अभिनेत्री नूतन यांना आपण ओळखतो ते त्यांच्या अभिनयासाठी आणि रुपासाठी. खरोखरच नूतनजी आजही आपल्याला त्यांच्या रूपामुळे लक्षात राहतात. हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले ते खरोखर एक स्वप्नच म्हटलं पाहिजे. दिग्दर्शकांना बेस्ट देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न होता. त्यांचा एक किस्सा असाच प्रचलित आहे.
नूतन! हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेलं एक सुंदर, सोज्वळ स्वप्न अभिनयाची आणि गोड गळ्याची दैवी देणगी लाभलेली एक अभिजात अभिनेत्री म्हणून आपण बघितलं आहे. एवढ्या मोठ्या कलाकार असूनही पण त्यांना कधीच गर्वाचा लवलेशही नव्हता.त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक वेगळंच मार्दव होतं.
साधे कपडे-साधी राहणी-चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न स्मितहास्य हे त्यांचे वैशिष्ट्य. खरं मोठेपण म्हणजे काय हे त्यांच्या वागण्याबोलण्यातून शिकायला मिळालं आहे. नूतनजीना अभिनयाची जाण तर होतीच, पण दिग्दर्शन, संकलन आणि इतरही सगळ्या तांत्रिक गोष्टींचे त्यांना ज्ञान होतं. प्रत्यक्ष शॉट सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांचा सीन, त्यांचे संवाद, त्यांचा मेकअप, त्यांची कंटिन्यूटी, इतरांची कटिन्युटी, कॉस्च्युम्स, कॅमेरा अँगल, लाईटस सगळं काही माहीत असायचं. त्यांना वेगळं सांगायलाच लागायचं नाही. त्यामुळे नूतन सेटवर असल्या, की दिग्दर्शक अगदी निर्धास्त असायचे.
नूतनजीचा एक खूप मोठा गुण म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा, कुठेही जायचं असेल, काम असेल, नाही तर नसेल, पण ठरलेल्या वेळीच पोहोचायचं, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांच्यासाठी कधीही, कोणालाही लावायला लागू नये, याची त्या नेहमीच काळजी घ्यायच्या. शूटिंगच्या वेळी तर, सातची शिफ्ट असेल, तर सातला, नऊची गिफ्ट असेल, तर नऊला, त्या मेकअप, गेटअप्स सकट त्या रेडी असायच्या. तुम्ही केव्हाही शॉटसाठी बोला त्या तयार असायच्या. एकदा महेश भट्टच्या ‘नाम’ चित्रपटाचे शूटिंग होतं. सकाळी नऊची शिफ्ट होती. नूतन नऊ वाजता नेहमीप्रमाणेच ‘रेडी’ होत्या. नऊ साडेनऊ झाले, दहा साडेदहा – अकरा. शूटिंग सुरू होण्याची काही लक्षणे दिसत नव्हती.
निर्माता राजेंद्रकुमार आणि दिग्दर्शक महेश भट्ट बंगल्यासमोरच्या बागेत खुर्ची टाकून गप्पा मारत बसले होते. थोड्या वेळाने महेश भट्टने नूतनजींचे दोन-तीन ‘सोलो शॉंटस् उसकून घेतले. लंच ब्रेक झाला. सकाळपासून काहीही काम झालं नव्हतं. कारण कुमार गौरव सेटवर आलेलाच नव्हता. मात्र यावर नूतनजींची भूमिका वेगळीच होती याचा राग नाही येत नाही का विचारल्यावर त्या हसल्या. शांत सुरात म्हणाल्या – “अजिबात नाही. हा सुद्धा या व्यवसायाचाच एक भाग आहे; आणि मी तक्रार का करू? निर्मात्याने माझी डेट घेतलेली आहे. या वेळेवर त्याचा हक्क आहे. त्याने सांगितलेल्या वेळी सेटवर हजर राहणं, हे माझ कर्तव्य आहे. मला कधी शॉट्साठी बोलवायचं, हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे.” याचबरोबर त्यांची अट अशीच असायची की पॅकअपनंतर त्या एक मिनिटसुद्धा कधी सेटवर थांबायच्या नाही. सगळ्या निर्माता-दिग्दर्शकांना मला ‘साईन करताना ही अट मान्य करावीच लागली होती. संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी अगदी कटाक्षाने ही अट पाळली होती.
