जिथे लोकशाही नांदली आणि जगात पसरली अशा ब्रिटनमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलंय. निमित्त आहे ब्रिटनमध्ये ‘कोविड’ काळात ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’वर झालेल्या पार्ट्यांचं! ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’ हे ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान आणि ऑफिस! या सगळ्या अनुषंगाने बोरिस जॉनसन यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या खासदारानी पंतप्रधान म्हणून त्यांना आव्हान दिलं आणि त्यांच्याविरुद्ध ब्रिटिश संसदेत अविश्वास प्रस्ताव ठेवला. त्यादृष्टीने त्यावर मतदान झालं आणि जॉनसन यांनी अविश्वास प्रस्ताव जिंकला. एकदाचा जॉनसन यांचा जीव मग भांड्यात पडला. (Partygate scandal and Boris Johnson)

या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती पार्टी-गेट प्रकरणाची! काही प्रसारमाध्यमांनी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन आणि कोविडचे कडक निर्बंध असताना जॉनसन यांनी अनेक वेळा अधिकारी व खासदारांना त्यांच्या निवासस्थानी बोलावलं व या सगळ्यानी दारू पार्टी केल्या. यावर एकच खळबळ माजली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले.
प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या ‘स्यू ग्रे’ यांना घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आणि एक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या अहवालात ग्रे यांनी नमूद केलं की, मे २०२० ते एप्रिल २०२१ या दरम्यान १६ वेळा अशाप्रकारे डाऊनिंग स्ट्रीटवर लोक जमले होते आणि त्यांनी पार्टी केली, सेलिब्रेशन केलं. यात एकूण ८३ लोक वेगवेगळ्या वेळेस अनधिकृतपणे पंतप्रधानांच्या निवासस्थानी जमले होते, यावर पोलिसानी त्यांना दंड ठोठावला. (Partygate scandal and Boris Johnson)

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ग्रे यांनी मत नोंदवताना म्हटलं की, यामध्ये पंतप्रधान आणि अर्थमंत्री पण जमले होते, तसंच सुरक्षा दलातील अधिकाऱ्याना आणि ऑफिस स्टाफला यावेळी हीन दर्जाची वागणूक देण्यात आली.
हा अहवाल बाहेर आल्यानंतर जॉनसन यांनी, “अशाप्रकारे कुठलेही नियम मी मोडलेले नाहीत आणि अशा पार्ट्यासुद्धा कुठे झाल्या नाहीत”, असं हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटिश संसदेत बोलताना सांगितलं. या सगळ्या धामधुमीत कंझरवेटिव्ह पक्षातल्या खासदारांनी जॉनसन यांना हटवण्याचा आणि अविश्वास ठराव घेण्याचं ठरवलं. (Partygate scandal and Boris Johnson)
त्याप्रमाणे यावर गुप्त पद्धतीने मतदान झालं. एकूण ३५९ कंझरवेटिव्ह खासदारांनी या मतदानात भाग घेतला. यामध्ये जॉनसन यांनी हा त्यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव जिंकला. जॉनसन यांना २११ मतं मिळाली, तर १४८ खासदारांनी जॉनसन यांच्याविरुद्ध मतदान केलं. अशापद्धतीने जॉनसन यांना विजय मिळाला खरा, पण त्यांच्या विरोधात त्यांच्याच म्हणजे कंझरवेटिव्ह पक्षातल्या खासदारांनी विरुद्ध मतदान केलं आणि त्याला निषेध नोंदवला. लेबर पक्षाच्या खासदारानी आणि नेत्यांनीही कंझरवेटिव्ह पक्षावर आणि जॉनसन यांच्यावर टीका केली. जॉनसन यांच्या विरोधकानी तसंच त्यांच्या पक्षातल्या लोकांनीही जॉनसन हे पंतप्रधानपदी राहण्यास योग्य नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा अशाप्रकारे भाष्य केलं.

जॉनसन २०१९ मध्ये मोठ्या फरकाने निवडणुकीत विजयी झाले होते आणि नंतर ते पंतप्रधानपदी विराजमान झाले. लेबर पक्षाच्या नेत्यानी, “बोरिस जॉनसन यांना आता आम्ही कंटाळलो आहोत, हे जॉनसन फक्त आश्वासनं देतात पण कृती मात्र काहीच करत नाहीत,” अशी टीका यावेळी केली. जॉनसन हे ब्रिटनच्या इतिहासातले पहिले पंतप्रधान आहेत जे पंतप्रधानपदावर असताना त्यांनी नियम मोडला. कायदा पाळला नाही म्हणून पोलिसानी त्यांना दंड केला आहे. (Partygate scandal and Boris Johnson)
=====
हे देखील वाचा – रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांनी मागितलं नाटोचं सदस्यत्व!
=====
जॉनसन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता पुढच्या वर्षभरासाठी तरी त्यांच्या पदाला धोका नाही. ते कंझरवेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून पुढे वर्षभर तरी कायम राहतील. असं असलं तरीसुद्धा त्यांची कंझरवेटिव्ह पक्षावर असलेली पकड घट्ट राहिली नाही आणि विरोधकांपेक्षा त्यांना त्यांच्याच पक्षातल्या खासदारांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान असलेल्या ‘थेरेसा मे’ यानीसुद्धा अशाप्रकारे विश्वासदर्शक ठराव जिंकला होता, पण तरीसुद्धा त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि तेव्हा तर ‘मे’ यांनी आताच्या जॉनसन यांच्यापेक्षा जास्त मतांनी कंझरवेटिव्ह पक्षाच्या नेते पदावर राहण्यासाठीचा ठराव जिंकला होता. याची उजळणीच कंझरवेटिव्ह पक्षाचे खासदार जॉनसन यांना करून देत आहेत असं चित्र आहे. येणाऱ्या काळात काही जागांसाठी पोटनिवडणुका ब्रिटनमध्ये होणार आहेत, त्यादृष्टीने जॉनसन शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. (Partygate scandal and Boris Johnson)

शेवटी, येणाऱ्या काळात जॉनसन यांचं पंतप्रधानपदाचं भवितव्य ठरेल. पोटनिवडणुकांमध्ये कशाप्रकारे जॉनसन कामगिरी करतात आणि कंझरवेटिव्ह पक्षामध्ये त्यांच्याबद्दल असलेला विरोध कमी कसा करतात आणि त्यांच्याच पक्षामधे गमावलेला विश्वास कसा परत मिळवतात का, हे बघाव लागेल.
निखिल कासखेडीकर