अनेकांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादी कायमची नोकरी शोधून एका ठराविक चौकटीत राहून आयुष्य व्यथित करण्याची इच्छा असते. मात्र काहीजण असेही असतात, ज्यांना दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन मनासारखा व्यवसाय करून आपले नाव करावयाचे असते आणि लाखो रुपये कमवायचे असतात.
मुलींबाबत हे मत जरा वेगळं असत. आजून आपल्या समाजातील काही लोकांना मुलींनी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करू नये, असे वाटत असते. मात्र या सर्व प्रकाराला विरोध करत सोलापूरच्या पूजा कौल ने सध्या मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहून यशस्वी उद्योजिका होऊ शकतात, हे दाखवून दिले आहे.
सोलापूरमध्ये राहणाऱ्या पुजा कौल (Pooja Kaul) ने सध्या आपल्या व्यवसायाच्या जोरावर संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेतले आहे. कारण तिच्या बाबतीत घडलेही तसच काहीसे आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूजा कौलने स्वतःचा संसार न थाटता किंवा कुठेही नोकरी न करता, व्यवसायात उतरून आपल्या वडिलांचे नाव मोठे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधी तिने तशी पाऊले उचलत, कोणता व्यवसाय करायचा याचे संशोधन केले.
हे संशोधन करत असताना पुजाला, मिस्रची राणी क्लियोपेट्रा स्वतःला सुंदर बनवण्यासाठी गाढविणीच्या दुधाचा प्रयोग करत होती असे आढळले. तसेच या राणीने गाढवाच्या दुधासाठी ७०० गाढव पाळले होते. हेही पुजाला या संशोधनातून कळले. पुढे तिने गाढवाच्या दुधाचा मुद्दा हाताशी धरत आजून संशोधन केले.
आणखीन संशोधन केल्यानंतर पुजाला गाढवाच्या दुधातून त्वचा कोमल आणि सुंदर राहते, तसेच चेहऱ्यावर येणारे दाग आणि पिंपल्स दूर व्हायला मदत होते असे समजले. एकंदरीत गाढवाच्या दुधात व्हिटॅमिन सी.ए.बी आणि ओमेगा ३ सारखे महत्त्वपूर्ण घटक आहेत हे पुजाला अभ्यासातून लक्षात आले होते.
त्यामुळे पुजाने भविष्यात गाढवाच्या दुधापासून प्रॉडक्ट्स बनवण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच पुजाचे युवा उद्योजक होण्याचे स्वप्न सत्यात उतरू लागले. या संशोधनानंतर पुजाने ऑर्गेनिको नावाने त्यांचे स्वतः चे स्टर्टअप सुरू केले.
या स्टर्टअपमध्ये पुजाने स्वतः जे शेतकरी गाढव (Donkey) पाळतात, अशा शेतकऱ्यांची भेटी घेतल्या. त्यावेळी गाढवाच्या दुधाची किंमत बाजारात तीन ते चार हजार रूपये लिटर होती. पण पुजाने शेतकऱ्यांशी बोलुन दोन हजार रूपये लिटर प्रमाणे दहा शेतकऱ्यांकडून दुध घेण्यास सुरुवात केली.
पुढे या दुधापासून पुजाने साबण, चारकोल आणि हनीसोप सारखे ब्युटी प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली. पुजाने या उद्योगात २५ ते ५० वर्षाच्या महिलांना आपले गिऱ्हाईक म्हणून टार्गेट केले होते. कारण या वयातील महिला आपले सौंदर्य जपण्यासाठी काहीही आणि कितीही महागाईच्या वस्तू खरेदी करू शकतात हे पुजाला माहीत होते.
तिने बनवलेले प्रॉडक्ट अगोदर पारंपरिक पद्धतीने बाजारात विकले व पुढे तिने आपला उद्योग ऑनलाइन स्वरूपात करून, ती आपले प्रॉडक्ट ऑनलाइन पद्धतीने विकू लागली. तिच्या या प्रॉडक्टला ग्राहकांनाही खूप मोठा प्रतिसाद दिला. ज्यातून पुजाचे एक यशस्वी उद्योजिका व्हायचे स्वप्न पूर्ण झाले.
महत्वाचं म्हणजे गाढवाच्या वासराचा विचार करून, पुजाने कधीच एकाच शेकऱ्यांकडून दररोज दूध विकत घेतले नाही. कारण पुजाला माहीत होते गाढवाचे दररोज दूध काढले तर, गाढव कमजोर होते आणि त्याच्या वासराला सुध्दा बरोबर पोषण मिळत नाही.
सध्या गाढवाच्या दुधाची मागणी ही भारतातूनच नाही, तर संपूर्ण जगभरातून होत आहे. मात्र पुजाने सुरू केलेले हे स्टर्टअप आत्ता आपल्याला जरी सोप्पे वाटत असले, तरी पुजाला यासाठी खूप मोठा खडतर प्रवास करावा लागला होता.
ज्यावेळी पुजा गाढवाचे दूध घ्यायला बाहेर जात असे, त्यावेळी तिच्या मनात असुरक्षित भाव येत असे. लोक पुजाची खिल्ली उडवत असे. तर घरचेही सुरुवातीला पुजाची मदत करायला तयार नव्हते. अगदी घरचे सुद्धा पुजाची मस्करी करत असत. मात्र तरीही पुजा मागे हटली नाही. तिने या सगळ्या परिस्थितीचा कसून सामना केला आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिली.
तिच्या या व्यवसायाची गोष्ट युवापिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी बनत आहे.
– निवास उद्धव गायकवाड