कंगना रणौतचा सूत्रसंचालक म्हणून असणारा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो ‘लॉकअप’ सध्या चांगलाच गाजत आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला शोमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धकांना कंगनासमोर त्यांचे एक गुपित उघड करावे लागते. आतापर्यंत या शो मधल्या स्पर्धकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गुपित गोष्टी जगासमोर उघड केल्या आहेत. या आठवड्यामध्ये कॉमेडियन मुनव्वर फारूकीने असे सत्य सर्वांना सांगितले जे ऐकून सर्व स्पर्धकांसोबतच कंगना रणौतला देखील तिचे अश्रू अनावर झाले होते. मुनव्वर फारूकीने त्याच्या आईच्या मृत्यूचे खरे रहस्य या शोमध्ये सर्वांना सांगितले.
यावेळी मुनव्वर फारूकी म्हणाला की, “माझ्या आईच्या मृत्यू अतिशय भयानक होता. ही घटना जानेवारी २००७ सालातील असून, एक दिवस सकाळी माझी आजी मला म्हणाली की, तुझ्या आईची तब्येत अचानक खराब झाली आहे. मी तिला पोटात होणाऱ्या असहनीय अशा काळासाठी जोरजोरात ओरडताना पाहिले. मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ती खूपच जोरात ओरडत होती. मला सांगितले गेले की, तिने ऍसिड प्यायले आहे. हे ऐकून मला मोठा धक्का बसला.”
पुढे मुनव्वर म्हणाला, “मी हॉस्पिटलमध्ये माझ्या आईचा हात पकडून उभा होतो. तेव्हाच डॉक्टरांनी येऊन सांगितले की, त्यांचा हात सोडा त्यांचे निधन झाले आहे. त्यानंतर माझ्या आईचे पोस्टमोर्टम करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, माझ्या आईने ७/८ दिवस जेवण देखील घेतले नव्हते. मला हे माहित होते की, तिने तिच्या वैवाहिक आयुष्याची २६ वर्ष केवळ दुःख आणि दुःखच सहन करत काढले आहे.”
======
हे देखील वाचा – सिंघम गर्ल काजलने बाळाचे ठेवले ‘हे’ नाव? मावशीने केले जाहीर
======
यादरम्यान मुनव्वरने अजून एक धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, “माझ्या आईचे शारीरिक शोषण देखील झाले होते. माझे वडील सतत तिला मारायचे, तिने अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते. मात्र माझे वडील सतत मजा मस्ती करण्यातच दंग असायचे. त्यांना माझ्या आईची किंवा आमची अजिबातच पर्वा नव्हती.” पुढे त्याने त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नात्याबद्दल देखील सांगितले तो म्हणाला, “माझे पाहिले नाते देखील दुःखाने आणि त्रासाने भरलेले होते. मला शिवीगाळ केली गेली मात्र मी कधीही त्यावर काहीच बोललो नाही कारण मला तिच्याप्रती अनादर दाखवायचा नव्हता. ” एवढा मोठा खुलासा करताना मुनव्वर फारूकी अतिशय जोरजोरात रडत होता. त्याला तिथे असलेल्या अनेकांनी शांत केले. या आठवड्यात या शोमधून मंदाना करिमी बाहेर पडली आहे.