Home » मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी बक्षीस जाहीर झालं होतं !

मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी बक्षीस जाहीर झालं होतं !

by Team Gajawaja
0 comment
Mumbai Local
Share

मुंबईची लोकल आज ही लाईफलाईन आहे. लोकलशिवाय मुंबईकरांचं पानही हलत नाही. लोकल प्रवास जितका स्वस्त आहे तितकाच चांगला. एवढ्याशा पैशात तुम्हाला हव्या त्या ठिकाणी सोडणारी मुंबईत लोकलच. पण याच लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी एकेकाळी बक्षीस जाहीर झालं होतं. तुम्ही म्हणाल काहीही फेका. आता बक्षीस सोडा साधं तिकिट नसेल तर टीसीकडे चांगलाच दंड भरावा लागतो. मग ही बक्षीसाची भानगड आहे तरी काय जाणून घेऊयात. (Mumbai Local)

तुम्ही हरिश्चंद्राची फॅक्ट्री हा चित्रपट पाहिलाय का? त्यात दादासाहेब फाळके दादरच्या घरात शिफ्ट होतात. त्यांच्या घरामागून ट्रेन जाते. तेव्हा मुलं ही ट्रेन बघायला धावतात. तेव्हा फाळके म्हणतात की या रेल्वेचचं बघ. लोक नावं ठेवायचे, लोखंडी राक्षस म्हणायचे आणि आता. हा पिक्चरमधला सीन जरी असला तरी ही गोष्ट तितकीच खरी आहे. मुंबईत रेल्वे सुरू झाली ती मुंबई बंदरात कापूस आणि इतर माल आणण्यासाठी. प्रवासासाठीही रेल्वेची गरज होती. म्हणून ब्रिटिशांनी मुंबईत रेल्वे सुरू करण्याचा घाट घातला. १८ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदरहून भारतातलीच नव्हे तर आशियातली पहिली ट्रेन सुटली. ठाण्यात ही ट्रेन सव्वातासांत पोहोचली. जेव्हा ही ट्रेन ठाणे स्टेशनवर पोहोचली तेव्हा तिथल्या लोकांना वाटलं की हा आग ओकणारा राक्षस आहे असं सांगितलं जातं. बोरीबंदरहून जेव्हा ही ट्रेन सुटली तेव्हा त्यात फक्त इंग्रज अधिकारी नव्हते. त्यात जमशेटजी जीजीभाय आणि जगन्नाथ नाना शंकरशेटही होते. भारताच्या पहिल्या रेल्वे उभारणीत या भारतीयांचा सिंहाचा वाटा होता. आज मुंबई आणि भारताची एक प्रकारे असलेली लाईफलाईन रेल्वे भारतीयांनी सहज स्विकारली नव्हती. (Mumbai Local)

१८५३ साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली लोकल धावली होती. यामुळे प्रवासाचा खुप सारा वेळ वाचणार होता. पण अनेक भारतीयांना याबद्दल नवल वाटत होतं. अशी काही यंत्र असू शकतात ज्यामुळे प्रवास एवढ्या कमी वेळात होऊ शकतो यावर भारतीयांचा विश्वासच बसत नव्हता.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातले लोक रेल्वेने प्रवास करण्यासाठी घाबरत होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने लोकलने प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चक्क बक्षीस जाहीर केलं होतं. प्रबोधन ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणी या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. जी. आय. पी. रेल्वेच्या काही जुन्या गंमती , या प्रकरणात प्रबोधन ठाकरे म्हणतात की, इंग्रजांनी विस्तव आणि पाण्याची सांगड घालून वाफेलाच गाडी ओढायला लावली. मुहुर्तावर निघालेली आगगाडी मुंबईहून ठाण्याला पोहोचली. (Mumbai Local)

