्यातील साधू-संतांचे मिरवणुकीने या कुंभस्थळी आगमन झाले आहे. या सर्व 14 आखाड्यांची वेगवेगळी वैशिष्टे आहेत. या आखाड्याचे दैवतही वेगळे आहे. असाच वेगळा आहे, श्री निर्मोही अनी आखाडा. मथुरा, उत्तरप्रदेश मधील असलेल्या या आखाड्याचे संत् भगवान कृष्ण आणि माता राधा यांना आपले अराध्या दैवत मानतात. ठाकूरजींच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणारे श्री निर्मोही अनी आखाड्याचे साधूही यावेळी महाकुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
उत्तरप्रदेश मथुरा येथील श्री निर्मोही अनी आखाड्याचे साधू देशभरातून महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे आले आहेत. दिवसरात्र ठाकूरजींच्या सेवत रमणा-या या आखाड्यातील साधू हे शस्त्र चालवण्यातही तरबेज असतात. निर्मोही अनी आखाड्याचे मुळस्थान हे मथुरा आहे. या आखाड्यातील साधू हे देशभर सनातन धर्माचे प्रचार करत असतात. वृंदावन येथे या आखाड्याचा सर्वात मोठा आश्रम आहे. या आखाड्याचे नियम हे अत्यंत कडक असतात. येथील सर्व साधक हे ब्रह्म मुहूर्तावर उठतात. त्यांना कोणतीही सुखसाधने वापरता येत नाहीत. मुळात अनी म्हणजे समूह म्हणजेच संतांचा समूह. या आखाड्याचे साधू हे समुहानं राहतात. वृंदावन गोविंद जी मंदिराजवळ असलेल्या मुख्य आश्रमातून या श्री निर्मोही अनी आखाड्याचे कामकाज चालते. सध्या या आखाड्याचे प्रमुख हे महंत सुंदरदास महाराज आहेत. या महंतांची निवड ही दर बारा वर्षींनी होते. बहुधा ही निवड महाकुंभाच्या दरम्यानच होते. (Prayagraj)
श्री निर्मोही अनी आखाड्य़ाची स्थापना बालानंदजी महाराज यांनी केली आहे. त्यांची मुळ गादी जयपूरमध्ये आहे. श्री निर्मोही अनी आखाड्या अंतर्गत अन्य नऊ आखाडे आहेत. श्री पंच हरिहर व्यास निर्मोही आखाडा, श्री पंच रामानंद निर्मोही आखाडा, श्री पंच स्वामी विष्णू हरी निर्मोही आखाडा, श्री पंच झाडियां निर्मोही आखाडा, श्री पंच मालधारी निर्मोही आखाडा आणि श्री पंच राधा बल्लवी निर्मोही आखाडा यांचा त्यात समावेश आहे. आखाड्याची स्थापना ही धर्माच्या रक्षणासाठी करण्यात आली. तेव्हा मुस्लिम आक्रमणकर्त्यांपासून धर्माचे रक्षण करणे हे प्रमुख उद्दीष्ट होते. या परकीय आक्रमकांकडे सर्वप्रकारीच शस्त्र असायची आणि त्याचा वापर करुन ते मोठ्या प्रमाणात लुटपाट करायचे. हे सर्व रोखण्यासाठीच या आखाड्याची निर्मिती कऱण्यात आली. त्यासोबत या आखाड्यातील साधूंना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या आखाड्यातील अनेक संतांनी देशाला एकसंघ करण्याबरोबरच मुघल आणि इंग्रजांशीही लढाया केल्या आहेत. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर या आखाड्याने शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण कमी केले. आपल्या लष्करी स्वरुपाला सोडून येथील साधू ध्यानधारणा आणि भक्तीमध्ये लीन झाले. असे असले तरी आजही श्री निर्मोही अनी आखाड्याचे काही साधू शस्त्रधारी आहेत. आखाड्याचे जेव्हा कुंभनगरीमध्ये आगमन होते, तेव्हा हे शस्त्रधारी साधू सर्वात पुढे असतात. (Social Updates)
=======
हे देखील वाचा : ‘या’ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना करावा लागतो शृंगार
======
आपल्या आखाड्याच्या रक्षणासाठी चोवीस तास हे साधू शस्त्रसज्ज असतात. या आखाड्यात सामिल होण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला आपल्या कुटुंबापासून दूर व्हावे लागते. आखाड्यात पूर्ण वेळ रहावे लागते. आखाड्यातील सर्व साधूंसोबत ब्रह्म मुहूर्तावर उठावे लागते. काही वर्ष ध्यानधारणा आणि धर्मग्रंथांचे वाचन, अभ्यास करावा लागतो. त्यानंतर श्री निर्मोही अनी आखाड्याचे साधूपद देण्यात येते. संत झाल्यानंतर त्यांची आखाड्यावरील निष्ठा आणि त्यांचे धर्मग्रंथातील ज्ञान लक्षात घेऊन त्यांना पदे दिली जातात. निर्मोही परंपरेशी निगडीत काही आखाड्यांमध्ये 12 वर्षांनंतर अधिकारी बदलले जातात. काही आखाड्यांमध्ये ही पदे आयुष्यभरासाठी असतात. श्री निर्मोही अनी आखाडा हा भगवान श्रीकृष्णाला अराध्य मानणारा आखाडा आहे. त्यामुळे रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून ठाकूरजींची सेवा करणे हे या आखाड्यातील साधूंचे प्रथम कर्तव्य असते. दिवसभर भगवान श्रीकृष्णाचे भजन आणि किर्तन आणि गुरु मंत्र पठण चालू असते. या आखाड्याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, यातील साधू ध्यानधारणा आणि योगासने प्रामुख्याने करतात. गुजरात, डेहराडून, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे या आखाड्याचे आश्रम आहेत. देशाचे रक्षण कऱण्यासाठी या आखाड्याचे संत तत्पर असतात. आता महाकुंभमेळ्यात या आखाड्याच्या छावणीत धर्मग्रंथावर रोज प्रवचन आणि किर्तन होणार आहेत. (Prayagraj)
सई बने