Home » Mumbai BMC : मुंबईत नक्की कुणाचा महापौर होणार ?

Mumbai BMC : मुंबईत नक्की कुणाचा महापौर होणार ?

by Team Gajawaja
0 comment
Share

इसापनीतीमधील एक गोष्ट आहे. एकदा एक कावळा झाडाच्या फांदीवर बसून मांसाचा तुकडा चघळत बसलेला असतो. एक कोल्हा ते बघतो आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो झाडाखाली जातो आणि कावळ्याचे कौतुक करू लागतो. कोल्ह्याची ‘कोल्हेकुई ‘ ऐकून कावळा खुश होतो आणि कोल्ह्याला प्रतिसाद देतो. कावळा जसा चोच उघडतो तसे तो मांसाचा तुकडा त्याच्या तोंडातून निसटतो आणि कोल्ह्याच्या तोंडात अलगद पडतो. आपल्याला माहित आहे की कोल्हा कधी स्वतः शिकार करत नाही तर कायम दुसऱ्याने केलेल्या शिकरीतील उरले सुरले अवशेष खाऊन आपले पोट भरतो.या कोल्ह्याप्रमाणेच एक ‘परजीवी’ जमात महाराष्ट्रात आणि देशात सर्वदूर आहे. ही जमात अशीच दुसऱ्याने केलेल्या शिकारीतील उरलेले खरकटे खाऊन आपले पोट भरते आणि’ आयत्या बिळावर बसण्याची सवय असलेले काही राजकारणी नागोबा’ त्यांच्या पंक्तीला जाऊन बसतात. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता संपल्या आहेत.’ठाकरे ब्रँड’ महापालिकेत पुन्हा सत्तेत यावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या मराठी मीडियातील आणि राजकारणातील वावदुकांची तपस्या काही फळाला आली नाही आणि भाजप-शिवसेनेच्या महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. आता एक ‘नरेटीव्ह’ फसल्यावर या लोकांनी दुसरे तुणतुणं वाजवायला सुरवात केली आहे ते आहे’मुबंईचा महापौर कोण होणार? भाजपचा की शिवसेनेचा’ ते जेव्हा ‘शिवसेनेचा’ असे म्हणतात तेव्हा त्यांना ‘उबाठा सेना’ अभिप्रेत असते कारण ही मंडळी शिंदे यांच्या सेनेला’शिवसेना’ मानत नाहीत.

आपल्याला आठवत असेल की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही पण भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एन. डी. ए. ला स्पष्ट बहुमत मिळाले. त्याहीवेळी आता मोदींना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल व नवी समीकरणे तयार होऊन नितीशकुमार वा चंद्राबाबू नायडू यापैकी एकजण विरोधी पक्षांच्या मदतीने पंतप्रधान होतील अशी दिवस्वप्ने व्यावसायिक स्वप्नाळूना पडू लागली. ते स्वप्न भंगल्यावर नितीश व चंद्राबाबू केंद्रातील महत्वाची खाती मिळावीत म्हणून अडून बसले आहेत व त्यामुळे सरकारचा शपथविधी लांबला आहे अशा कंड्या पिकवण्यात आल्या.पण शपथविधी अगदी थोड्याच काळात पार पडला आणि या कंड्या हवेत विरून गेल्या. मग मोदींना आघाडी सरकार चालवायचा अनुभव नाही त्यामुळे त्यांना यावेळी सरकार चालवणे कठीण जाईल असा जावईशोध लावण्यात आला. पण गेल्या दीड वर्षात केंद्र सरकार ज्या मजबूतपणे काम करत आहे ते बघून या मंडळींनी आता मोदींच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही अशी खूणगाठ बांधली आहे. पण ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ अशी ‘म्हण’ आहे त्याप्रमाणे या ‘परजीवी’ लोकांना आता भारतात श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या देशातील अराजका प्रमाणे काहीतरी घडेल अशी’वेडी आशा’ लागून राहिली आहे.आता तर काही`बाबा’ ट्रम्प वेनेझूलाच्या मोगुरा प्रमाणे मोदींना उचलून नेतील असे अकलेचे तारे तोडू लागलेआहेत.

हे देखील वाचा 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना केलं क्लीन बोल्ड !

महाराष्ट्रात सुद्धा नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यावर, शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत, शिंदे रागावले, भाजप फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या ‘मराठा चेहऱ्याच्या शोधात अशा अफवांचा धुराळा उडवण्यात मीडियातील हीच ‘विशिष्ट’  जमात आणि काही राजकीय ‘भोंगे’ आघाडीवर होते. पण काय झाले? फडणवीसच मुख्यमंत्री झाले आणि महायुती सरकार सुरळीत चालू आहे. भाजप हा ‘धक्कातंत्रात’ तरबेज आहे. मीडिया मधील स्वतःला सीक्रेट एजन्ट समजणाऱ्या भल्या भल्या मुखंडाना भाजपच्या चालीमुळे तोंडावर आपटावे लागण्याचे प्रसंग वारंवार येतात तरी हे लोक शहाणे होत नाहीत. नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील याचा एका तरी पत्रकार/संपादकाला सुगावा लागला होता का मुंबईच्या महापौर पदावरून हेतूपुरस्सर पसरवल्या जाणाऱ्या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये. दुःखात सुख शोधण्याच्या धडपडीत असलेल्या मीडिया व राजकीय क्षेत्रातील वावदुकानी उठवलेल्या या ‘वावड्या’ आहेत हे लक्षात घ्या. दुसऱ्याचे सुख न बघवणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांनी चालवलेला हा’माईंडगेम’ आहे.भाजप हा झाडावर बसलेला कावळा नसून राजवाड्याच्या शिखरावर विराजमान झालेला’गरुड’ आहे हे या ‘कोल्ह्याना’ समजते पण वळत नाही. मुंबईत भाजपचाच महापौर होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बघूया काय होते ते.

लेखक : रघुनंदन भागवत

१९ जानेवारी २०२६

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.