अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्ता सोडण्याचे आवाहन केले आहे. शिवाय अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवला असून ‘डार्क फ्लीट’ ऑपरेशन राबवल्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. मादुरो यांनी व्हेनेझुएलाची सत्ता सोडावी म्हणून डोनाल्ड ट्रम्प या देशावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचीही बातमी आहे. या सर्वात निकोलस मादुरो ही आपल्या देशाच्या बचावासाठी युद्धसज्ज होत आहेत. मादुरोंना रशिया आणि चीनच्या पाठिंबा आहे. मादुरो यांनी अमेरिका, व्हेनेझुएलामध्ये करत असलेल्या हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी एक पत्रकार परिषद केली. यामध्ये मादुरो यांनी ट्रम्प यांच्या स्वार्थी धोरणाची पोलखोल केली. पण या पत्रकारपरिषदेमध्ये मादुरो यांच्या हातात असलेल्या एका धाग्यानं अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले. मादुरो यांच्या हातात असलेला हा धागा नेमकं कशाचे प्रतिक आहे, याचा शोध मग सुरु झाला. हा शोध चक्क भारतात येऊन थांबला. भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपार्थी या गावात निकोलस मादुरो हे काहीवेळा आल्याचेही उघड झाले. मादुरो येथे फक्त एकटेच नाही, तर व्हेनेझुएलाच्या मंत्र्यानाही घेऊन आले आहेत. व्हेनेझुएलाचे हे राष्ट्राध्यक्ष आंध्रप्रदेशमधील ज्या पुट्टपार्थी गावात येतात, तिथेच सत्य साईबाबा यांचा प्रशांती निलयम म्हणून भव्य आश्रम आहे. मादुरे हे सत्यसाईबाबांचे परम भक्त असून ते त्यांच्या आश्रमाला भेट देतातच शिवाय त्यांच्या कार्यालयात सत्य साईबाबांची भव्य अशी प्रतिमाही आहे. त्यांच्याच नावाचा रक्षाधागा मादुरो यांच्या मनगटावर आहे. ( Nicolas Maduro )

Nicolas Maduro
अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात तणाव वाढला आहे. यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना राजीनामा द्यावा, असा आदेशच दिला आहे. मादुरो हे ट्रम्प यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिले आहेत. अशातच आता मादुरो हे अमेरिकेचा कशाप्रकारे प्रतिकार करणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. सोबतच मादुरो हे कशाप्रकारे सत्य साईबाबांचे भक्त झाले, याचीही चर्चा सुरु झाली आहे. निकोलस मादुरो हे कॅथोलिक धर्मात वाढले आहेत. त्यांची आणि सत्य साईबाबांची २००५ साली प्रत्यक्ष भेट झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सेलिया फोर्ब्स याही होत्या. या पहिल्या भेटीतच मादुरो, सत्यसाईबाबांच्या विचारांनी भारावले गेले, त्यांनी स्वतःला सत्यसाईबाबांचा अनुयायी म्हणून घोषित केले. याशिवाय सत्यसाईबाबांच्या विचारांचा आपल्या जीवनावर खोल आध्यात्मिक प्रभाव पडल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
या पहिल्या भेटीनंतरच मादुरो यांनी सत्यसाईंचा फोटो आपल्या केबिनमध्ये लावला आहे. निकोलस मादुरो यांच्यावर सत्यसाईंच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी भारतातील त्यांच्या आश्रमाला अनेकवेळा भेट दिली आहे. तेव्हा त्यांच्यासोबत तेथील अनेक मंत्री, अधिकारीही प्रशांती निलयममध्ये आले आहेत. त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये साई बाबा चळवळ सक्रिय झाली असून आत्ताही साई बाबांचे हजारो भक्त व्हेनेझुएलामध्ये आहेत. १९७४ मध्ये कराकस येथे पहिले साई सेंटर उघडण्यात आले. १९८७ मध्ये मानवी मूल्यांमध्ये शिक्षण यासाठी शिक्षकांसाठी पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली. तेथील साई ट्रस्ट गरजूंसाठी वैद्यकीय शिबिरे, एक शाळा आणि मानवी मूल्ये संस्था चालवते. सत्यासाईबाबांच्या महासमाधीनंतर एक महिन्यात व्हेनेझुएलाच्या विधानसभेने शोक प्रस्ताव मंजूर केला. आता २४ मे २०११ हा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणूनही घोषित करण्यात आला आहे. ( Nicolas Maduro )
सत्यसाईबाबांच्या विचारांचा प्रभाव असणा-या मादुरो यांचा सगळा प्रवासही लक्षणीय आहे. तिस-यांदा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष झालेले मादुरो यांची जगभरात प्रतिमा हुकूमशाही नेता अशी आहे. पण याच मादुरो यांनी किती मोठा संघर्ष केला आहे, याची जाणीव फारशी कोणाला नाही. मादुरोंचा जन्म व्हेनेझुएलातील कराकस येथे एका कॅथोलिक कामगार वर्गाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक प्रमुख ट्रेड युनियनिस्ट होते. मादुरो यांनी बस ड्रायव्हर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ह्युगो चावेझच्या युनायटेड सोशलिस्ट पार्टीमध्ये सामील झाले. पक्षाच्या कामगार संघटनांमधून उदयास येत असताना, २००० मध्ये ते पहिल्यांदा व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेत निवडून आले. ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर ते २०१३ मध्ये व्हेनेझुएलाचे अध्यक्ष झाले आहेत.
=======
हे देखील वाचा : Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण
=======
व्हेनेझुएलाचे सर्व आर्थिक गणित तेथील तेलांच्या साठ्यांमध्ये आहे. प्रचंड तेल साठ्यांमुळे ओळखले जाणारे व्हेनेझुएला आता गंभीर आर्थिक संकटात आहे. या देशात नैसर्गिक संसाधनांची विपुलता असूनही, नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. मादुरोच्या सरकारने पेट्रोलियमसह प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले आहे. या निर्णयामुळे व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचा आरोप आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, राष्ट्राध्यक्ष मादुरो ड्रग्ज कार्टेल चालवतात. मादुरोंची सत्ता बदलण्यासाठी अमेरिकेने शेकडो प्रयत्न करूनही, मादुरो यांची सत्तेवर मजबूत पकड आहे. व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा पर्यायानं ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. यात त्यांच्यासाठी मादुरो अडसर ठरत आहेत. सत्यसाईबाबांचे परम भक्त असलेल्या या मादुरोंची सत्ता ट्रम्प खरोखरच उलथून टाकणार का, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ( Nicolas Maduro )
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
