Home » इंदिरा गांधी कालव्याची पाकिस्तानला धास्ती…

इंदिरा गांधी कालव्याची पाकिस्तानला धास्ती…

by Team Gajawaja
0 comment
Indira Gandhi Canal
Share

राजस्थानला मरुभूमी म्हटलं जातं, वाळवंटाचं शहर. सगळीकडे वाळू पण आता याच मरुभूमिचे रुप पालटले जात आहे. या मरुभूमीमध्ये आता शेतीउत्पादनाचे नवे विक्रम होत आहेत. हा सर्व चमत्कार झाला आहे, एका कालव्यामुळे. राजस्थानमध्ये असलेल्या या कालव्याची व्याप्ती एवढी आहे की, पृथ्वीभोवती सहा मीटर रुंद आणि 1.2 मीटर उंच तटबंदी बनवता येईल. या कालव्याचे नाव आहे, इंदिरा गांधी कालवा.  या कालव्याचा राजस्थानला आणि पाकिस्तान सिमेलगत असलेल्या भारतीय सैन्याला मोठा उपयोग होत आहे. त्याचवेळी या कालव्याचा धाक पाकिस्तानला आहे. कारण पाकिस्ताननं भारताबरोबर युद्ध सुरु करण्याचा प्रयत्न केला आणि तर याच कालव्याच्या पाण्यात पाकिस्तानचे रणगाडे वाहून जाणार आहेत, याची कल्पना पाकिस्तानलाही आहे. त्यामुळेच पाकिस्तानला या इंदिरा गांधी कालव्याची प्रचंड भीती आहे. (Indira Gandhi Canal)  

राजस्थानमधील इंदिरा गांधी कालवा (Indira Gandhi Canal) हा भारतातील सर्वात लांब कालवा आहे. पंजाब राज्यातील सतलज आणि बियास नद्यांच्या संगमापासून काही किलोमीटर अंतरावर हरिकेजवळील हरिके बॅरेजपासून हा कालवा सुरु होतो. राजस्थानच्या वायव्येकडील थार वाळवंटापर्यंत हा कालवा पसरलेला आहे. हा कालवा राजस्थान कालवा म्हणून ओळखला जात होता. मात्र  पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 2 नोव्हेंबर 1984 रोजी या कालव्याचे नाव इंदिरा गांधी कालवा असे करण्यात आले. या कालव्यामुळे राजस्थानचे संपूर्ण स्वरुप बदलले आहे. त्यामुळेच या कालव्याला राजस्थानची मरुगंगा असेही म्हटले जाते. हा कालवा पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या भागातील बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांसाठी पाण्याची व्यवस्थाही करतो. शेतकरी आणि जवानांना फायदेशीर असणा-या या कालव्यामुळे दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे धान्य तयार होते. या कालव्यातून दोन हजार गावांना पाणीपुरवठा होतो. कालवा एकूण नऊ जिल्ह्यांची तहान भागवतो. (Indira Gandhi Canal) 

इंदिरा कालवा (Indira Gandhi Canal) हा राजस्थानसाठी भाग्यदायी ठरला. कारण कालवा झाल्यावर राजस्थानमधील पावसाचे प्रमाण वाढले. देशातील सर्वाधिक हरभऱ्याचे उत्पादन याच कालव्याच्या भागात होत आहे. फारकाय या कालव्याच्या परिक्षेत्रात येणा-या बारमेरमध्ये डाळिंबाची लागवड सुरू झाली आहे. याशिवाय या भागातील शेतकरी आता फक्त पावसाळ्याचा पाण्यावर अवलंबून शेती उत्पादन घेत नाहीत. तर या भागात बारामाही शेती केली जाते. शेती उत्पादनातील ही मोठी क्रांती मानली जाते. कारण बिकानेरच्या कालव्याच्या क्षेत्रात नोखा येथे युरोपियन रेड लेडीफिंगरचे उत्पादन घेतले जात असून त्याची थेट परदेशात निर्यात होते. याशिवाय ऑलिव्ह आणि कोरफडी सारख्या औषधात उपयोगी पडणा-या वनस्पतींची लागवडही या भागात वाढली आहे.  हा कालवा बांधण्यापूर्वी या भागातील नागरिकांना अनेक मैलावरुन पिण्याचे पाणी आणावे लागायचे.  शेतीसाठी तर पाणी नव्हतेच. (Indira Gandhi Canal)

