जागतिक युवा कौशल्य दिन आज बुधवारी (१५ जुलै) रोजी सर्वत्र साजरा केला जाणार असून यानिमित्त राज्य शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत असलेली बेरोजगारी दूर करुन गरजूना प्रशिक्षण आणि त्यानंतर योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग संकल्प करीत असून विभागामार्फत यासाठी व्यापक कार्य केले जाईल अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मंत्री नवाब मलिक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या काळात दुर्भाग्यवश अनेकजण रोजगारापासून वंचित झाले असून ते सर्वांसमोरच मोठे आव्हान आहे. या आव्हानावर मात करुन सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन व्यापक प्रयत्न करित आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या नावात आता रोजगाराचाही समावेश करण्यात आला आहे. नोकरी इच्छूक उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयंम आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. सध्याची लॉकडाऊनची स्थिती बघता राज्यभरात ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. कौशल्य विकास विभाग याचे समन्वय करीत आहे. याशिवाय शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच रोजगार इच्छूक तरुण यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागामार्फत ऑनलाईन समुपदेशन करण्यात येत आहे. आता लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शासनाच्या निर्णयानुसार आयटीआय आणि विविध प्रशिक्षण संस्थांचे प्रवेश सुरु होऊ शकतील. भविष्यात कौशल्य विकासाच्या सर्व प्रशिक्षण योजना प्रभावीपणे राबवून राज्यात एकही तरुण रोजगाराशिवाय राहणार नाही यासाठी विभाग प्रयत्न करेल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज (१५ जुलै) विविध ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्यामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष फ्रॅमरोझ मेहता, सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदीना रामचंद्रन आदी सहभागी होणार आहेत.
सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत बेरोजगार तरुणांसाठी ब्युटी आणि वेलनेस, विविध घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बेकरी, ज्वेलरी डिझाईन, माध्यमे, करमणूक आणि क्रिडाविषयक अशी विविध कौशल्य प्रशिक्षणे दिली जातात. सध्या विद्यार्थ्यांना ही प्रशिक्षणे ऑनलाईन दिली जातात. या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या वेबिनारमध्ये या मोहीमेचा ऑनलाईन प्रातिनिधिक शुभारंभ करण्यात येणार आहे.
याशिवाय राज्यातील विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमार्फतही आज ऑनलाईन संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. मंत्री नवाब मलिक हे राज्यातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. फेसबूक लाईव्ह संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संवाद आज दुपारी ३ वाजता फेसबुकवर www.facebook.com/dvetms या पेजवर तसेच युट्यूबवर DVET E-Learning Channel या चॅनलवरुन होणार आहे.