Home » ओम पर्वतावरील ओमची आकृती पुसट का झाली ?

ओम पर्वतावरील ओमची आकृती पुसट का झाली ?

by Team Gajawaja
0 comment
Om Parvat
Share

उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यात हिमालय पर्वत रांगेत असलेला ओम पर्वत हे एक गुढ मानले जाते. हिंदू धर्मात ओम या शब्दाला महत्त्व आहे. भगवान शंकराचा हा मंत्र मानला जातो. तोच शब्द हिमालच्या रांगेतील एका पर्वतावर हुबेहुब दिसतो. त्यामुळे या पर्वताला ओम पर्वत म्हटले जाते. या पर्वताला बघण्यासाठी हजारो शिवभक्त पिथौरागढमध्ये येतात. हा पर्वत भगवान शंकराचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. नैसर्गिकरित्या येथे तयार झालेली ओमची निर्मिती हे वैज्ञानिकांसाठीही मोठे रहस्य आहे. जगभरातील शिवभक्त या ओमपर्वताच्या यात्रेसाठी येतात, आणि पर्वतावरील बर्फाच्छादीत ओम ही आकृती बघून भगवान शंकराचा जयघोष करतात. मात्र या सर्व शिवभक्तांना यावर्षी मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंडच्या ओम पर्वतावरून ओमची आकृतीच चक्क गायब झाली आहे. ओम पर्वत पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला तहसीलच्या व्यास खोऱ्यात ५,९०० मीटर उंचीवर आहे. ओम पर्वतावरील हे ओम प्रतीक गायब होण्यामागे जागतिक हवामानाचा परिणार असावा असा पर्यावरणवाद्यांचा अंदाज आहे. मात्र येथील काही स्थानिक या पर्वतावरील मानवी हस्तक्षेप या घटनेस कारणीभूत असल्याचे मानत आहेत. (Om Parvat)

उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये असलेल्या ओम पर्वतावरुन ओम प्रतीकच गायब झाले आहे. या घटनेमुळे भगवान शंकराच्या भक्तांना जबर धक्का बसला आहे. हा पर्वत ओम आकाराच्या चिन्हासाठी ओळखला जातो. हे चिन्ह नैसर्गिकरित्या तयार झाले होते. तेच आता गायब झाल्यानं त्यामागे नैसर्गिक कारण आहे, की मानवी हस्तक्षेप अशी चर्चा रंगली आहे. ओम पर्वतावरील ओम चिन्ह उत्तराखंडची ओळख मानली जात असे. उत्तराखंडला देवभूमी मानले जाते. याच देवभूमीवरील ओम पर्वताची ओळख पुसली जाणार असेल तर ही घटना चांगली नाही, अशा प्रतिक्रीया आता व्यक्त होत आहेत. या हिमालयाच्या कुशीतील पर्वतावरी बर्फाचे प्रमाण कमी झाल्यानं त्यावरील ओमही गायब झाल्याचा प्राथमिक अंदाज तज्ञांना व्यक्त केला आहे. यासंदर्भात उत्तराखंड राज्य सरकारनंही एक मार्गदर्शक समिती नेमली आहे. (Om Parvat)

उत्तराखंडच्या पिथौरागढ मधील ओम पर्वत ५,९०० मीटर उंचीवर आहे. आता इथे फक्त काळा डोंगर दिसतो. जागतिक तापमानात झालेली वाढ आणि हिमालयाच्या उंच प्रदेशात होत असलेल्या बांधकामामुळे ही घटना घडल्याचे स्थानिकांचे मत आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावर असलेल्या नाभिडंग येथून ओम पर्वत दिसतो, मात्र गेल्या काही महिन्यापासून येथे फक्त पर्वताचा भाग दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओम पर्वत आणि त्याच्या सभोवतालच्या टेकड्या वर्षभर बर्फाने झाकल्या जात होत्या. परुंतु हिमालयालाही जागतिक तापमान वाढीचा फटका बसत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षापासून स्पष्ट झाले आहे. त्यात ओम पर्वताचाही समावेश आता झाला आहे. ही मोठी धोक्याची घंटा असल्याचे तज्ञांचे मत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ वितळत असेल तर नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होण्याचीही शक्यता आहे. (Om Parvat)

मात्र ओम पर्वतावरील बर्फ गायब होण्यामागे जागतिक तापमानाची पातळी जेवढी कारणीभूत आहे, तेवढाच या भागातील पर्यटनाचा अट्टहासही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षात उत्तराखंडमधील धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे तेथे हॉटेल आणि अन्य सुविधा उभारण्यात येत आहेत. याशिवाय रस्तेही बांधण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे. सतत होत असलेल्या या बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याची ओरड आता होत आहे. ओम पर्वताजवळ सर्वात जवळचे गाव गुंजी आहे. तेथील गांवक-यांच्या म्हणण्यानुसार २०१६ मध्येही ओम पर्वतावर फार कमी बर्फ साठला होता.

======

हे देखील वाचा : अजित पवार – हताश की हुशार?

======

पण असे असले तरी गेल्या काही वर्षात या भागात पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. काही पर्यटक स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत ओम पर्वताच्या जवळपास जाण्याचा अट्टाहास करतात. आता तेथे जाण्यासाठी रस्ताही तयार होत आहे. या सर्वांतूनच आता ओम पर्वताची ओळख असेलेली ओमची प्रतिकृतीच गायब झाली आहे. हिमालयातील हा प्रदेश पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. येथे लोडर मशिन वापरून रस्ते तयार करणे हे धोकादायक आहे. ही विकासकामे त्वरित थांबवली नाहीत तर आणखीही धोका येथील पर्यावरणाला होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. (Om Parvat)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.