Home » ‘लाडां’चे ‘प्रसाद’ भाजपला भोवणार ?

‘लाडां’चे ‘प्रसाद’ भाजपला भोवणार ?

by Correspondent
0 comment
Prasad Lad | K Facts
Share

श्रीकांत नारायण

महाराष्ट्रावर ‘कोरोना’चे संकट असतानाच महापुराने थैमान मांडले. कोंकण आणि प. महाराष्ट्रात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले शिवाय मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झाली. अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी खरे तर एकजुटीची आवश्यकता असते. मात्र आशा परिस्थितीत सुद्धा उघडपणे ‘राजकारणा’ला प्राधान्य देण्यात येत आहे हे राज्यातील जनतेचे दुर्दैवच आहे.

सत्तारूढ महाविकास आघाडीचे नेते आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये रोज कलगीतुरा रंगत आहे. राज्यातील गंभीर परिस्थितीचे कोणालाच भान नाही असे दिसते. त्यामुळे दररोज वादग्रस्त वक्तव्ये करून टी. व्ही. चॅनेलवाल्यांना ‘खाद्य’ पुरविण्याचे काम नेतेमंडळी अगदी खुशीने करीत आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये भाजपचे नेते आघाडीवर आहेत.

खरे तर लोकशाहीत विरोधी पक्षांचीही तेवढीच जबाबदारी असते जेवढी सत्तारूढ पक्षांची असते. परंतु थोडक्यात सत्ता हातातून गेल्यामुळे संत्रस्त झालेल्या भाजपच्या नेत्यांना त्याचे भान राहिलेले दिसत नाही. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्ये करून मूळ समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.

भाजपचे ‘आयात’ केलेले आणखी एक नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मुंबईत एका भाजप (BJP) कार्यालयाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात असेच वादग्रस्त वक्तव्य करताना ‘शिवसेना भवन’ (Shiv Sena Bhavan) तोडण्याची भाषा केली. शिवसेना भवनाच्या जवळच असलेल्या भाजप कार्यलयाच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासकट काही शिवसेना नेत्यांना त्याची दखल घेणे भाग पडले.

वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेनाप्रमुख असूनही त्यांनी आतापर्यंत भाजपबाबत बरीच संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र भाजप आमदाराकडून जेंव्हा सेना -भवन तोडण्याची भाषा झाली तेंव्हा त्यांनी, ” आम्ही आतापर्यंत विरोधकांना थपडा मारतच इथपर्यंत आलो आहोत. मात्र आता अशी थप्पड देऊ की, संबधित पुन्हा उठू शकणार नाहीत” अशा शब्दात फटकारले. तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, लाड यांच्या वक्तव्याची दखल घेण्यासाठी सेनेचे शाखाप्रमुखही पुरेसे आहेत असे सांगितले. त्यामागचा गर्भितार्थ निदान प्रसाद लाड यांना तरी कळला असेलच.

शिवसेना भवन तोडण्याचे आपले हे विधान अंगलट येणार हे लगेच लक्षात आल्यावर प्रसाद लाड यांनी आपल्या “या विधानाचा” विपर्यास केला गेला असे बळेच सांगून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. मात्र भात्यातून ‘बाण’ केंव्हाच निघून गेला होता. त्यामुळे नंतरची दिलगिरी ही त्यांच्या दृष्टीने अपरिहार्यता होती.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही सारवासारव करावी लागली. ”भाजपची तोडण्या-फोडण्याची संस्कृती नाही मात्र कोणी अंगावर आले तर त्याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ.” असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. फडणवीस यांना यापुढेही अधूनमधून हे काम प्रामुख्याने करावे लागेल असे दिसते.

भाजपमध्ये ‘आयात’  केलेले आणखी एक नेते आणि नुकतेच केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे (Narayan Rane) यांनीही मध्यंतरी चिपळूणला आल्यावर पूरग्रस्त स्थितीची पाहणी करताना असेच अतिशय मोठे वादग्रस्त विधान केले.  शासकीय अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी ”सीएम-बीएम गेला उडत” असे निरर्गल वक्तव्य केले. वास्तविक पुराचे संकट किती गंभीर आहे याची राणे यांना कल्पना असतानाही त्यांनी, त्यांच्या दौऱ्यात शासकीय अधिकारी का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना ‘टार्गेट’ केले.

अशा वेळी ते आपण ‘केंद्रीय मंत्री’ आहोत हेही क्षणभर विसरले असतील. येनकेनप्रकारे या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्र्यांना गोवून त्यांच्यावर टीका करण्याची  संधी साधली. विशेष म्हणजे या दौऱ्यात त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्हीही विरोधी पक्ष नेते होते. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यावेळी काही बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राणे यांनी त्यांना, ”तू मध्ये बोलू नकोस” अशी अरेतुरेची भाषा वापरून त्यांच्या पाणउतारा केला.

प्रवीण दरेकर हे आपल्याच पक्षाचे मोठ्या पदावरील नेते आहे हेही राणे विसरून गेले. थोडक्यात सांगायचे तर ‘केंद्रीय मंत्री’ म्हणून आपण किती ‘अपरिपक्व’ आहोत हे तर त्यांनी दाखविलेच शिवाय शिवसेनेविरुद्ध जहरी टीका करण्यासाठी बळ मिळावे या एकाच हेतूने त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले हा राजकीय निरीक्षकांचा अंदाजही त्यांनी खरा ठरविला. असे हे नारायण राणे एकीकडे तर दुसरीकडे त्यांचे दोन्ही चिरंजीव बोलण्याच्या बाबतीत त्यांचीच गादी चालवीत आहेत असे दिसून येते. त्यांचीही वक्तव्ये पुढे-मागे भाजपला अडचणीत आणू शकतात.

एकूणच अशा नेत्यांबाबत ‘कानामागून येऊन तिखट झाले’ ही भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये प्रभावीपणे बळावू लागली आहे. भाजपमध्ये ”आयात” केलेल्या नेत्यांचे फार ‘लाड’ केले तर ते कसे डोक्यावर बसतात आणि अडचणीत आणतात हे भाजपच्या (मूळ) नेत्यांनी आता ओळखण्याची गरज आहे. नाही तर अशा ‘लाडांचे’ ‘प्रसाद’ पुढेचालून भाजपलाच भोगावे लागतील.

देशपातळीवर भाजपची प्रतिमा ढासळत असताना भाजपाची ‘प्रतिमा’ आणखी मलिन करण्याचे काम कोणी करीत असेल तर त्याला अटकाव करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पावले टाकावीत अशीच भाजपच्या (मूळ)कार्यकर्त्यांसह असंख्य हितचिंतकांची इच्छा असावी.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.