Home » Melania Trump : चर्चा फक्त मेलानियाच्या पत्राची !

Melania Trump : चर्चा फक्त मेलानियाच्या पत्राची !

by Team Gajawaja
0 comment
Melania Trump
Share

श्री. पुतिन, हे फक्त तुम्हीच करू शकता, अशा आशयाचे एक पत्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मिळाले आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी लिहिलेले हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. स्लोव्हेनियामध्ये जन्मलेल्या मेलानिया या सुरुवातीपासून युक्रेनच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादेमिर पुतिन यांच्या कट्टर विरोधक म्हणूनही मेलानिया यांना ओळखले जाते. मेलानिया यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या रणनितीवर मोठा प्रभाव आहे. मेलानिया यांच्याच प्रभावामुळे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. (Melania Trump) 

याच मेलानिया यांनी आता रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ज्या लहान मुलांची फरफट झाली, त्यांच्याबाबत आवाज उठवला आहे. मेलानिया ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांना लिहिलेल्या पत्रात युक्रेन आणि रशियाच्या मुलांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पुतिन यांना मुलांच्या बालपणाचे रक्षण करण्याचे आणि संघर्षात अडकलेल्या मुलांचे हास्य परत आणण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन करत मानवतेची सेवा हिच असल्याचा खोचक सल्लाही दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्का भेट कुठल्याही ठोस निर्णयाशिवाय पार पडली. या बैठकीतल्या प्रत्येक गोष्टीकडे जगाचे लक्ष होते. याच बैठकीची सुरुवात होत असतांना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या खिशातून एक कागद काढून तो व्लादिमीर पुतिन यांच्या हातात दिला. (International News) 

या कागदामध्ये नेमकं काय होतं, याची उत्सुकता होती. मात्र आता हे कोडं उलगडलं आहे. अलास्का भेटीदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना दिलेला हा कागद म्हणजे एक पत्र होते. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी लिहिलेले हे पत्र आता सर्वांसमोर आले आहे. हे पत्र आता यूएस अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.  या पत्रात अमेरिकेच्या फर्स्ट लेडीनं युद्धाच्या नावावर रशियामध्ये नेण्यात येणा-या युक्रेनी मुलांबाबत आवाज उठवला आहे. मेलानिया यांनी पत्रात युक्रेन आणि रशियाच्या मुलांच्या स्थितीचा उल्लेख केला आहे. यासोबत पुतिन यांनी सरकार आणि विचारसरणीच्या पलीकडे जाऊन युक्रेनमधील मुलांच्या निर्दोषतेबद्दल विचार करण्याचे आवाहन मेलानिया यांनी केले आहे. (Melania Trump) 

मेलानिया यांनी पत्रात लिहिले आहे, या मुलांच्या निरागसतेचे रक्षण करून तुम्ही केवळ रशियाचीच नव्हे तर मानवतेचीही सेवा कराल. तुम्ही या मुलांना एका लेखणीच्या फटक्याने मदत करू शकता. प्रत्येक मुलाच्या हृदयात सारखीच शांत स्वप्ने असतात, मग तो देशाच्या ग्रामीण भागात जन्माला आला असो किंवा एखाद्या भव्य शहराच्या मध्यभागी. ते प्रेम, शक्यता आणि धोक्यांपासून संरक्षणाचे स्वप्न पाहतात. पालक म्हणून, पुढच्या पिढीच्या आशेचे पालनपोषण करणे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वांसाठी एक सन्माननीय जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक आत्मा शांततेत जागा होईल आणि त्याचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित असेल, असेही मेलानिया यांनी या पत्रात लिहिले आहे. वास्तवात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, रशिया युक्रेनियन मुलांना त्यांच्या देशाबाहेर नेत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. रशिया युक्रेनच्या मुलांना आपल्या देशात नेऊन त्यांना रशियन नागरिक म्हणून वाढवत असल्याचा हा आरोप आहे. (International News) 

सर्वप्रथम असोसिएटेड प्रेसने 2022 मध्ये युक्रेनियन मुलांच्या अपहरणाचे प्रकरण उघड केले होते. त्यामुळे बराच गदारोळ उठला. यानंतर, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कायद्याखाली युद्ध गुन्ह्यांसाठी पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आला. युक्रेनमधून मुलांच्या अपहरणासाठी पुतिन वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय न्यायालयानं केला आहे. यानंतर जगभरातून अनेक सामाजिक संस्थांनी पुतिन यांच्यावर टीका करत, युक्रेनमधील मुलांच्यावर होणा-या अत्याचाराबाबत निषेध नोंदविला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांचाही समावेश होता. त्यांनी 2022 मध्येही रशियन अधिकाऱ्यांनी कथितपणे ताब्यात घेतलेल्या हजारो युक्रेनियन मुलांसाठी निधी गोळा करण्याचे काम केले होते. (Melania Trump) 

==============

हे देखील वाचा : Russia And Ukraine : रशिया-युक्रेन युद्धात भारताला खेचण्याचा प्रयत्न !

==============

युक्रेनने यासंदर्भात जाहीर केलेल्या अहवालानुसार युक्रेनमधून 20 हजारहून अधिक लहान मुलांना रशियामध्ये नेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार याला नरसंहार म्हणण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाचा अहवालात देखील या घटनेची नोंद नरसंहार अशीच करण्यात आली आहे. याच मुलांसाठी आता पुन्हा मेलानिया ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांना पत्र लिहिले आहे. (International News) 

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.