मराठी कादंबरीकार, मृत्यूंजयकार आणि मराठी साहित्य विश्वात इतिहास घडवणारे दिवंगत साहित्यिक शिवाजी गोविंदराव सावंत यांची आज पुण्यतिथी. ‘मृत्यूंजयकार’ यासाठी की त्यांची ‘मृत्यूंजय’ कादंबरी साहित्यात विशेष अग्रस्थानी आहे. संबंधित पुस्तकात त्यांनी महाभारतातील योध्दा कर्णच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी आहे. विशेषत: त्याची बाजू भक्कमपणे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांची प्रत्येक कादंबरी वाचकांसमोर इतिहास उभा केल्याशिवाय राहत नाही.
१९६७ साली लिहिली गेलेली ‘मृत्यूंजय’ कादंबरी आजही लाखो तरुणांच्या हृद्यात कायमची वसली आहे. वाचनाची आवड असणाऱ्या किंवा नसणाऱ्यांनी देखील आयुष्यात एकदा तरी ही कादंबरी वाचावी असा वाचकांचा अट्टाहास असतो. असं ऐकलं आहे की, ‘मृत्यूजंय’ कादंबरी लिहिण्यासाठी थेट कुरुक्षेत्रच गाठलं होतं. लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा, युगंधर कांदबऱ्याही विशेष गाजल्या. त्यांच्या छावा आणि मृत्यूंजय कादंबरीवर मराठी नाटकंही रंगभूमीवर आपल्याला पहायला मिळतात.
कोल्हापुरातील आजरा गावात ३१ ऑगस्ट १९४० साली शिवाजी सावंत यांचा जन्म झाला. त्यांती दुसरी जमेची बाजू म्हणजे उत्कृष्ट कबड्डीपट्टू होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोर्टात कारकुनाची नोकरी स्विकारली.त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले.
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ‘लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक आणि सहसंपादक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन कादंबरी आणि अन्य पुस्तके लिहिण्यावर भर दिला.
‘छावा’ आणि ‘मृत्यूंजय’साठी महाराष्ट्र सरकारतर्फे अनेक पुरस्कार ही देण्यात आले आहेत. मृत्यूजंयला महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार, न.चिं. केळकर पुरस्कारानं शिवाजी सावंत यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
18 सप्टेंबर 2002 साली गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. त्यांच्या निधनानं मराठी साहित्यातील पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.