छावा चित्रपटाच्या (Chhaava Movie) निमित्ताने एक मेसेज सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे, तो म्हणजे ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या हत्येनंतर औरंगजेबाची मोगलाई न येता पेशवाई कशी आली ?’ अनेक पेजेस, इन्स्टा स्टोरी वर हे लिहिलेलं दिसून येतंय, आणि त्याखाली कमेंट्सचा भडीमार आहे. काही लोकं इतिहासाचे खरे दाखले देत आहेत, तर काही लोकं खोटे… काहींनी तर केवळ शिव्याशाप करण्यासाठी कमेंट्स केल्या आहेत. एकमेकांच्या जाती उकरून काढल्या जात आहेत. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जितका पराक्रमी तितकाच संवेदनशील आहे. पण याला स्वरूप कोणतं मिळतय. हे आपण सोशल मिडीयावर पाहू शकतो. पण हा जो मेसेज हा यामध्ये तथ्य आहे का ? शंभू राजेंच्या हत्येनंतर खरच थेट पेशवाई आली का ? आणि मोगलाई जर आली नाही तर त्याचं काय झालं ? जाणून घेऊ. (Maratha History)
मुळात हा जो मेसेज फिरत आहे, तोच तर्कहीन आहे. कारण शंभू राजेंच्या निर्घृण हत्येनंतर मराठ्यांचे दोन बलाढ्य राजे आणि एक महाराणी होऊन गेल्या, ज्यांचं इतिहासातलं योगदान अफाट आहे. ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी सरकार आणि छत्रपती शाहू महाराज… आता आपण शंभू राजेंच्या १६८९ साली झालेल्या हत्येनंतरचा घटनाक्रम पाहुया. ज्यावेळी शंभू राजेंना कैद करण्यात आलं ही बातमी रायगडावर पोहोचली तेव्हा महाराणी येसूबाई आणि मंत्रीमंडळाने राजाराम महाराज यांचा राज्यभिषेक करवून घेतला. राजाराम महाराज हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले. मात्र संकट टळलं नव्हतं. शंभू राजेंच्या हत्येनंतर रायगडाला वेढा पडला राजाराम महाराज सुखरूप रायगडावरून निसटले आणि त्यांनी जिंजी गाठली. पण महाराणी येसूबाई आणि बाल शाहू यांना औरंगजेबाने कैद केलं. (History)
रामराजे यांनी जिंजीला स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून घोषित केलं. रामराजे हे लढवय्ये नसले, तरी मुत्सद्दी होते. स्वराज्य खिळखिळ झालं असतानाही १६८९ ते १७०० ही ११ वर्ष त्यांनी बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं. यावेळी त्यांना साथ लाभली संताजी घोरपडे, धनाजी जाधव, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ अशा मातब्बर सरदारांची… ३ मार्च १७०० रोजी आजारपणामुळे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी रामराजे यांचं निधन झालं. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, शंभू राजेंच्या हत्येनंतर मोघलाई होतीच… औरंगजेब स्वत: आपल्या बलाढ्य सेनेसोबत दक्खनमध्ये ठाण मांडून बसला होता. पण मराठेशाही जिवंत ठेवण्यासाठी रामराजे आणि इतर मराठा मंडळींनी मुघलांसोबत संघर्ष सुरूच ठेवला. (Maratha History)
रामराजे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती ताराराणी यांनी मराठ्यांचा कारभार सांभाळला. वारसा हक्कानुसार गादी शाहू महाराज यांच्याकडे जायला हवी होती, मात्र ते कैदेत असल्यामुळे ताराराणी यांनी आपला पुत्र शिवाजी द्वितीय याला गादीवर बसवलं आणि संपूर्ण कारभार पाहिला. औरंगजेबाने आतापर्यंत मराठ्यांच्या तीन पुरुष छत्रपतींचा सामना केला होता, मात्र आता महिलेच्या हाती धुरा गेल्यानंतर त्याला वाटलं की, आता आपण मराठ्यांचा कणा मोडू आणि दक्खन प्रांत जिंकून घेऊ. पण ताराराणी यांनीही आपला प्रतिकार सुरूच ठेवला आणि मराठेशाहीचं रक्षण केलं. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे ,पिळाजीराव गोळे, गिरजोजी यादव असे तगडे सरकार होते. यामध्ये जे बाळाजी विश्वनाथ आहेत, हे थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील… १७०० ते १७०७ दरम्यान ताराराणी यांनी मुघलांना चांगलच खेळवलं, पण स्वराज्य जिंकू दिलं नाही. १७०७ साली औरंगजेबाचं निधन झालं. २८ वर्ष दक्खनेत मराठ्याशी संघर्ष करून तो इथेच मरण पावला. आता शंभू राजेंच्या हत्येनंतर १८ वर्षांनी औरंगजेब गेला. म्हणजे पुढची १८ वर्ष मोघलाईच होती आणि मराठा स्वराज्य सांभाळण्यासाठी आणि त्याचं साम्राज्यात रुपांतर करण्यासाठी संघर्ष करत होते. (History)
औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलांमध्ये गादीसाठी संघर्ष झाला आणि त्याचा मुलगा मुहम्मद आजम शाह गादीवर आला. याने शाहू महाराज यांची सुटका केली. यानंतर १२ जानेवारी १७०८ रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी विधिवत राज्याभिषेक करून घेतला. तिथे औरंगजेब गेला आणि मोगलशाही खिळखिळी झाली आणि इथे शाहू महाराज आले आणि मराठेशाही बळकट झाली. मराठ्यांच्या दोन स्वतंत्र गाद्या कोल्हापूर आणि सातारा इथे तयार झाल्या. शाहू महाराजांना धनाजी जाधवराव, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, सेखोजी थोरात, राणोजी शिंदे, चिमणाजी दामोदर, सुभानजी आटोळे, असे अनेक निष्ठावान सरदार लाभले. यावेळी मराठेशाहीचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे पुत्र बहिरोजी पिंगळे होते. या सर्वांच्या मदतीने मराठ्यांच्या टापा दिल्लीपर्यंत धडकल्या. शाहू महाराजांनी सय्यद बंधू यांच्या मदतीने मुघल बादशाह फार्रुखसियार याला पदच्युत केलं आणि रफी-उद्-दरजत याला गादीवर बसवलं. यावेळी त्यांनी महाराणी येसूबाई यांनाही कैदेतून सोडवलं. (Maratha History)
इथे मराठ्यांची ताकदसुद्धा प्रचंड वाढली आणि ते मुघलांकडूनच कर गोळा करायला लागले. शाहू महाराजांच्या मंत्रीमंडळात बाळाजी विश्वनाथ हे पेशवा म्हणजे मुख्य प्रधान होते. म्हणजे शाहू महाराजांचा आदेश आणि कारभार सांभाळणार प्रधान… छत्रपतींच्या शब्दांपुढे कोणीही जाऊ शकत नव्हतं. १७२० साली बाळाजी विश्वनाथ यांचं निधन झालं आणि पेशवेपदी त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे आले. आतापर्यंत बघा, मुघलाई जवळपास नाममात्र झाली होती आणि मराठेशाही शक्तीशाली झाली होती. म्हणजे शंभू राजेंच्या हत्येनंतर ३१ वर्ष पेशवाई आपल्याला कुठेही दिसून येत नाही. छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठी सत्तेचा खरा उदय झाला. दक्खनपासून ते उत्तरेपर्यंत सर्वत्र बाजीराव यांचा पराक्रम आणि शाहू महाराज यांचं नेतृत्व अशा चर्चा होत्या आणि नंतर स्वराज्याचं साम्राज्यात रुपांतर झालं.
१७४० साली बाजीराव पेशवे यांचं निधन झालं. यानंतर १७४९ साली छत्रपती शाहू महाराज यांचं निधन झालं. १७०७ ते १७४९ असे ४१ वर्ष त्यांनी मराठेशाहीचं शासन उत्तमरीत्या सांभाळलं, ते वाढवलं आणि शिवरायांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. म्हणजे बघा… शंभू राजेंच्या हत्येनंतर ६० वर्ष पेशवाई नव्हतीच… तर या काळात मुघल तितकेच ताकदीचे होते. मात्र औरंगजेबाच्या निधानानंतर मुघलांची ताकद कमकुवत झाली. शाहू महाराज यांच्यानंतर राजराम द्वितीय हे छत्रपती झाले. पण शाहू महाराज यांच्यापुढचे सर्व छत्रपती नामधारी राहिले. पण त्यांचा वंशज म्हणून आदर तोच राहिला. याच काळात पेशवाईचा उदय झाला. बाजीराव पेशवे यांच्यानंतर अनेक पेशव्यांनी मोठा पराक्रम गाजवून मराठेशाहीच्या सीमा वाढवल्या. आता पेशवा हे पद म्हणजे सेवक असेच होते. पेशवे हे नेहमी छत्रपतींचे सेवक म्हणूनच राहिले. (Maratha History)
=============
हे देखील वाचा : Chhaava : थिएटरमध्ये गारद देऊन आपण शिवरायांचा अनादर करतोय का ?
=============
आता एकंदरीत मोघलाई आणि पेशवाईबद्दल तुम्हाला कळलच असेल. मुळात छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर लगेच पेशवाई आलेली नाही. शंभू राजे १६८९ मध्ये गेल्यावर पुढे १९६९ ते १७०७ असे तब्बल १८ वर्षे शिवछत्रपतींचेच द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज आणि सून ताराराणी ह्यांनी यशस्वीपणे स्वराज्य सिंहासनावर राज्य केलय. त्यानंतर १७०७ साली शंभुराजेंचे पुत्र शाहू महाराज हे गादीवर आले. ते हयात असेपर्यंत म्हणजेच १७४९ पर्यंत पेशव्यांपासून सगळे सरदार त्यांचा छत्रपती म्हणून मान आणि आदर राखूनच वागत होते. १७४९ नंतर मात्र छत्रपती नामधारी बनले. कारण शिंदे, होळकर, गायकवाड अशा अनेक मराठा घराण्यांनी स्वतःला राजे घोषित केलं. पण पेशव्यांनी पंतप्रधान म्हणजेच पेशवेपदच स्वतःकडे ठेवलं. (Maratha History)
आता पुन्हा त्या व्हायरल मेसेजकडे येऊ. शंभू राजेंच्या हत्येनंतर पेशवाई का आली, मोघलाई का आली नाही. तर पेशवाई कशी आली हे तुम्ही जाणून घेतलं आणि मोघलाईची अवस्था कशी बिकट झाली, हेसुद्धा तुम्हाला कळलच असेल. तसं मराठेशाही कोरेगाव-भीमाच्या युद्धानंतर १८१८ ला अस्ताला गेली आणि मोघलाई १८५७च्या स्वातंत्र्य उठावानंतर अस्ताला गेली. मुघलांचा शेवटचा बादशाह बहादूरशाह जफर होता. त्यामुळे जो मेसेज फिरत आहे, त्यात कसलंही तथ्य किंवा तर्क नाही. मुळात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे मेसेज पसरवले जातात आणि यासोबतच इतिहासाचं विकृतीकरण केलं जात. त्यामुळे खरा इतिहास काय ? हे सर्वांपर्यंत जावं, इतकच !