राज्य असावं तर रामराज्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासारखं. पुराणकाळात राम हा आदर्श राजा होता तर, कलियुगात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभाराचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. इथली धरती प्रभू श्रीराम, कृष्ण आणि शिवाजी महाराजांसारख्या कित्येक आदरणीय वीरांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यामुळे याच भूमीने मुघल, इंग्रज, पोर्तुगाल यांचे असंख्य हल्ले व त्यांनी केलेले अत्याचार पचवले. परंतु या देशात असेही काही राजे होऊन गेले ज्यांनी आपल्या चुकीच्या निर्णयाने स्वतःच्या हातून राजेशाहीचा नायनाट केला. त्यातला एक म्हणजे मुहम्मद बिन तुघलक.
दिल्लीच्या तख्तावर बसून राज्यकारभार करणारा मुहम्मद बिन तुघलक हा सर्वात चाणाक्ष सुलतान म्हणून ओळखला जात असे. तुघलक राजवंशाचे संस्थापक गयासुद्दिन तुघलक यांचा पुत्र उलुग खां उर्फ जौना खां हाच पुढे मुहम्मद बिन तुघलक या नावाने ओळखला जाऊ लागला.
वडीलांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने मुहम्मद बिन तुघलक याने सन १३२५ ते सन १३५१ या काळात संपूर्ण राज्यकारभार सांभाळला. गणित, खगोलशास्त्र, भविष्य, तर्कशास्त्र या विषयांमध्ये पारंगत असलेल्या या सुलतानाला पारशी आणि अरबी भाषा ज्ञात होती.
हा असा सुलतान होता जो होळी आणि दिवाळी सारख्या सणांमध्ये राजीखुषीने सहभागी व्हायचा. या सुलतानाने राज्यात असे काही फर्मान काढले की त्याच्या कर्तबगारीला आणि ज्ञानाला महत्त्व राहिले नाही. सोने आणि चांदीचे नाणे हटवून याने राज्यातील व्यवहारात तांब्याच्या आणि पितळेच्या नाण्यांचे चलन आणले. त्यामुळे लोहरांनी बनावट चलन असलेले नाणे व्यवहारात आणले आणि राजघराण्याचे यावरील नियंत्रण संपुष्टात येऊन महागाईने मर्यादा ओलांडली आणि राजाचे राज्य संपुष्टात आले.
हे ही वाचा: ‘या’ माणसाने फक्त व्यवसायासाठी ‘हिंदू’ धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि पाकिस्तानात गेला
हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर
त्याचबरोबर या सुलतानाची दुसरी घोडचूक म्हणजे मंगोली सैन्याकडून शस्त्रसंधींचे वारंवार उल्लंघन होत होते त्यामुळे त्रासलेल्या तुघलकाने आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवण्याचा मूर्खपणा केला. दक्षिणेचे प्रचंड आकर्षण असलेल्या या सुलतानाने संपूर्ण प्रजेसह देवगिरीच्या दिशेने प्रस्थान केले.
हे देखील वाचा: Unknown Places: पृथ्वीवरची पाच अशी ठिकाणं, ज्यांचा जगाशी काहीही संबंध नाही
परंतु, किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात पाण्याची कमतरता असल्याचे कळताच त्याने पुन्हा दिल्ली गाठली. सुलतानाच्या या चुकीच्या निर्णयाची शिक्षा मात्र त्याच्या प्रजेला भोगावी लागली. ४० दिवसांत ७०० मैलांचा प्रवास करून आलेल्या प्रजेतील लोकांना अतिरिक्त प्रवासाच्या थकाव्याने नाहक जीव गमवावा लागला होता. योग्य विचारसरणी नसलेल्या या सुलतानाने स्वतःच्या हातूनच आपल्या राजघराण्याचा अंत केला.