मात्र कालवा झाल्यावर आता बाराशे क्युसेक पाणी फक्त पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. हा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा असून त्याची लांबी 650 किलोमीटर आहे. एकूण उपकालवे आणि वितरिका जोडले तर लांबी 9 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. 1927 मध्ये, बिकानेर संस्थानाचे महाराजा गंगा सिंग यांनी पंजाबच्या बियास आणि सतलज नद्यांचे पाणी बिकानेरला आणण्यासाठी गंगा कालवा बांधला होता. त्याला  मारू गंगा असेही नाव देण्यात आले. नंतर 1948 मध्ये संस्थानाचे सचिव आणि मुख्य अभियंता कंवर सेन यांनी राजस्थान कालव्याचा पहिला प्रस्ताव भारत सरकारला सादर केला.1958 मध्ये पायाभरणी झाली. या कालव्यावर तीन हजार कोटींहून अधिक खर्च झाले असून वाळवंटातील एक आश्चर्य म्हणून या कालव्याकडे बघितले जाते. (Indira Gandhi Canal)

=======

हे देखील वाचा : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींकडून अनोखी भेट

=======

हिमालयातून येणा-या पाण्यानं या वाळवंटाचे रुपच पालटले. या कालव्याची भव्यता पाहून इराणचे शाहही त्याच्या प्रेमात पडले होते. इराणचे शाह यांनी हा कालवा पाकिस्तानमार्गे आपल्या देशात नेण्याचा प्रस्ताव तत्कालिन भारत सरकारतर्फे ठेवला होता. त्यासाठी भारताला मोफत तेल देण्याचाही प्रस्ताव देण्यात आला होता. हा कालवा होण्यापूर्वी बाडमेर, जोधपूर आणि जैसलमेरला एकेकाळी वालुकामय जिल्हे म्हटले जायचे पण आता त्याजागी पाण्याचा गारवा आहे. या कालव्याच्या पाण्यावर चक्क काही भागात मत्सशेतीही सुरु झाली आहे. गेल्या 50 वर्षांत येथील पावसाची सरासरीही सात टक्क्यांनी वाढल्याचे सिद्ध झाले आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या कालव्याच्या परिक्षेत्रात उद्योगही वाढू लागले आहेत.  जैसलमेर ते बिकानेरपर्यंत सिरॅमिकचे कारखाने वाढले आहेत. तर सौरउर्जा प्रकल्पही मोठ्या प्रमाणात आले आहेत.(Indira Gandhi Canal)  

शेती आणि उद्योगासाठी या इंदिरा कालव्याचा फायदा होत असला तरी भारताच्या संरक्षणातही या कालव्याचे खूप महत्त्व आहे. हा कालवा श्री गंगानगर ते बारमेर मार्गे बिकानेर, जैसलमेर असा पसरला आहे. पाकिस्तान सीमेला जवळपास समांतर आहे. पाकिस्ताननं भारताबरोबर युद्ध छेडल्यास हा कालवा भारताची ढाल बनणार आहे. कारण पाकिस्तानचे रणगाडे भारताच्या दिशेनं आल्यास हा कालवा फोडण्याचीही व्यवस्था असल्याची माहिती आहे. असे केल्यास  हा संपूर्ण परिसर दलदलीचा होऊन, रणगाडे तिथेच रुतून जाणार आहेत. त्यामुळेच या इंदिरा कालव्याचा धाक पाकिस्तानला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.