नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते. या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते एक आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात. वैशिष्ट्य म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराचा आकारही ॐ असा आहे आणि या डोंगरावरून पाहिल्यास माता नर्मदाही ॐ आकारात वाहत असल्याचे दिसते. इतरत्र वेगात वाहणार्या नर्मदा नदीचे शांत रूप येथे बघायला मिळते.
वैशिष्ट्य म्हणजे येथे एक नव्हे तर दोन शिवलिंग आहेत. ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर.
भौगोलिक स्थिती
उज्जयनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनपासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थाने आहेत. दुसरे ॐकार या नांवाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असे म्हणतात. दोन्ही शिवलिंग जागृत असल्याचे मानण्यात येते. संथपणे वाहणार्या नर्मदेच्या भिन्न किनार्यांवर ती वसली आहेत.
ओंकारेश्वराची आख्यायिका
मंधाता नावाच्या दिव्य पुरूषाची अंबरिष व मुषुकुंद ही दोन मुले होती. त्यांनी कठोर तपस्या केल्याने येथे दोन शिवलिंग असल्याचे मानले जाते. यामुळेच येथील पर्वत मंधाता पर्वत म्हणून विख्यात आहे.
शिव पुराणानुसार…
ओंकार बाबा व ममलेश्वरजी ओंकारेश्वराचे अधिपती असल्याचे मानले जाते. प्रत्येक सोमवारी प्रजेचे सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी ते शहरात फिरत असतात. भगवान ओंकारास वाजत गाजत नावेत बसवून ममलेश्वर मंदिराच्या घाटावर आणण्यात येते. येथूनच दोन्ही देवता नगर भ्रमणासाठी निघतात.
ओंकारेश्वराची आरती
दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते. या दिवशी येथे गुलालाची होळी खेळली जाते. सर्व रस्ते गुलालाने न्हाऊन निघतात. ओंकार महाराजांची चांदीची पंचमुखी प्रतिमा फुलांनी सजवून पालखीतून घाटावर आणण्यात येते. नगर भ्रमणानंतर दोन्ही लिंगे थाटात नौकाविहार करतात.
कसे पोहोचणार
ओंकारेश्वरला विमाऩ, रेल्वे किंवा बसने जाता येते.
विमानाने जायचे झाल्यास येथून 77 किलोमीटरवर इंदूर विमानतळ आहे. दिल्ली, मुंबई व भोपाळहून येथे विमानांची व्यवस्था आहे.
रेल्वे- येथून बारा किलोमीटरवर खांडवा- रतलाम रेल्वे स्टेशन आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असल्याने भरपूर गाड्या आहेत.
इंदूर, उज्जैन व खांडवा शहरांशी ओंकारेश्वर रस्त्यांनी जोडलेले आहे. याशिवाय भरपूर बसही उपलब्ध आहेत
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंग – महांकालेश्वर (मध्यप्रदेश)
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.