Home » पेले : फुटबॉलचा बादशाह

पेले : फुटबॉलचा बादशाह

by Team Gajawaja
0 comment
Pele Life Story
Share

Pele Life Story : पेले हे नाव उच्चारलं की, जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या डोळ्यांसमोर एक प्रतिभावान, वेगवान आणि अद्वितीय खेळाडू उभा राहतो. त्यांचं संपूर्ण नाव एडसन अरांतेस दो नासिमेंटो असून ते २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलमधील ट्रेस कोरासॉन्स या गावात जन्मले. अतिशय गरिबीत वाढलेला हा मुलगा, पुढे फुटबॉल विश्वाचा सम्राट बनला, हे त्यांच्या जिद्दीचं आणि कौशल्याचं मूर्त उदाहरण आहे.

पेले यांचं फुटबॉलप्रेम लहानपणापासूनच दिसत होतं. गरिबीमुळे बूट नसल्याने त्यांनी जुने मोजे आणि कागद भरून केलेला चेंडू वापरत खेळायला सुरुवात केली. त्यांच्या खेळातील चमक लवकरच दिसून आली आणि वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी “सँटोस” क्लबसाठी खेळायला सुरुवात केली. पुढील वर्षीच, म्हणजे १६व्या वर्षी, त्यांनी ब्राझील राष्ट्रीय संघात पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात गोल करत आपली छाप पाडली.

पेले यांचा झळाळता क्षण १९५८ च्या फिफा विश्वचषकात आला. वयाच्या फक्त १७व्या वर्षी त्यांनी सहा गोल करत ब्राझीलला त्यांचा पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला. हे विश्वविजेतेपद त्यांनी १९६२ आणि १९७० सुद्धा मिळवलं, अशा प्रकारे तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव खेळाडू म्हणून त्यांचा इतिहासात उल्लेख होतो. त्यांच्या सर्जनशील खेळशैली, गोल करण्याची नैसर्गिक क्षमता आणि मैदानावरील प्रभाव पाहता त्यांना अनेक वेळा “The King of Football” आणि “Black Pearl” असे गौरवले गेले.(Pele Life Story)

Pele Life Story

Pele Life Story

पेले यांनी त्यांच्या कारकीर्दीत १,२८१ गोल केले, जे आजही एक मोठा विक्रम मानला जातो. त्यांनी केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे, तर एक सांस्कृतिक आणि सामाजिक दूत म्हणून सुद्धा काम केलं. त्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून गरिबी, वर्णद्वेष यांच्याविरुद्ध लढा दिला. निवृत्तीनंतर त्यांनी युनायटेड नेशन्सचे राजदूत म्हणून काम केलं आणि ‘युनिसेफ’च्या अभियानांत भाग घेतला.

==============

हे ही वाचा : 

Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर

Banu Mustaliq : आत्महदहन ते बुकर प्राइजपर्यंत; वाचा बानू मुश्ताक यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा

==============

पेले यांचं आयुष्य हे प्रेरणादायी आहे. गरिबीतून सुरू झालेला प्रवास, जागतिक व्यासपीठावर केलेली कामगिरी आणि खेळातील सातत्य व नम्रता – या साऱ्या गोष्टींमुळे ते फक्त खेळाडू नव्हते, तर एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या योगदानामुळे फुटबॉल हा खेळ केवळ ब्राझीलमध्ये नव्हे तर संपूर्ण जगभर लोकप्रिय झाला.(Latest Marathi News)

पेले यांचं २९ डिसेंबर २०२२ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगाने एक महान खेळाडू गमावला, पण त्यांच्या आठवणी, त्यांची खेळातील चमक आणि त्यांचं कार्य सदैव स्मरणात राहील. फुटबॉलच्या इतिहासात “पेले” हे नाव सदैव अमिट आणि अजरामर राहील.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.