आपल्या देशातील राजकारण अनेकदा खूप खालची पातळी गाठतं. अनेकदा अशा घटना घडतात ज्यामुळे राजकीय नेत्यांवरील आपला विश्वास डळमळायला लागतो. मात्र अशा वेळी आपल्या देशात होऊन गेलेले अनेक राजकीय नेते असे असतात ज्याची आठवण आपल्याला या परिस्थितीत कायम होत असते. याच नेत्यांची उदाहरणं पुन्हा पुन्हा देउन भारताच्या राजकारणात काही चांगली माणसं देखील होऊन गेली हि गोष्ट लक्षात आणून दिली जाते. यातीलच दोन महत्वाची नावं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधी विचारधारेचे, विरोधी पक्षांचे मात्र एक वेळ अशी आली होती कि जेव्हा नेहरूंनी अटल बिहारींच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला होता. नेमका तो किस्सा काय होता बघुयात. (Pandit Jawaharlal Nehru)
तर नेहरू जेव्हा शिखरावर होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांची फक्त सुरवात होती. पहिल्याच निवडणुकीत म्हणजे 1952 मध्ये लखनौमधून पहिली निवडणूक हरलेले अटलबिहारी वाजपेयी यांना 1957 मध्ये जनसंघाने पुन्हा उमेदवारी दिली होती. यावेळी मात्र जनसंघ सेफ गेम खेळत होता. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयींना एका जागेवरून नव्हे तर प्रत्येकी तीन जागांवरून निवडणूक लढवायला लावली होती. लखनौ, मथुरा आणि बलरामपूर या जागा होत्या. जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर जनसंघाकडे पक्षाचा दृष्टिकोन संसदेत मांडू शकेल असा एकही चांगला वक्ता किंवा नेता नव्हता. अशावेळी वाजपेयी 1952 च्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरीही वाजपेयी संसदेत पोहोचावेत अशी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची इच्छा होती. आणि त्यामुळेच यावेळी वाजपेयींनसाठी अशी व्यवस्था करण्यात आली होती.
ज्याचा वाजपेयींना फायदाही झाला. लखनौ, मथुरामध्ये पराभव झाला असला तरी वाजपेयी बलरामपूरमधून खासदार झाले. संसदेतही त्यांनी चांगली छाप पाडली.अवघ्या ३३ वर्षांच्या वाजपेयीचं वक्तृत्व आणि विषयांचा अभ्यास पाहून नेहरूही चकित झाले. मात्र त्याचवेळी वाजपेयींना वेगवेगळ्या शिष्टमंडळांचा भाग बनवून त्यांना समित्यांमध्ये स्थान देऊन नेहरूंनी त्यांना प्रोत्सहन पण दिलं. मात्र नेहरूंना निवडुकीच्या रिंगणात मात्र वाजपेयींना विरोध करावा लागणार होता. त्यातच बलरमपूरमधील मागची निवडणूक हि हिंदू मुस्लिम अशी झाली होती. अखिल भारतीय रामराज्य परिषदेचे संस्थापक दशनामी साधू कर्पात्री महाराज यांनी वाजपेयींना पाठिंबा दिला होता. बलरामपूरमध्ये हिंदूंची मोठी लोकसंख्या होती आणि त्या लोकसंख्येवर करपात्री महाराजांचा बराच प्रभाव होता. (Pandit Jawaharlal Nehru)
1957 मध्ये अटलबिहारी वाजपेयींनी निवडणूक लढवली तेव्हा करपात्री महाराजांनी अटलबिहारी वाजपेयींना पाठिंबा दिला होता. वाजपेयी हे बलरामपूरच्या लोकांसाठी नवीन होते आणि बाहेरचेही होते. मात्र त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार हैदर हुसेन होते. जनसंघ आणि कर्पात्री महाराजांनी ही संपूर्ण निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी केली आणि वाजपेयींनी ती निवडणूक जिंकली होती.आता मात्र १९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या लीडरशीपने या निवडणुकीत लक्ष घातलं. या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या मुस्लिम उमेदवाराच्या जागी एक हिंदू-ब्राह्मण महिला उमेदवार सुभद्रा जोशी यांना उभे केले. सुभद्रा जोशी या कर्नालच्या सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या होत्या. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुभद्रा जोशी यांना बलरामपूरमधून वाजपेयींच्या विरोधात निवडणूक लढवण्यास सांगितले.
====================
हे देखील वाचा : जेव्हा जिनांनी टिळकांचं वकीलपत्र घेतलं होतं
====================
सोबतच जोशींचा प्रचार करण्यासाठी दो बिघा जमीन सिनेमाद्वारे देशभरात आपली छाप पाडणारे अभिनेते बलराज साहनी यांना मैदानात उतरवले. निवडणूक प्रचारादरम्यान बलराज साहनी यांनी प्रचंड जनसमुदाय काँग्रेसच्या बाजूने जमवला. आणि निकाल लागला तेव्हा राजकारणात नव्याने आलेल्या सुभद्रा जोशी यांनी प्रस्थापित राजकारणी आणि खासदार वाजपेयी यांचा निवडणुकीत पराभव केला होता. या निवडणुकीत सुभद्रा जोशी यांनी वाजपेयी यांचा २०५२ मतांनी पराभव केला. (Pandit Jawaharlal Nehru)
पण या निवडणुकीत इंटरेस्टिंग गोष्ट झाली ती म्हणजे पंडित नेहरू सुभद्रा जोशींनी विनंती करूनही प्रचाराला आले नाहीत. जेव्हा नेहरूंना वाजपेयींविरुद्ध प्रचार करण्यास सांगितले होते, तेव्हा नेहरूंनी प्रचार करण्यास स्पष्ट नकार दिला होता ‘मी हे करू शकत नाही, माझ्यावर प्रचारासाठी दबाव आणू नये. त्यांना परराष्ट्र व्यवहाराची चांगली जाण आहे.’ अशा शब्दात वाजपेयींची प्रशंसा करत नेहरूंनी नकार दिला होता.