भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर म्हणून ओळखली जाणारी क्रिकेटपटू मिताली राजनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या 23 वर्षापासून मिताली राजनं आपल्या नावाचा दबदबा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्माण केला होता. वयाच्या 39 वर्षी मितालीनं आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र ‘मिताली राज’ नावाची जादू कधीही पुसता येणार नाही.
भारतामध्ये आज महिला क्रिकेट संघाला जो मान आहे, यामध्ये मितालीचा खूप मोठा वाटा आहे, याबाबत दुमत नाही. निवृत्तीची घोषणा करताना या गुणवान क्रिकेटपटूला विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याची चुटपूट कायम रहाणार आहे. (Mithali Raj Announces Retirement)
तामिळ कुटुंबात 3 डिसेंबर 1982 मध्ये मितालीचा जन्म झाला. लहानग्या मितालीला नृत्याची आवडही होती. नृत्याचे प्रशिक्षण घ्यायलाही तिने सुरुवात केली होती. मात्र भारतीय हवाई दलात असणारे मितालीचे वडील क्रिकेटचे चाहते होते. त्यांनी मितालीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यावेळी महिला क्रिकेट ही संकल्पना फारशी नव्हती. तरीही अवघ्या आठ वर्षांची मिताली नाखुषीनं आणि वडीलांच्या आग्रहामुळे ‘क्रिकेट नेट’मध्ये जायला लागली. काही दिवसांनी या नेटनं तिला भुरळ घातली आणि तिच्या बॅटची जादू सर्वांना पहाता आली.
वयाच्या सतराव्या वर्षी मितालीची निवड भारतीय महिला क्रिकेट संघात झाली. मितालीनं घेतलेले कठोर परिश्रम, तिचे कोच संपत कुमार यांचं अचूक मार्गदर्शन आणि आई वडीलांचं प्रोत्साहन, या साऱ्यामुळेच हे शक्य झाल्याचं मिताली नेहमी आवर्जून सांगते. (Mithali Raj Announces Retirement)

भारतीय महिला क्रिकेट संघाचे कप्तानपद भुषविलेल्या मितालीचा उल्लेख सर्वात यशस्वी क्रिकेटपटू म्हणूनही करण्यात येतो. 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हाच तिनं 114 धावांची नाबाद खेळी करुन आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या नावाची मोहोर उमटवली.
पहिल्यावेळी आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच खेळतांना मिताली शून्यावर बाद झाली होती. त्यावेळी झालेली टिका सहन करत मितालीनं इंग्लड विरुद्धच्या सामन्यात 2002 साली 214 धावा कुटल्या. हा आत्तापर्यंतचा महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम ठरला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 7000 धावा करण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे. वनडे मधील सात शतकं मितालीच्या नावावर आहेत. भारतीय संघाकडून खेळतांना मितालीनं 232 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये मितालीनं 2364 धावा केल्या आहेत. (Career graph of Mithali Raj)

मितालीची ओळख ‘क्लासीक क्रिकेटर’ म्हणूनही आहे. तिच्या बॅटींगमधील कौशल्याचे सचिन तेंडूलकरसह अनेक क्रिकेटरनंही कौतुक केले आहे. ती स्वतः सचिनच्या स्ट्रेट ड्रायव्ह आणि स्केवयर कटची चाहती आहे.
न्युझिलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे नेतृत्व मितालीनं केलं आहे. यात भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला. मिताली या पराभवानं निराश झाली होती. काही वर्षापूर्वी तिने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली. तेव्हापासूनच ती सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. (Mithali Raj Announces Retirement)

अर्जुन पुरस्कार, पद्मश्री याबरोबरच ‘Wisden Indian Cricketer of The Year’ या पुरस्कारनंही मितालीचा गौरव करण्यात आला आहे. मिताली आज क्रिकेटमधून निवृत्त झाली असली तरी महिला क्रिकेटसाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.
– सई बने