काशी नगरी भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र याच काशी नगरीमध्ये भगवान शंकराच्या मुख्य मंदिरापासूनच काही अंतरावर माता अन्नपूर्णेचं (Mata Annapurna) मंदिर आहे. या मंदिराप्रती आणि माता अन्नपूर्णेप्रती काशीच्या नागरिकांमध्ये अमाप श्रद्धा आहे. ज्या आदरानं काशीचे नागरिक भगवान शंकराची पूजा करतात. त्याच श्रद्धेनं काशी नगरीच्या या माता अन्नपूर्णा देवीची पूजा होते. कारण याच माता अन्नपूर्णा देवीमुळे काशीमध्ये संपन्नता आहे, असे मानले जाते. काशीमधील प्रत्येकाचा अन्नभंडारा कायम परिपूर्ण असतो, त्यामागे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच काशीमध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी येणारे लाखो भक्त भोलेबाबांच्या दर्शनानंतर माता अन्नपूर्णेच्या दर्शनाला जातात. याच मंदिरात भगवान शंकराला देवीनं प्रसादरुपी अन्न दिले अशी मान्यता आहे, शिवाय काशीमधील हे माता अन्नपूर्णेचे मंदिर देशातील एकमेव मंदिर आहे, जे श्रीयंत्राच्या आकारातील आहे. विश्वनाथ मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या माता अन्नपूर्णा मंदिरात त्यामुळेच अहोरात्र भक्तांची गर्दी असते. (Mata Annapurna)
माता अन्नपूर्णेला तिन्ही लोकांमध्ये अन्नाची जननी म्हटले जाते. याच माता अन्नपूर्णेचे मंदिर बाबा विश्वनाथाची नगरी असलेल्या काशी नगरीमध्ये आहे. शंकराची नगरी असलेल्या काशीमध्ये गल्लोगल्लीमध्ये मंदिरे आहेत. मात्र यातील हे माता अन्नपूर्णेचे मंदिर खास आहे. या मंदिराला काशीची संपन्नता असेही म्हटले जाते. या माता अन्नपूर्णेच्या मंदिरात दिवाळीचे चार दिवस खास भंडारा चालवला जातो. हा अन्नकूट सोहळा बघण्यासाठी आणि त्यातील प्रसाद मिळवण्यासाठी भक्तांची झुंबड उडते. माता अन्नपूर्णेचे हे मंदिर श्री यंत्राच्या आकारात बांधण्यात आले आहे. श्री यंत्रावर विराजमान असलेली माता आपल्या भक्तांवर संपन्नतेचा वर्षाव करते, असे सांगतात. त्यामुळे दिवाळीत जरी भक्तांना अन्नभंडारा असला तरी या मातेचे दर्शन घेण्यासाठी अन्यदिवशीही मोठी गर्दी असते. (Mata Annapurna)
अन्नपूर्णा मातेचे (Mata Annapurna) हे स्थान स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. माता अन्नपूर्णेची मुर्ती सोन्याची आहे. मंदिरात माता अन्नपूर्णेच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीची सुवर्णमूर्ती आणि डावीकडे भूदेवी आहे. या मंदिराबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. त्यामध्ये एकेकाळी पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती. दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दुष्काळ दूर करण्यासाठी लोकांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकरांनी हे संकट दूर करण्यासाठी माता पार्वतीची प्रार्थना केली. त्यानंतर माता पार्वती, भगवान शंकरासोबत पृथ्वीवर आली. माता पार्वतीने माता अन्नपूर्णाचे रूप धारण केले. मातेनं प्रत्यक्ष भगवान शंकराला याच काशी नगरीमध्ये अन्नदान केले. हेच अन्न भगवान शंकरांनी आपल्या भक्तांमध्ये वाटले. तेव्हा दुष्काळाची परिस्थिती दूर झाली. शेतीतून धान्य मोठ्या प्रमाणात आले आणि धान्याची कोठारं भरुन गेली, असे सांगतात.
या कथेनुसारच माता अन्नपूर्णेच्या मंदिरात (Mata Annapurna) देवीच्या सुवर्ण रूपासमोर भिक्षा मागणारी भगवान शंकराची चांदीची मूर्ती आहे. भगवान शंकराचे हे अनोखे रुप पाहण्यासाठी देशभरातून भाविक या मंदिरात गर्दी करतात.
माता अन्नपूर्णा मंदिरातील (Mata Annapurna) मातेचे सुवर्ण रुप फक्त दिवाळीच बघता येते. यावेळी मातेच्या दरबारातून प्रसादरुपी खजिन्याने भक्तांच्या घरातील धान्य नेहमीच भरलेले राहते, असा विश्वास आहे. त्यामुळेच मातेचा प्रसाद घेण्यासाठी भाविक 24 तास आधीच रांगा लावतात. असे असले तरी रोज या अन्नपूर्णा मातेचे भव्य पूजा केली जाते. अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने जीवनात अन्नाची कमतरता भासत नाही, अशी भावना आहे. या माता अन्नपूर्णा मंदिराच्या आवारात अनेक देवतांच्या मूर्ती असून त्यांचीही पूजा आणि होम या परिसरात नित्यनियमानं होतात.
============
हे देखील वाचा : म्हणून लावतात अखंड ज्योत
============
विशेष म्हणजे, या मंदिराचा आणि महाराष्ट्राचाही अनोखा संबंध आहे. काशीमध्ये संपन्नता आणणा-या या माता अन्नपूर्णेचे (Mata Annapurna) मंदिर हे बाजीराव पेशवे यांनी 1700 च्या दशकात बांधले होते असे मानले जाते. यानंतरही पेशव्यांनी कायम या मंदिराला मोठ्या प्रमाणात देणगी दिल्याचा उल्लेख आहे. आदि शंकराचार्यांनी अन्नपूर्णा मंदिरात अन्नपूर्णा स्तोत्र रचले असेही सांगण्यात येते. काशी नगरीमधील या माता अन्नपूर्णा मंदिरात 108 वेळा अन्नपूर्णा पाठ करण्यासाठीही भक्तांची गर्दी होते. यामुळे सर्व पर्वत, समुद्र, दिव्य आश्रम, संपूर्ण भूमी आणि संपूर्ण जगाची प्रदक्षिणा करण्याचा लाभ भक्तांना मिळतो, असे सांगण्यात येते.
सई बने