आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथींना खूप महत्व आहे. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्या या तिथी देखील आपल्यासाठी खास असतात. उद्या २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्या (Mauni Amavasya) आहे. उद्याच्या अमावस्येचे आणि दिवसाचे महत्व अधिकच विशेष आहे. कारण उद्या मौनी अमावस्या आहे सोबतच प्रयोगराजमध्ये संपन्न होत असलेल्या महाकुंभमेळ्यामधील शाहीस्नानाची दुसरी पर्वणी देखील आहे. (Mauni Amavasya)
हिंदू धर्मामध्ये अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानले जाते. वर्षातून 12 अमावस्या असतात माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्या आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवशी मौन धारण करून जप, तपश्चर्या आणि भक्ती करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी मौन धारण केल्याने मन शुद्ध होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की मौन राहणे ही सर्वात मोठी साधना आहे. (Latest Marathi News)
यावर्षी माघ महिन्यातील अमावस्या तिथी २८ जानेवारीला संध्याकाळी ७:३५ वाजता सुरू होईल आणि २९ जानेवारीला संध्याकाळी ०६: ०५ मिनिटांनी संपेल. त्यामुळे २९ जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजाही केली जाते. या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनीपद प्राप्त होते असे म्हणतात. मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि तप केल्याने अनेक लाभ होतात अशी मान्यता आहे.
मौनी अमावस्येला सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २२ मिनिटांपर्यंत स्नान करण्याची उत्तम वेळ आहे. या काळात कोणतेही काम केल्यास तुम्हाला शुभ फले प्राप्त होतील. या दिवशी कुंभमेळ्याच्या ठिकाणी स्नान केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते. मात्र कुंभमेळ्याला जात येत नसेल तर कोणत्याही नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये सकाळी स्नान करणे फलदायी आहे. तेही शक्य नसल्यास घरातल्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता. (Top Story)
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर अमावस्या तिथी असते. ही तिथी पूर्वजांना समर्पित करण्यात आली आहे. मौनी अमावास्येच्या दिवशी स्नान दान किंवा पितृतर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. अशी मान्यता आहे की, मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर सदैव राहतो. ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून पितरही प्रसन्न होतात.
===============
हे देखील वाचा : Maharashtra State Lottery : अनेकांना लखपति बनवणारी राज्य लॉटरी बंद होणार?
===============
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी राजा भगीरथने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती. राजा भगीरथाच्या पूर्वजांना गंगाजलाच्या स्पर्शाने मोक्ष प्राप्त झाला. या श्रद्धेमुळे गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर मौन पाळावे दिवसभर मौन राहून जप आणि तपश्चर्या करावी. मौन व्रतामध्ये रामनाम घेणे सर्वोत्तम आहे.
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून दिली आहे. याबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, आणि अंधश्रद्धेला बढावा देत नाही)