इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा पुन्हा चर्चेत आला आहे. जेव्हा इस्रायलमधील तरुण गाझा मधील हमास युद्धात प्राणपणानं लढत आहेत, तेव्हाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा ३२ वर्षीय मुलगा नेमका कुठे आहे, असा प्रश्न विचारला जात होता. आता काही दिवसांपूर्वी हा नेतन्याहू यांचा मुलगा अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये अंगरक्षकांच्या वेढ्यात बसलेला आढळून आला. यायर याचे फोटो प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाले आणि इस्रायलमध्ये नेतन्याहू यांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले. यानंतर नेतन्याहू यांनी आपल्या कुटुंबाला हमासच्या अतिरेक्यांपासून धोका असून संपूर्ण कुटुंबियांसाठी अधिक सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये नेतन्याहू यांच्यावर टीका करण्यात येत आहे. (Netanyahu Son)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा यायर हा अमेरिकेत आहे. इस्रायली अंगरक्षकांच्या घे-यात फ्लोरिडा येथील एका इमारतीमध्ये तो राहत असून त्याच्या संरक्षणाचा महिन्याचा खर्च लाखो डॉलरमध्ये आहे. आज शेकडो इस्रायली तरुण गाझामधील हमास विरुद्ध युद्धात आपले प्राण देत असतांना देशाच्या पंतप्रधानांचा मुलगा दुस-या देशात अंकरक्षकांच्या सोबत राहत असल्यामुळे संपूर्णच नेतन्याहू कुटुंबावर टीका करण्यात येत आहे. कारण इस्रायलच्या कायद्यानुसार तेथील तरुणांना ४० वर्षापर्यंत लष्करासोबत काम करावे लागते. जर देशाला गरज असेल तर या तरुणांना लष्कारात भरती करुन घेण्यात येते.
इस्रायलवर जेव्हा हमासनं हल्ला केला तेव्हा अनेक इस्रायली तरुण परदेशातून आपल्या देशात परत आले आणि लष्करात भरती झाले. हेच तरुण आता गाझापट्टीत लढत आहेत. हमासच्या अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईत ते पुढे आहेत. अशा परिस्थितीत यायर नेतन्याहू मात्र परदेशात सुरक्षा रक्षकांच्या घे-यात अमेरिकेतील अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध सुरू झाल्यापासून यायर अमेरिकेत असल्याची माहिती आहे. यायर, व्यवसायाने पॉडकास्टर आहे. नेतन्याहू यांची तिसरी पत्नी सारा यांचा तो मुलगा आहे. इस्लामविरोधी सोशल मीडिया पोस्टमुळे तो यापूर्वीही अनेकवेळा वादात सापडला आहे. (Netanyahu Son)
पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर टीका सुरु झाल्यावर त्यांनी आपले संपूर्ण कुटुंबच अतिरेक्यांचे पहिले लक्ष असल्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी पत्नी आणि मुलांसाठी आजीवन सुरक्षेची मागणी केली आहे. कारण नेतन्याहू यांना इस्रायलमध्ये विरोध वाढत आहे. हा त्यांचा पंतप्रधानपदाचा अखेरचा कालखंड आहे. इस्रायलच्या कायद्यानुसार पंतप्रधानपद सोडल्यानंतर केवळ ६ महिन्यांसाठी सुरक्षा मिळते. त्यामुळे नेतन्याहू आपल्या कुटुंबासाठी सुरक्षेतेची आधिच तजवीज करुन ठेवत आहेत. इस्रायलचा इतिहास पाहिला तर पंतप्रधानांचा कार्यकाल अद्याप पर्यंत युद्धानंच संपला आहे. ज्या पंतप्रधानांच्या काळात युद्ध झाले, त्यांना खुर्ची सोडावी लागली आहे. इस्रायलच्या इतिहासात अशी घटना तीनवेळा झाली आहे. त्यामुळे नेतन्याहू यांनाही आपली खुर्ची सोडावी लागणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत ते स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी चिंतीत आहेत. (Netanyahu Son)
===========
हे देखील वाचा : कामाख्या देवीच्या अंबुबाची मेळ्यातील चमत्कारिक गोष्टी
===========
नेतन्याहू यांनी तीनवेळा लग्न केले आहे. नेतन्याहू यांचे पहिले लग्न मिरियम वेझमन यांच्याशी झाले आहे. लष्करी सेवेत असतांना नेतन्याहू आणि वेझमन यांचा परिचय झाला. जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्राची पदवी पूर्ण केली आहे. या जोडप्याला नोआ नावाची एक मुलगी आहे. नेतन्याहू यांची दुसरी पत्नी फ्लेअर केट्स नावाची ब्रिटीश महिला आहे. लग्नानंतर त्यांनी यहुदी धर्म स्विकारला. त्यांची तिसरी पत्नी, सारा ही मानसशास्त्रात पदवीधर आहे. नेतन्याहू आणि सारा यांचे १९९१ मध्ये लग्न झाले. या जोडप्याला यायर आणि एव्हनर नावाची दोन मुले आहेत. याच यायरवरुन नेतन्याहू यांच्यावर अनेकवेळा टीका झाली आहे. (Netanyahu Son)
नेतन्याहू यांनी आपल्या दोन्ही मुलांना युद्धापासून वेगळे ठेवल्याची ओरड आता होत आहे. नेतन्याहू यांचे वडीलही सैनिक होते. त्यांचा मोठा भाऊ युद्धात मारला गेला आहे. सैनिकाची पाश्वभूमी असलेल्या कुटुंबातील पंतप्रधान आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करीत आहेत. सध्या इस्रायलमध्ये स्वतःचा देश वाचवण्यासाठी परदेशात असलेले अनेक तरुण परत आले आहेत. या तरुणांनी आपल्या नोकरीवर आणि कुटुंबावरही पाणी सोडले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा मुलगा मात्र दुस-या देशात सुरक्षारक्षकांच्या सोबत फिरतांना पाहून नेतन्याहूंवर टीका करण्यात येत आहे.
सई बने