आंध्रप्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणा-या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचे स्पष्ट झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्वतः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिलीच शिवाय प्रयोगशाळेचा अहवालही सार्वजनिक केला. यातून तिरुपती बालाजींच्या लाडवांमध्ये भेसळ असल्याची पुष्टी मिळाली. नायडू सरकारनं आता या प्रसादांच्या लाडवांसाठी वापरण्यात येणा-या तुपाच्या कंपनीमध्ये बदल केला आहे. गेल्या 50 वर्षापासून तिरुपती बालाजीचे लाडू कर्नाटक येथील नंदिनी तुपामध्ये तयार करण्यात यायचे. मात्र या नंदिनी दुधाच्या किंमती वाढल्या. परिणामी या तुपाच्याही किंमती वाढल्या. त्यामुळे बालाजी मंदिर ट्रस्टनं नंदिनी तुपाचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. त्याजागी कोणती तुपाची कंपनी येईल, हे निवडण्यासाठी जाहीर निविदा काढण्यात आल्या. (Nandini Ghee)
मात्र यातील सर्वात स्वस्तमध्ये तुप देणारी कंपनी निवडण्यात आली. अर्थात त्या कंपनीनं केलेला घोळ आणि त्यानंतर बालाजी भक्तांमधील तीव्र संताप सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बालाजींच्या प्रसादासाठी नंदिनीचे तुप मागवले आहे. या नंदिनी तुपाचा ब्रॅण्ड नेमका कुठला आहे, हे आपण जाणून घेऊया. तिरुमला तिरुपती देवस्थानम गेल्या 50 वर्षापासून प्रसादाच्या लाडवांसाठी ‘नंदिनी’ ब्रँडचे तूप वापरत होते. हा नंदिनी तुपाचा ब्रॅण्ड कर्नाटक राज्यातील आहे. ज्याप्रमाणे गुजतरामध्ये अमूल ब्रॅण्डचा दबदबा आहे, तसाच दबदबा दक्षिण राज्यात या नंदिनीचा आहे. वास्तविक नंदिनी म्हणजे, कर्नाटक मिल्क फेडरेशन. हे फेडरेशन ‘नंदिनी’ या नावाने दूध, दही आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते. दक्षिण भारतातील प्रत्येक घरात ‘नंदिनी’ च्या उत्पादनांची लोकप्रियता आहे. (Nandini Ghee)
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यातही या ब्रॅण्डची उत्पादने वापरली जातत. कर्नाटक कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेडच्या मालकीचा हा नंदिनी ब्रँड आहे. आपल्या देशातील दुस-या क्रमांकाची दूध उत्पादन फेडरेशन म्हणून नंदिनी ब्रॅंडचे नाव घेतले जाते. पहिल्या क्रमांकावर गुजरातमधून अमूलचे उत्पादन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा नंबर कायम आहे. कर्नाटक नंदिनीच्या मार्फत श्वेतक्रांती घडवण्यात आली. एकेकाळी कर्नाटकमध्ये दुधाची तीव्र टंचाई जाणवत होती. यातून कर्नाटकमध्ये सहकार चळवळ उभी राहिली. आज या चळवळीचा दबदबा देशभर आहे. कर्नाटकमध्ये 1955 साली पहिली सहकारी दुग्धशाळा कोडागु जिल्ह्यात उघडली गेली. हा काळ वेगळा होता. तेव्हा पिशवीतील दुधाची संकल्पना माहितीही नव्हती आणि ती स्विकारलीही जात नव्हती. अशात दुधाचा व्यापार करणारे शेतकरी घरापर्यंत दुध घेऊन जायचे. (Nandini Ghee)
याच काळात दुष्काळ आणि अन्य आपत्तीमुळे दुधाचीही मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत होती. या सर्वांवर मात करत कर्नाटकमध्ये 70 च्या शतकात दुग्धक्रांती झाली. जागतिक बँकेचे सहकार्य घेतले गेले आणि अनेक दूध प्रकल्प सुरु झाले. या सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी 1974 मध्ये कर्नाटक सरकारनं राज्यात कर्नाटक डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली. ही घटना कर्नाटकच्या दुग्ध क्रांतीमध्ये महत्त्वाची ठरली. त्यानंतर दहा वर्षांनी 1984 मध्ये डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे नाव बदलून कर्नाटक मिल्क फेडरेशन झाले. दुधाचे उत्पादन वाढवण्यावर यातून भर दिला, तसेच दुधाचा पुरवठा करण्याच्या नव्या योजनाही पुढे आल्या. त्यातूनच नंदिनी नावानं पॅकेज दूध बाजारात आले. स्थापनेपासून नंदिनीची विश्वासार्हता ही जनसामान्यांपर्यंत होती. त्यामुळेच काही काळातच नंदिनी हे नाव फक्त कर्नाटकमध्ये नाही, तर संपूर्ण दक्षिण भारतात नंदिनी म्हणजे, विश्वासाची उत्पादने असे म्हटले गेले. (Nandini Ghee)
आता कर्नाटकच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विश्वात नंदिनीचे वर्चस्व आहे. कर्नाटक दूध महासंघ राज्यातील 15 दुग्ध संघांचे नेतृत्व करतो. या दुग्ध संघटना जिल्हास्तरीय दुग्ध सहकारी संस्थेमार्फत गावोगावी दूध खरेदी करतात आणि नंतर ते वितरीत करतात. कर्नाटकातील 24000 गावांतील 26 लाख शेतकऱ्यांकडून दररोज 86 लाख लिटर पेक्षा जास्त दूध खरेदी केले जात आहे. कर्नाटक मिल्क फेडरेशन शेतकऱ्यांना रोजच्या दुधाचे रोज पैसे देते. कारण यात अनेक लहान शेतकरी आणि दूध उत्पादक आहेत. (Nandini Ghee)
======
हे देखील वाचा : तिरूपती मंदिराच्या प्रसादात वापरली जात होती प्राण्यांची चरबी ?
======
रोज पैसे हाती मिळत असल्यानं शेतकरीही खूष असतात. दूध मिळाल्यावर कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या 15 युनिट्स मधून दुधावर प्रक्रिया करण्यात येते. मग नंदिनीच्या नावाखाली दूध, दही, लोणी, चीज, फ्लेवर्ड मिल्क, चॉकलेट, रस्क, कुकीज, ब्रेड, नमकीन, आईस्क्रीम इत्यादी 148 हून अधिक उत्पादनांची निर्मिती होते. 2022-23 या आर्थिक वर्षात कर्नाटक मिल्क फेडरेशनची एकूण उलाढाल 19,784 कोटी रुपये होती. सध्या कर्नाटक प्रशासकीय सेवा अधिकारी एस. के. जगदीश हे फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत. याच नंदिनीचे तुप आता पुन्हा तिरुपती बालाजींच्या प्रसादात वापरले जाणार आहे. (Nandini Ghee)
सई बने