प्रत्येक नियमाला अपवाद असतोच, या न्यायाने त्यांनी त्यांची ही अट एकदा आपणहून मोडली होती, तीसुद्धा हषिकेश मुखर्जीसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शकासाठी! ‘अनाड़ी’च्या वेळी. नूतनजी सकाळी साडेनऊच्या ठोक्याला मेकअप करून सेटवर हजर असायच्या. सेटवर पोहोचायला त्यांना कधी एका सेकंदाचाही उशीर व्हायचा नाही. फक्त, संध्याकाळी साडेसहाच्या ठोक्याला हृषिदांना त्यांना सोडावं लागत असे. पण या सगळ्या प्रकारात राज कपूरचीसुद्धा एक अट होती. त्याने हृषिदांना सांगितलं होतं- “मी तुमच्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत काम करीन. पण तुम्ही मला सकाळी लवकर सेटवर यायला सांगू नका. मला ते जमणार नाही, कारण मला सकाळी लवकर उठता येत नाही.” हृषीदांनी राज कपूर यांची अटही मान्य केली होती.
नूतन आणि राज कपूर, दोघांच्या अटी पाळायच्या असल्यामुळे शूटिंगच्या वेळी शॉटस् लावताना खूप विचार करावा लागायचा. मग ते सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत नूतनजींचे एकटीचे शॉटस् घ्यायचे, दुपारी दोन ते संध्याकाळी साडेसहापर्यंत नूतनजी आणि राज कपूरचे एकत्र शॉट घ्यायचे आणि साडेसहानंतर राज कपूरचे एकट्याचे शॉटस् घ्यायचे. व्यवस्थित प्लॅनिंग’ केल्यामुळे त्यावेळी फारशी अडचण आली नाही.
एकदा मात्र फार पंचाईत झाली होती. ते नूतन आणि शुभा खोटेच्या एका सीन चित्रीकरण करत होते. त्यांनी दोघांना सीन समजावून सांगितले. घड्याळ बघितलं, तर सहा वाजून पंचवीस मिनिट झाली होती. ठरल्याप्रमाणे साडेसहा वाजता नूतनजीना सोडायचं होतं. त्यावेळी दिग्दर्शक म्हणाले “खरं म्हणजे मला हा शॉट थोड्या वेगळ्या पद्धतीने द्यायचा होता. इथे ‘क्रेत शॉट’ घेता आला असता, तर बरं झालं असतं. पण आता ते शक्य नाहीये, कारण सहा पंचवीस होऊन गेले आहेत.” नूतनजी चटकन् म्हणाल्या,
“काही हरकत नाही. तुम्हाला हवा तसा शॉट घ्या.” एवढं होईपर्यंत सहा वाजून अठ्ठावीस मिनिटं झाली होती. तसं पाहिलं, तर शॉट अगदीच छोटा होता. शुभा खोटे नूतनला विचारते- ‘है, मग?’ आणि नूतन एका वाक्यात तिला उत्तर देते. एवढा साधा शॉट दोन मिनिटांत सहज ओ. के. झाला असता. ‘काहीही झालं, तरी मी तुला साडेसहा वाजता सोडणार,’ असं हृषीदांनी म्हटल्यावर नूतनजी काहीच बोलल्या नव्हत्या. शॉट सुरू झाला.
शुभा खोटे नूतनला विचारते ‘ह, मग?’ त्या शांतपणे म्हणाल्या- ‘अगले शॉट में बताऊँगी!”हृषिदांना नाइलाजाने शॉट कट करावाच लागला. त्या दिवशी नूतनजींनी स्वतःच स्वत ची अट मोडली होती आणि साडेसहानंतर थांबून, हषिदांना ज्या पद्धतीने शॉट घ्यायची इच्छा होती, त्याच पद्धतीने त्यांना शॉट घ्यायला लावलं होतं. त्यावेळी नूतनजींच्या वागण्याचे चांगलेच कौतुक झाले होते.
– भूषण पत्की (Bhushan Patki)