एक असे शिव मंदिर ज्या मंदिरावर बारा वर्षांनी वीज पडते. त्यामुळे शिवलिंग दुभंगते आणि मग दुंभगलेल्या शिवलिंगावर पुजारी लोण्याचा लेप लावतात… सारेच अदभूत! अनाकलनीय! हे मंदिर आहे हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथील बिजली महादेवाचे मंदिर.
बिजली महादेवाचे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. हे मंदिर शिवभक्तांबरोबरच ट्रेकींगप्रेमींसाठीही एक मोठे आकर्षण आहे. (Mysterious Shiva Temple)
हिमाचल प्रदेशमध्ये सर्वत्रच निसर्गाची उधळण आहे. याच हिमाचल प्रदेशमध्ये व्यास आणि पार्वती नदीच्या संगमाजवळील एका डोंगरावर हे अनोखे बिजली महादेवाचे मंदिर आहे. कुल्लूपासून २५ किलोमीटर अंतरावर चांसरी गांवाजवळील डोंगरावर २४६० मीटरच्या उंचीवर हे मंदिर आहे. (Mysterious Shiva Temple)
बिजली महादेवाबाबत या भागात काही आख्यायिका आहेत. त्यानुसार, काही हजार वर्षापूर्वी या भागात कुलांन्तक नावाचा राक्षस रहात होता. अजगराच्या रुपातील या राक्षसानं एकदा व्यास नदीचा प्रवाह रोखण्याचा आणि संपूर्ण क्षेत्राला जलमय करण्याचा प्रयत्न सुरु केला. भगवान शंकराला याबाबत कळल्यावर त्यांनी त्यांच्या त्रिशुलांनी कुलांतक राक्षसाचा वध केला. पण त्यानंतर या राक्षसाच्या शरीराचे रुपांतर डोंगरात झाले. याच राक्षसाच्या नावावरुन या भागाला कुल्लू असे नाव मिळाले.
मेल्यावरही या राक्षसानं लोकांना त्रास देऊ नये म्हणून भगवान शंकरानी इंद्रदेवाला विनंती केली आणि दर बारा वर्षांनी येथे वीज पाडण्यास सांगितले. त्यानुसार या डोंगरावर दर बारा वर्षांनी वीजांचा वर्षाव होतो. हा सगळा अग्निकल्लोळ नीलकंठ शंकर आपल्यावर घेतात. त्यातून तिथल्या कुठल्याही सामान्य नागरिकांचे नुकसान होत नाही. मात्र शिवशंकराची पिंड मात्र दुंभगते.
दुभंगलेल्या पिंडीवर येथील पुजारी लोण्याचा लेप लावतात. त्यानंतर ही पिंड पूर्ववत होते. गेली हजारो वर्ष हिच परंपरा येथे अखंड चालू आहे. दर बारा वर्षांनी होणारा वीजवर्षाव आणि त्यानंतरचा सोहळा बघण्यासाठी या भागात हजारो भाविक जमा होतात आणि शिवशंकराच्या नावाचा जयजयकार करतात. (Mysterious Shiva Temple)
====
हे देखील वाचा: भारतामधील ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर – इथे विवाहित पुरुषांना ‘नो एंट्री’
====
बिजली महादेवाचे मंदिरापर्यंत कसे पोहचाल?
कुल्लूच्या बसस्थानकामधून बिजली महादेवाच्या स्थानापर्यंत जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. बस किंवा टॅक्सी करुन चांसरी गावांपर्यंत जावे लागते. चांसरी गावांपासून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. हा एक ट्रेकही आहे.
तीन तासांच्या या ट्रेकमध्ये पाच ते सहा पॉईंटंस आहेत, जिथे भाविक थांबू शकतात. या तीन तासांच्या ट्रेकनंतर डोंगराच्या शिखरावर गेल्यावर सुंदर, विलोभनीय दृश्य दिसते. त्यामुळे ट्रेक केल्याचे समाधानही मिळते.
भाविक असोत किंवा ट्रेकर सर्वांसाठी रहाण्यासाठी व्यवस्था डोंगरावर करण्यात आली आहे. काही भाविक महादेवाचे दर्शन घेऊन परत खाली येतात. मात्र काही भाविक रात्री महादेवाच्या सोबतच रहातात.
====
हे देखील वाचा: Pashupatinath Temple ‘या’ कारणामुळे पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन केल्याशिवाय केदारनाथाची यात्रा पूर्ण होत नाही
====
मंदिराला भेट देण्यासाठी योग्य कालावधी कोणता?
वर्षातील बाराही महिने बिजली महादेवाच्या मंदिरात ट्रेकर्स आणि भाविकांची येजा चालू असते. मात्र ज्यांना बर्फवृष्टी आणि त्यामुळे निर्माण होणारे सौदर्य बघायचे असेल, त्यांच्यासाठी थंडीचे महिने पर्वणी ठरतात. मात्र कोणतीही योजना ठरवताना जाणकारांचे मार्गदर्शन अवश्य घ्या कारण ठंडीमध्ये हा संपूर्ण डोंगर अनेकवेळा पूर्णपणे बर्फाच्छादित झालेला असतो. त्यामुळे डोंगर पार करताना थंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी अनेक आवश्यक साधने सोबत घ्यावी लागतात. अलिकडच्या काळात येथे मोबाईलच्या नेटची सुविधा मिळू लागल्यानं भाविकांची आणखी सोय झाली आहे.
निसर्गाचा दर बारा वर्षांनी होणारा चमत्कार बघण्यासाठी आणि लोण्यांनी साधलेले शिवलींग बघण्यासाठी बिजली महादेवाकडे भाविकांचा आणि ट्रेकर्सचाही ओढा वाढत चालला आहे.
– सई बने