गेल्या काही दिवसापासून बातम्यांमध्ये पाकव्याप्त काश्मिरमधील जनतेच्या आंदोलनाचा कायम उल्लेख होत आहे. पाकिस्तानापासून स्वतंत्र होण्यासाठी या भागाचा प्रयत्न चालू आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी पाकिस्तानी पोलीसांनी लाठीमार केला, गोळीबार केला.
मात्र आंदोलकांनी या पोलीसांना हुसकावून लावले आहे. त्यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअऱ झाल्यावर या पाकव्याप्त काश्मिरमधील आंदोलनाचे व्यापक स्वरुप अधिक उघड झाले आहे. एकेकाळी भारताचाच अविभाज्य असलेला हा भाग नेमका कसा आहे, याची उत्सुकता प्रत्येक भारतीयाला आहे. (POK)
काश्मिरला भारताचा स्वर्ग असल्याचा बहुमान देण्यात येतो. मात्र या पाकव्याप्त काश्मिरमधील काही भाग हा काश्मिरपेक्षाही नितांत सुंदर आहे. एकेकाळी या सर्व भागावर महाराजा हरिसिंह यांची सत्ता होती. पाकिस्ताननं काबिज केलेल्या या भागात अनेक हिमशिखरे आहेत. तसेच उपयुक्त धातूंच्या खाणी आहेत. पाकिस्ताननं या भागावर ताबा मिळवला.
मात्र या भागाच्या विकासापेक्षा पाकव्याप्त काश्मिरचा नाश कसा होईल याचाच विचार अधिक केला. त्यामुळेच या भागात कसल्याही सुविधा नाहीत. पण येथील खाणींमधून खनिजांचा उपसा मात्र करण्यात येतो. त्यासाठी येथील तरुणांचा वापर करण्यात येतो. खाणीत काम करण्यासाठी तरुण वर्ग मिळावा म्हणून येथे शिक्षणाच्या सुविधाही नाहीत. यासर्वाला कंटाळून पाकव्याप्त काश्मिरमधील युवक मोठ्या संख्येने अन्य देशात काम करण्यासाठी जात आहेत. आता येथे सुरु असलेल्या आंदोलनामुळे पुन्हा पाकव्याप्त काश्मिरमधील असंतोष आणि तेथील जनतेच्या समस्या जगापुढे आल्या आहेत. (POK)
पाकव्याप्त काश्मीरचे नाव येताच प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्सुकता निर्माण होते. एकेकाळी भारताचा भाग असलेला हा भाग रम्य आहे. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा महाराजा हरिसिंह हे जम्मू-काश्मीरचे राज्यकर्ते होते. त्यांची काश्मिर हा स्वतंत्र देश म्हणून रहावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र पाकिस्तान समर्थक आदिवासींनी महाराज हरिसिंह यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी हरिसिंह यांनी भारतीय लष्कराची मदत मागितली. ही मदत येईपर्यंत काश्मीरचा एक भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणतात. या भागालाही निसर्गाचे वरदान लाभले आहे.
जगातील ८ सर्वोच्च पर्वत शिखरे या प्रदेशात आहेत. ध्रुवीय प्रदेशातील सर्वात मोठा हिमनदी आणि दुसऱ्या क्रमांकाचे देवसाई पठारही याच भागात आहे. खाणींच्या दृष्टीने हा परिसर अतिशय समृद्ध आहे. सोने, अभ्रक, तांबे आणि मौल्यवान खडे येथे मुबलक प्रमाणात आढळतात. यावरच पाकिस्तानची कायम नजर असते. तसंच पर्यटनानुसार, हे जगातील सर्वात सुंदर क्षेत्रांपैकी एक आहे. पण त्याचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून कधीही विकास करण्यात आला नाही. एकेकाळी मौर्य घराण्याची या भागावर सत्ता होती. सम्राट अशोकानेही येथे बौद्ध धर्माचा प्रचार केला. पहिल्या आणि दुसऱ्या शतकात कुशाण घराण्याने येथे राज्य केले. नंतर मात्र हा संपूर्ण भाग मुस्लिम बहुल झाला आहे.
या पीओकेचे एकूण क्षेत्रफळ १३ हजार चौरस किलोमीटर आहे. या भागाची लोकसंख्या ३० लाख आहे. पाकव्याप्त काश्मीरचे प्रमुख राष्ट्रपती आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंतप्रधान आहेत. त्यांचे मंत्रिमंडळही आहे. हे मंत्रिमंडळ स्वतंत्र असल्याचा दावा केला जात असला तरी त्यावर पाकिस्तानी सरकारचा मोठा दबाव आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद आहे. मीरपूर, भिंबर, कोटली, मुझफ्फराबाद, बाग, नीलम, सुधानोटी आणि रावळकोट या ८ जिल्ह्यांव्यतिरिक्त, १९ तहसील आणि १८२ संघ परिषद या भागात आहेत.(POK)
या भागातील बहुतांश नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. मका, गहू ही येथील प्रमुख पिके आहेत. चेरी, सफरचंद, अक्रोड यांच्या मोठ्या बागा या भागात आहेत. या भागात पशुपालनही मोठ्या प्रमाणात होते. येथे कोळसा आणि खडूचे काही साठे आहेत, बॉक्साईटही सापडतो. लाकडापासून अनेक कलाकुसरीच्या वस्तु येथे तयार होतात. येथे पश्तो, उर्दू, काश्मिरी आणि पंजाबी या भाषा बोलल्या जातात. पाकिस्तानी सरकारवर प्रमुख आक्षेप येथील जनतेचा आहे की, येथे शाळा उभारल्या नाहीत. महाविद्यालयांची तर वणवाच आहे. (POK)
===============
हे देखील वाचा : गाडी लॉक किंवा खिडकी बंद करणे पुरेसे नाही, या 5 पद्धतीने कार हकिंगपासून राहा दूर
===============
त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ येथील तरुण मजूर म्हणून युरोप आणि मध्यपूर्वेत जात आहेत. पाकिस्तान इथल्या लोकांचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी म्हणून करत आहे. मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला मुझफ्फराबादमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. मुख्य म्हणजे, मीरपूर, मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील बहुतांश लोकसंख्या मुस्लिम आहे. परंतु गिलगिटच्या मुस्लिमांची जीवनशैली पाकिस्तानी मुस्लिमांपेक्षा वेगळी आहे. या भागातील मुस्लिम प्रामुख्याने शिया, नूरबक्षी, इस्माइली आणि तालिबानी आहेत. नूरबक्षी जगभरात फक्त याच भागात आढळतात. पहारी, पोतवारी, काश्मिरी, हिंदको, स्निहा, पास्तो, गुर्जरी भाषा या या भागात बोलल्या जातात. येथील जनतेची संस्कृतीही वेगळी आहे. त्यामुळेच आम्हाला पाकिस्तानपासून वेगळे करा, अशी मागणी पाकव्याप्त काश्मिरची जनता करीत आहे.
सई बने