Home » RSS Vs BJP: संघ व भाजपामध्ये एवढा तणाव नेमका कशामुळे?

RSS Vs BJP: संघ व भाजपामध्ये एवढा तणाव नेमका कशामुळे?

RSS आणि भाजपाचं खरंच काही बिनसलंय का? जाणून घ्या

by Team Gajawaja
0 comment
rss-vs-bjp
Share

यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर जरी भाजपाने एनडीएमधील मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केलं असलं तरी येणारा काळ हा भाजपासाठी आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कठीण असणार आहे असा अंदाज कित्येक राजकीय विश्लेषकांनी वर्तवलाय.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपावर टीका केली. आपल्या व्यक्तव्यात ते सत्ताधारी भाजपाला अहंकारी आणि इंडिया आघाडीला ‘रामविरोधी’ असं म्हणाले. (Political News RSS Vs BJP)

“ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता त्यांना प्रभू श्रीराम यांनी २४० या संख्येवर मर्यादित ठेवलं.” असं वक्तव्य त्यांनी केलं.

याआधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाजपाचे कान टोचले होते. आता पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएस यांच्यातील संघर्षाबद्दल चर्चा होऊ लागलीये.

खरंच भाजपामध्ये सगळं काही आलबेल आहे का? नेमका संघ आत्ताच भाजपावर टीका का करतोय? आजच्या लेखातून आपण याविषयीच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

भाजपाला आधीच्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदा स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं, इतकंच नव्हे तर बऱ्याच जागा या भाजपाच्या हातून निसटल्या. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातही भाजपाला जबरदस्त फटका बसला. (Political News RSS Vs BJP)

याचा सर्वात मोठा फटका भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही बसला. निवणुकीच्या निकालानंतर मोहन भागवतांनी केलेलं भाषण हे अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरलं. या भाषणात मोहन भागवत यांनी भाजपावर टीका केली, इतकंच नव्हे तर मणिपूरसारख्या मुद्द्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.rss-vs-bjp

संघाच्या मुखपत्रातूनही भाजपाच्या आत्मविश्वास बाळगणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले. संघाचे जुने कार्यकर्ते रतन शारदा यांनीही भाजपा आणि मोदी यांच्यावर टीका करणारा लेख लिहिला.

लोकसभा निवडणुकीच्या काही टप्प्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या एका वक्तव्याने तेव्हा चांगलीच खळबळ उडाली होते. “भाजपाला आता संघाची गरज नाही” अशा आशयाचे वक्तव्य नड्डा यांनी केले होते.

एकूणच भाजपाला निवडणुकीच्या दरम्यान संघाची कशी मदत होते हे सर्वश्रुत आहेच. तरी नड्डा यांनी जे वक्तव्य केलं ते संघासाठी तितकंच बोचरं होतं आणि यानंतर संघानेही भाजपावर पलटवार करायला सुरुवात केली. (Political News RSS Vs BJP)

===

हेदेखील वाचा : अजित पवारांवर एवढी नामुष्की का ओढवली?

===

मोहन भागवत हे जाहीररित्या केवळ दोनदाच लोकांशी संवाद साधतात. एक विजयादशमीला आणि दुसरं म्हणजे कार्यकारी विकास वर्ग होतात तेव्हा. कार्यकारी विकास वर्गात बोलताना ते कधीच राजकीय विषयांवर भाष्य करत नाहीत.

पण, यावेळी प्रथमच मोहन भागवत यांनी निवडणुकीचे निकाल लागल्यावर लगेचच कार्यकारी विकास वर्ग -2 च्या समारोपाच्या भाषणात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. तसेच त्यांच्या या आक्रमक भाषणाची जबरदस्त चर्चा झाली. (Political News RSS Vs BJP)

आपल्या या भाषणात मोहन भागवतांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. मणिपूरमधल्या हिंसेवर भाष्य करत त्यांनी सरकारचे कान टोचले. तर कायम स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

याबरोबरच निवडणूक आणि युद्धात फरक असतो, निवडणुकांमध्ये एका मर्यादेचे पालन करायला हवे असे सूचक वक्तव्यही त्यांनी या भाषणात केले. या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आरएसएसचे नियतकालिक ‘ऑर्गनायझर’च्या लेखांमधून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आरसा दाखवण्यात आला.

organiser-rss

या नियतकालिकातून भाजपाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. यावेळी “आयेगा तो मोदीही” आणि “अबकी बार ४०० पार” या नाऱ्यामध्ये मश्गुल असणाऱ्या भाजपाला पराभव पत्करावा लागला असं स्पष्टपणे नियतकालिकातून मांडण्यात आलं.

याबरोबरच अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपाची ब्रॅंड वॅल्यू कमी झाली असंही त्यातून स्पष्ट करण्यात आलं.

याआधीही संघ आणि भाजपमधले मतभेद समोर आले होते. २००४ च्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर संघाचे तत्कालीन सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यावर खुलेआम टीका केली होती.

इतकंच नव्हे तर त्यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबावरही टीका केली होती. वाजपेयी यांचे जावयी रंजन भट्टाचार्य हे सरकारी कामात ढवळाढवळ करत असल्याचं के.एस. सुदर्शन यांनी निदर्शनास आणून दिलेलं. त्यावेळीही भाजपाचे वरिष्ठ नेते आणि संघ यांच्यात तणाव निर्माण झाला होता. (Political News RSS Vs BJP)

सध्या एकूणच राजकीय वर्तुळातील भाजपाची रणनीती, राज्यात त्यांनी केलेलं फोडाफोडीचं राजकारण, आणि यामुळे भाजपची ढासळलेली प्रतिमा हे संघाला पटलेलं नाही. यामुळेच भागवतांनी ही वक्तव्य केली असावी असा तर्क बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी लावलाय.

संघ आणि भाजपमध्ये फार काही बिनसलं नसलं तरी थोडा तणाव निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. आता मोहन भागवत यांच्या भाषणातून भाजपा आणि मोदी नेमका काय अर्थ काढणार? पक्ष त्यादृष्टीने पावलं उचलणार का? याकडे आता साऱ्या जनतेचं लक्ष लागून आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.