मध्यप्रदेशमधील मंदसौर जिल्ह्याला पौराणिक पार्श्वभूमी आहे. येथील प्रभु पशुपतिनाथांचं मंदिर प्रसिद्ध आहे. हा बहुतांशी भाग शेतीबहुल आहे. आणि विशेष म्हणजे, या भागात सरकारी परवानगीनं अफूच्या पिकाची शेती केली जाते. गेली अनेक वर्ष मंदसौर हे अफूच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. कडक सरकारी कायद्यांचे पालन करून येथील शेतकरी अफूची शेती करतात. गेली अनेक वर्ष सुरु असलेली ही अफूची शेती आता धोक्यात आली आहे. त्याला कारण ठरले आहेत ते मिठू मिठू बोलणारे पोपट….आश्चर्य वाटलं ना! या पोपटांमुळेच मंदसौरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून होणारी अफूची शेती धोक्यात आली आहे. कारण या तयार झालेल्या अफूच्या बोंडांवर पोपटांचे थवे आक्रमण करीत आहेत. या पोपटांना घालवण्यासाठी शेतक-यांनी अनेक उपाय केले आहेत. पण या सर्व उपायांवर पोपटांनी मात केली आहे. आता या अफूचे पोपटांना व्यसनच लागल्याचे निष्पन्न झाले आहे. हे अफू घेतलेले पोपट शेतक-यांवरही हल्ले करीत आहेत. या पोपटांसोबत काही निलगायीही या अफूच्या शेतीमध्ये येत असून यामुळे शेतक-यांना आपले अफूचे पिक कसे वाचवावे हा प्रश्न पडला आहे.
मंदसौर येथील अफूच्या शेतीसोबत आता या अफूच्या बोंडाना खायला येणा-या पोपटांचीही चर्चा होत आहे. या पोपटांनाही अमली पदार्थांचे व्यसन लागले आहे. हे पोपटांचे थवे शेतातून अनेक किलो अफू पळवत असून त्यामुळे शेतक-यांचे हजारोंचे नुकसान होत आहे. या अनोख्या चोरांमुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. अफूचे पिक घेण्यासाठी अनेक कायदे, नियम असतात. हे सांभाळून केलेले पिक आता पोपटांच्या आक्रमणामुळे संकटात आले आहे. मंदसौरमध्ये पेरु खाणारे आणि गोड बोलणारे पोपटच अफूची बोंडं तोडून पळत आहेत. हे पोपट अफूचे वेडे झाले आहेत. शेतातून अफू चोरून खाणारे हे पोपट आता पुरते व्यसनाधीन झाले आहेत. मंदसौरमध्ये अफूचे पीक तयार झाले आहे. त्यामुळे चांगल्या नफ्याच्या आशेने येथील शेतकरी सुखावला असतांनाच पोपट आणि निलगायींनी त्यांना त्रस्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. कारण शेतकऱ्यांना अफू पिकातून मिळणारे सरासरी उत्पन्न सरकारला द्यावे लागते. तसा नियमच आहे. शेतक-यांनी हा नियम तोडला तर सरकार अफूच्या लागवडीचा करार रद्द करते.
मंदसौरच्या शेतकऱ्यांनी पोपट आणि नीलगायपासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी जाळीचे कुंपण लावले आहे. कडक देखरेख असूनही हे पोपट जाळे तोडून सकाळी आणि संध्याकाळी अफूची बोंडे तोडण्यासाठी शेतात पोहोचतात. पोपटांचे हे थवे पाहून वनविभागापासून ते कृषी विभागापर्यंतचे अधिकारीही अवाक् झाले आहेत. मार्च महिन्यात अफूचे पीक तयार होऊ लागते. त्यांची सरासरी काढण्यासाठी शेतकरीही अफूची बोंडे फोडायला लागतात. या कामात सर्वात जास्त त्रास पोपट निर्माण करु लागले आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हे पोपट मोठ्या संख्येनं अफूच्या शेतीत येतात. त्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी जाळी लावली. तसेच पिकाच्या भोवती जाड कपड्यांचे कुंपण घातले. रात्रीसाठी एलईडी दिवेही लावण्यात आले. मात्र या पोपटांना नशेचे इतके व्यसन लागले आहे की, हे सर्व प्रकार पोपटांनी हाणून पाडले आहेत. त्यांनी जाळी तोडली आहे, तसेच कपड्याचे कुंपणही त्यांनी तोडून अफूच्या बोंडावर ताव मारणे सुरुच ठेवले आहे. पोपटांच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असून, सरासरीही गाठता येणार नाही अशी भीती शेतक-यांना लागली आहे. त्यामुळे आता शेतक-याचे संपूर्ण कुटुंब शेत राकण्यासाठी दिवसा आणि रात्रीही शेतात बसून रहात आहे. या पोपटांबाबत शेतकरी सांगतात की, पूर्वी पोपट शेतातून अफूची बोंडं तोडत असत पण आता ते हिंसकही होत आहेत. या अफूच्या शेतीवर फक्त पोपटांचेच लक्ष आहे असे नाही तर निलगायीही या अफूच्या शेतीवर मोठ्याप्रमाणात येत असून नुकसान करीत आहेत. आता या पोपटांना आणि नीलगायींना रोखल्यास ते शेतक-यांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत.
======
हे देखील वाचा : तुमचे मुलं सातत्याने मोबाईलवर असते? दूर ठेवण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा
======
शेतक-यांनी ही समस्या कृषी आणि वनविभागासमोरही मांडली आहे. त्यांनी यासंदर्भात तज्ञांना पाचारण केले होते. तेव्हा त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, अफूचा परिणाम पोपटांच्या मज्जासंस्थेवर होत आहे. त्यामुळेच पोपटांना अंमली पदार्थांचे व्यसन लागले आहे. आणि ते हिंसक झाले आहेत. या सर्वांमुळे मंदसौर येथील अफूची शेती मात्र संकटात आली आहे. भारतात अफूची लागवड करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. दरवर्षी सरकार अफू पिकवण्यासाठी निवडक शेतक-यांना परवानगी देते. त्या बदल्यात शेतकऱ्यांना सरासरी उत्पन्न सरकारला द्यावे लागते. शेतकरी सरासरी उत्पादन देऊ शकले नाहीत, तर अफूच्या लागवडीचा परवाना रद्द केला जातो. सोबतच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागते. मंदसौर हे अफूच्या शेतीचे उगमस्थान मानले जाते. येथील 19,000 शेतकरी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या लान्सिंग आणि सीपीएस प्रणाली अंतर्गत अफू पिकवतात.
सई बने