– श्रीकांत नारायण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा’ केला. यानिमित्ताने त्यांचे प्रामुख्याने नगर आणि पुणे जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. केंद्र सरकारने नव्यानेच निर्माण केलेले सहकार खाते हे देखील अमित शहा यांच्याकडेच आहे. त्यामुळे प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेला अमित शहा यांनी ‘सहकारमंत्री’ म्हणून लावलेली प्रमुख उपस्थिती लक्षणीय ठरली.
अर्थात नगर जिल्ह्यातील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली ही सहकार परिषद पूर्णपणे भाजपचीच होती. त्यामुळे व्यासपीठावर अमित शहा खेरीज राज्यातील भाजप नेत्यांनाच स्थान होते. अन्य पक्षातील ‘सहकार-सम्राटांना’ निमंत्रणच नव्हते.
एका दृष्टीने या सहकार परिषदेचा हेतू स्पष्टच होता. त्यामुळे अमित शहा यांनी अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात सहकार चळवळ प्रामुख्याने ज्यांच्या हातात आहे अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील सहकारी चळवळीत करोडो रुपयांचे घोटाळे झाले असा आरोप करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लक्ष्य केले. त्याचबरोबर सहकार चळवळीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन द्यायलाही ते विसरले नाहीत.
या सहकार परिषदेत अमित शहा (Amit Shah) यांचेच मुख्य मार्गदर्शन झाले. त्याखेरीज अन्य काही विचारमंथन झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र यानिमित्ताने भाजप यापुढे सहकारक्षेत्रातही आपले वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार हेच या सहकार परिषदेने स्पष्ट केले आहे असे म्हणावे लागेल.
याशिवाय फार तर, ही सहकार परिषद आयोजित करून आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईवर ‘सहकारसम्राट’ झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमधील आपले स्थान आणखी मजबूत केले, एवढेच म्हणता येईल. अमित शहा यांच्याबरोबर दर्शन घेतांना त्यांनाच शिर्डीचा साईबाबा पावला असावा असे एकूण दिसतंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला दुसरा दिवस मात्र पूर्णपणे पुणे शहरात घालविला. दगडू शेठ गणपती मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यापासून अनेक छोट्या कार्यक्रमांना त्यांनी आपली हजेरी लावली. पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याचे निमित्त साधून त्यांनी शहरातील भाजप कार्यकर्त्यांना एका खास मेळाव्यात मार्गदर्शनही केले.
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे अमित शहा त्याबद्दल काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यानुसार अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाच.

भाजप-सेनेच्या तुटलेल्या युतीबाबत त्यांनी शिवसेनेलाच जबाबदार धरले. शिवसेनेनेच विश्वासघात केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असा आरोप करताना शहा यांनी, “हिम्मत असेल तर सरकारचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नव्याने निवडणुका लढवाव्यात”, असे आव्हानही दिले.
अमित शहा यांच्या या आव्हानाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ घडवून आणण्याविषयीची भाषा सातत्याने बोलून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपने आता सोडून दिले की काय? कारण गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील भाजप नेते सत्तापरिवर्तनाची सातत्याने भाषा करीत आहेत, मात्र त्यांचे हे बोलणे शेवटी ‘फ़ुकाचेच’ ठरत आहे.
नाही म्हणायला अगदी अलिकडेच शिवसेनेतील रामदास कदम आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात जो संघर्ष उफाळून वर आला त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या मात्र तोही ‘बार’ शेवटी फुसकाच निघाला. त्यामुळे आता प्रदेश भाजपचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील हे राष्ट्रपती राजवटीची ‘कारणमीमांसा’ शोधत आहेत.
मात्र राष्ट्रपती राजवटीसाठी महत्वाची सबळ कारणे लागतात. ती मिळत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट तूर्तास तरी लागू होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अमित शहा यांनी थेट निवडणुकीचे आव्हान दिले असावे. त्याला शिवसेनेच्या नेत्यांनी अपेक्षित असे लगेच प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील मतभेदांची दरी आणखी रुंदावत चालली आहे हे मात्र पूर्णपणे स्पष्ट झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांना नेमकी तीच गोष्ट हवी आहे.
हे ही वाचा: राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘कैफियत’
हिंदू धर्मात मृत्यूपश्चात लहान मुलांना अग्नी न देता दफन का करतात?
विशेष म्हणजे प्रदेश भाजपमध्येही सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते ते बावनकुळे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले असून पक्षात ‘ओबीसी नेते’ म्हणून त्यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले आहे. तसेच अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यातील एकाही कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोठेच दिसले नाहीत ही बाबही दुर्लक्षित करण्याजोगी नाही.
पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात तर अमित शहा यांच्यासमोरच पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील मतभेद दिसून आले. उभयतांनी बोलताना त्याला हसण्याचा आणि विनोदाचा ‘मुलामा’ दिला असला तरी “समझनेवालोंको इशारा काफी है”.
हे देखील वाचा: शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याने पैश्याची बॅग घेण्यास नकार दिला, पण पुढे झाले भलतेच काही! वाचा
एकूणच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचण्यात भाजपाला अपयश येत असल्यामुळेच अमित शहा यांनी निवडणुकीची निर्णायक भाषा केली असावी. प्रदेश भाजपचे नेते तसेच महाविकास आघाडीचे नेते शहा यांचे हे आव्हान कितपत गांभीर्याने घेतात त्यावरच नजीकच्या काळातील राज्यातील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.
— श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.