Home » भाजपविरोधी आघाडी : ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ‘खलनायिका’ ठरणार ?

भाजपविरोधी आघाडी : ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ‘खलनायिका’ ठरणार ?

by Team Gajawaja
0 comment
Mamata Banerjee
Share

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)

प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची नुकतीच मुंबईला दिलेली भेट राजकीयदृष्ट्या चांगलीच गाजत आहे. या भेटीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आवर्जून भेट घेऊन देशातील राजकारणाबाबत महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला सक्षम पर्याय म्हणून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची झालेली चर्चा महत्त्वाचीच असावी यात शंका नाही. 

ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घ्यायची होती मात्र ते रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांची भेट घेऊ शकली नाही. त्यांच्याऐवजी ममतांनी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थात शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी या दोन नेत्यांशी केलेली चर्चा केवळ एक औपचारकितेचा भाग असावा असेच दिसते. त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या झालेल्या चर्चेला जास्त महत्व मिळाले.

मात्र त्यानंतर पवार यांच्याबरोबरच पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी ‘युपीए’ च्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष नगण्य असल्याचे दाखवून दिले. मात्र त्याचवेळी शरद पवार यांनी भाजपविरोधी एकजूट करायचीच असेल काँग्रेसला बरोबर घेऊन जाण्याखेरीज पर्याय नाही असे स्पष्टपणे सांगितले. थोडक्यात शरद पवार यांना काँग्रेसचे महत्व कळले आहे. 

महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीचे सरकार टिकवायचे झाल्यास काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे पवार यांना चांगले ठाऊक आहे. मात्र ममता बॅनर्जी काँग्रेसला फारसे महत्व द्यायला तयार नाहीत असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. वास्तविक याच ममता बॅनर्जी एकेकाळी काँग्रेसमध्येच होत्या. मात्र एककल्ली आणि अहंकारी  स्वभावामुळे त्यांनी पुढे जाऊन तृणमूल काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. प. बंगालमधील जनतेने ‘तृणमूल’  ला चांगली साथ दिली आणि त्या सत्तेवर आल्या. केंद्रात पूर्वी ‘युपीए’ची सत्ता असताना त्या केंद्रीय मंत्रिमंडळातही होत्या. परंतु नंतर सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे मतभेद निर्माण झाले आणि काँग्रेसबरोबर त्यांनी फटकून राहण्याचाच निर्णय घेतला. 

सन २०१४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तारूढ झाले. मात्र हेकेखोर स्वभावाच्या ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘पंतप्रधान’ म्ह्णून स्वीकारण्यासच नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य निर्माण झाले.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले मात्र भाजपाला त्यामानाने यश मिळाले नाही.

त्या निवडणुकीत खुद्द ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात भाजपाला यश मिळाले खरे मात्र निवणुकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले. त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्या. त्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकून मुसंडी मारली खरी मात्र भाजपाला अति आत्मविश्वास नडला त्यामुळे भाजपने तृणमूल काँग्रेसला लावलेला सुरुंग  शेवटी फुसकाच ठरला.

प. बंगालमध्ये  पुन्हा ममता बॅनर्जी सत्तेवर येताच भाजपमध्ये गेलेले तृणमूल काँग्रेसचे असंख्य नेते आणि कार्यकर्ते पुन्हा तृणमूल मध्ये परतले एवढेच नाही तर यशवंत सिन्हा , बाबूल सुप्रियोसह भाजपचे माजी मंत्री-खासदारही तृणमूलमध्ये डेरेदाखल झाले  आणि ममता बॅनर्जी यांनी आपला ‘तृणमूल’चा गड आणखी मजबूत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊन प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे साहजिकच देशपातळीवर महत्व वाढले.  त्यातच शरद पवार यांच्यासारख्यांनी मोदीविरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांना महत्व दिल्यामुळे त्यांचीही महत्वाकांक्षा वाढली असावी. त्यातूनच ममता बॅनर्जी  काँग्रेसला कमी लेखले असावे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधी आघाडी करायचे झाल्यास त्याचे नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न साहजिकच निर्माण होणार आहे आणि याचे उत्तर सध्या तरी देणे अवघड आहे.  

आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे देण्यास ममता बॅनर्जी यांचा विरोध असणारच त्यामुळे काँग्रेसही ममता बॅनर्जी यांना फारसे महत्व देणार नाही कारण काँग्रेसच्या दृष्टीने तृणमूल काँग्रेस हा शेवटी प्रादेशिक पक्ष आहे. तृणमूलचे अस्तित्व आता तरी केवळ प. बंगालपुरते मर्यादित आहे. नाही म्हणायला गोवा, त्रिपुरा आदी राज्यात तृणमूल काँग्रेसने अगदी अलीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

मात्र काहीही झाले तरी तृणमूल हा काही काँग्रेससारखा देशव्यापी पक्ष होऊ शकणार नाही. शरद पवार यांना त्याची पूर्ण जाणीव आहे म्हणूनच काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय भाजपविरोधात आघाडी करणे अशक्य आहे असे त्यांचे मत आहे. 

शरद पवार यांच्यासारखा राजकीय शहाणपणा मात्र ममता बॅनर्जी यांना दाखविता आला नाही त्यांनी युपीएच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून काँग्रेसला एकप्रकारे विरोधच केला आहे. त्यामुळे आघाडीबाबत त्यांची भूमिका ‘खलनायिकेचीच ठरण्याची शक्यता आहे.  कणखर नेतृत्वाअभावी देशपातळीवर काँग्रेस पक्ष सध्या विस्कळीत झाला असला तरी जनतेने मनावर घेतल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन  व्हायला वेळ लागणार नाही. निवडणुकीच्या इतिहासात थोडे मागे वळून पाहिल्यास त्याची प्रचिती येते. 

काँग्रेसला देखील हाच विश्वास असावा त्यामुळेच मोदींविरोधात सध्या तरी काँग्रेसने ‘एकला चलो रे ‘ चेच धोरण स्वीकारलेले दिसते. मात्र तशीच वेळ आल्यास आणि आघाडी झाल्यास काँग्रेस हा देशव्यापी पक्ष असल्यामुळे तो इतर (प्रादेशिक) पक्षांचे नेतृत्व स्वीकारणार नाही हे उघडच आहे.  यदाकदाचित काँग्रेस वगळून तिसरी आघाडी झालीच तर  त्याचा भाजपलाच फायदा होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे.  त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी प्रामाणिकपणे आणि सर्वसमावेशक धोरण आखूनच भाजपविरोधी आघाडी निर्माण केली तरच  भाजपला सत्तेपासून दूर राखण्याचे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकते. 

नेत्तृत्वावरून आपापसातच लाथाळ्या सुरु केल्या तर भाजपचा पराभव होणे अशक्य आहे. भाजपविरोधात आघाडी करण्याबाबत काँग्रेसचे किती महत्व आहे ते शरद पवार आणि शिवसेनेलाही कळले आहे. त्यांच्यासारखाच सुज्ञपणा ममता बॅनर्जी यांनीही दाखविण्याची गरज आहे.  तरच भाजपविरोधी एकसंध आघाडी अस्तित्वात येऊ शकते. अन्यथा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे दिवास्वप्नच ठरेल.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.