Home » चमत्कारी नागवासुकी मंदिर

चमत्कारी नागवासुकी मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Nagavasuki Temple
Share

उत्तरभारतामधील प्रयागराजमध्ये अनेक प्राचीन मंदिर आहेत. याच प्रयागराजच्या संगम तटापासून उत्तरेकडे दारागंजच्या उत्तरेकडील कोपऱ्यावर असलेल्या प्राचीन नागवासुकी मंदिरात हजारो भाविक सध्या गर्दी करीत आहेत. श्रावण महिन्यात येणा-या नागपंचमीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात प्रत्यक्ष नागांचा राजा वासुकी रहात असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हेच मंदिर पाडायला आलेल्या औरंगजेबाला वासुकी नागाच्या चमत्काराचा प्रत्यय आला होता. थेट समुद्रमंथनापासून येथे वासुकी नाग राजाचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची गर्दी होतेच. पण ९ ऑगस्ट रोजी येणा-या नागपंचमीला ही गर्दी लाखोंमध्ये रुपांतरीत होणर आहे. या मंदिराचे महात्म्य एवढे आहे की, प्रयागराजला येणाऱ्या प्रत्येक भाविक आणि यात्रेकरूचा नागवासुकीचे दर्शन होईपर्यंत प्रवास अपूर्ण मानला जातो. (Nagavasuki Temple)

मुघल सम्राट औरंगजेबानं भारतातील अनेक मंदिरांवर हल्ले केले. मंदिरे तोडली आणि देवतांच्या मुर्तींचीही तोडफोड केली. मंदिरातील खजिना लुटला. असाच उद्देश ठेवत औरंगजेबानं प्रयागराजच्या नागवासुकी मंदिरावरही हल्ला केला होता. औरंगजेबानं आपला भाला नागवासुकीच्या मुर्तीवर मारला. मात्र हा भाला मारल्यावर तिथून दुधाची धार वाहू लागली. या चमत्कारामुळे घाबरलेला औरंगजेब बेशुद्ध पडला आणि नागवासुकींची माफी मागत त्यानं काढता पाय घेतला. प्रयागराजच्या या नागवासुकी मंदिराबाबत हा किस्सा नेहमी सांगितला जातो. हे मंदिर चमत्कारीक मंदिर म्हणून ओळखले जाते. याव्यतिरिक्तही अनेक पौराणिक कथा या मंदिरासोबत जोडल्या गेल्या आहेत. अतिशय प्राचीन असे हे नागवासुकी मंदिर संगम किना-यावर आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात मोठी गर्दी होते. भाविक संगम स्थानावर जाऊन या मंदिरात नागवासुकी मंदिरात जाऊन नागराज वासुकीचे दर्शन घेतात.

नागवासुकी मंदिराच्या मध्यभागी वासुकीराजांची काळ्या पाषाणातील मुर्ती आहे. येथे नागवसुकीला शेषराज, सर्पनाथ, अनंत आणि सर्वाध्यक्ष असेही म्हणण्यात येते. कुंभ, अर्ध कुंभ, माघ मेळा आणि नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविक मंदिराला भेट देतात. कुंभमेळ्यात तर हे नागवासुकी मंदिर दिवसरात्र चालू असते. नागपंचमीलाही येथे भाविकांची मोठी गर्दी येत असल्यामुळे मंदिर अहोरात्र चालू असते. नागवासुकी मंदिर हे गंगा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात गंगेला पूर आला की नदिचे पाणी नागवसुकी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचते. ही घटना पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. गंगा नदीच्या पाण्यानं नागवासुकीच्या पाय-यांना स्पर्श केल्यावर नागराज वासुकी यांचा जयजयकार करण्यात येतो. यानंतर भाविक भोगावती तीर्थात स्नान करतात. श्रावण महिन्यात नागवसुकी मंदिरात रुद्राभिषेक, महाभिषेक आणि काल सर्पदोष शांती हे विधीही मोठ्या प्रमाणात केले जातात. (Nagavasuki Temple)

==================

हे देखील वाचा : नागचंदेश्वराचे महात्म्य !

================

या मंदिराबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. देव आणि दानवांनी नागवासुकीला सुमेरू पर्वतामध्ये गुंडाळले आणि समुद्रमंथनाच्या वेळी त्याचा दोरी म्हणून वापर केला. तेव्हा समुद्रमंथनानंतर राजा वासुकीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. यामुळे भगवान विष्णुंनी नागराज वासुकीला प्रयागराज येथे आराम करण्याचा सल्ला दिला. जिथे नागराज वासुकी यांनी विश्राम केला, त्याच जागेवर आज नागवासुकी मंदिर आहे. वर्षाचे बाराही महिने या मंदिरात भाविकांची गर्दी असते. मात्र श्रावण महिन्यात ही गर्दी लाखांपर्यंत जाते. कारण श्रावण महिन्यात नागवासुकी यांची पुजा केल्यावर सर्व अडथळे दूर होतात, अशी समज आहे. शिवाय कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते, असे भाविक मानतात. (Nagavasuki Temple)

त्यामुळेच या नागवासुकी मंदिरात नागपंचमीच्या दिवशी भारतभरातून भाविक येतात. अन्य एका कथेनुसार समुद्रमंथनानंतर ब्रह्माजींनी यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञात नागराज वासुकीही उपस्थित होते. त्यावेळी भगवान कृष्णांनी येथे नागराज वासुकींची स्थापना करावी असे आवाहन केले. तसेच नागपंमीच्या दिवशी तिन्ही लोकांनी येथे पुजा केल्यावर त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील, असे वरदान दिले. या मंदिरात पूजा केल्यास कुष्ठरोगासारख्या रोगापासूनही मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाकुंभ मेळ्यातही या मंदिरात येणा-या भाविकांची संख्या वाढते. महाकुंभदरम्यान अहोरात्र सुरु असलेल्या या मंदिरात मोठे अधिष्ठानही करण्यात येते. (Nagavasuki Temple)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.