पण या वाफेच्या भुताटकीत, गाडीत बसायचा लोकांना धीर होईना. म्हणून दुसऱ्या दिवशी ठाणे ते मुंबई मोफत प्रवास अशी घोषणा करण्यात आली. आगगाडी म्हणजेच ट्रेनमध्ये बसणे धोकादायक नाही, हा प्रवास लवकर आणि सुखाचा आहे अशी समजूत रेल्वेचे अधिकारी काढत होते. पण भारतीय लोक ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हतेच. लोकांनी अनेक अफवा पसरवल्या. ही ट्रेन म्हणजे वाफेचे इंजिन असेलली इंग्रजाची भुताटकी आहे. तेव्हा मुंबईत ब्रिटिशांनी अनेक इमारती आणि वास्तू बांधायला घेतल्या होत्या. इंग्रज लोक भारतीयांना फूस लावून मुंबईला नेतात आणि या इमारतीत जिवंत गाडतात अशी अफवाही लोकांनी पसरवली. काही सरकारी कर्मचारी, कारकून, आणि व्यापाऱ्यांचे अधिकारी मुंबईहून ठाण्याला ट्रेनले प्रवास करून आले आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले. तरी या लोकांचे समाधान होईना. ब्रिटिशांनी मग प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची ऑफर दिली होती. तरी लोक या ट्रेनच्या प्रवासाला घाबरतच होते. (Mumbai Local)

मग ब्रिटिशांनी शक्कल लढवली. ठाणे ते मुंबईसाठी मोफत प्रवास तर दिलाच आणि वर एक रुपयांचे बक्षीससुद्धा जाहीर केले. ठाण्यातले लोक बक्षीसासाठी जेव्हा प्रवासासाठी निघाचे तेव्हा त्यांचे नातेवाईक धाय मोकलून रडायचे. पण हेच लोक जेव्हा सुखरुप परत यायचे तेव्हा चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे लोकांची एकच गर्दी व्हायची. रेल्वे अधिकाऱ्यांची ही आयडिया कामाला आली. लोकांनी एक रुपयासाठी का होईना प्रवास करायला सुरूवात केली होती. नंतर अधिकाऱ्यांनी बक्षीसाची रक्कम एक रुपयांवरून आठ आण्यावर आणली. लोकांचा धीर चेपला. ठाण्याहून मुंबईला जाण्यासाठी बैलगाडीचा वापर व्हायचा. आणि या प्रवासासाठी पाच तास लागायचा. आता ट्रेनमुळे हा प्रवास तासावार आला होता. तेव्हा ठाणे आणि मुंबईदरम्यान पाचच स्टेशन होती. बोरीबंदर, भायखळा, दादर, कुर्ला, भांडूप आणि ठाणे. (Mumbai Local)

ठाणे ते मुंबई दरम्यान तिकीट होतं सव्वापाच आणे. सव्वातासात जरी हा प्रवास पूर्ण होत असला तरी मुंबई आणि ठाणे दरम्यान दिवसभरात फक्त तीनच गाड्या धावायच्या. असे असले तरी नंतर ही ट्रेन मुंबई इतर भागात राहणाऱ्या लोकांच्या अंगवळणी पडली. पुढे सरकारने ट्रेनच्या संख्या तर वाढवल्याच आणि स्टेशनही वाढवले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तेव्हाच्या बोरीबंदरहून सुटलेली लोकल आजही त्याच वेळेला मुंबईहून सुटते. १८५३ साली बोरीबंदरहून तीन वाजून २८ मिनिटांनी ठाण्यासाठी पहिली लोकल निघाली होती. (Mumbai Local)

==============

हे देखील वाचा : जेव्हा मुंबई केंद्रशासित होती

=============

या घटनेची आठवण म्हणून मध्य रेल्वे आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवून तीन वाजून २८ मिनिटांनी ठाण्यासाठी ही लोकल चालवते. संपूर्ण वेळापत्रक पाळण्यासाठी मध्य रेल्वे ३.२५ ते ३.३५ दरम्यान ठाणे लोकल सुरू ठेवण्यात आली आहे.  मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली लोकल कशी होती हे तुम्हाला पहायचे आहे का? नाही त्यासाठी तुम्हाला कुठे दुरवर जायचं नाहीये. तुम्हाला जायचं ठाणे स्टेशनवर. ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला पहिल्या ट्रेनचे इंजिन ठेवण्यात आले आहे. जर तुम्हाला ही ट्रेन पाहण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही स्टेशनवर जाऊन १९ व्या शतकातलं इंजिन पाहू शकता. (Mumbai Local)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.