कट्टर धार्मिक देश म्हणून ओळखल्या जाणा-या इराणमध्ये सुधारणावादी विचारांचे वारे वाहणार आहेत. कारण इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड झाली आहे. मसूद पेझेश्कियान यांच्या हातात आता इराणची धुरा आली आहे. मसूद पेझेश्कियान इराणचे ९ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. स्वतः कार्डियो स्पेशलिट डॉक्टर असलेले मसूद पेझेश्कियान हे सुधारणावादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. इराणमधील महिलांच्या बाजुने उभा रहाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. उच्चशिक्षित असलेल्या मसूद यांच्या प्रचारात महिलांचाच पुढाकार होता. त्यांच्या विजयानं इराणमध्ये आनंद व्यक्त होत असून ही बदलाची नांदी असल्याची प्रतिक्रीया इराणमध्ये व्यक्त होत आहे. (Masoud Pezeshkian)
इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात मसूद पेझेश्कियान यांचा विजय झाला आहे. मसूद पेझेश्कियान यांनी कट्टरपंथी जलिली यांचा पराभव केला आहे. इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. इराणमधील महिलांवर होणा-या अत्याचारावार त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हिजाब बंदीवरही त्यांनी हा महिलांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे मत व्यक्त केले होते. मसूद पेझेश्कियान या उदारमतवादी नेत्यामुळे इराणमध्ये स्वातंत्र्यांची नवी पहाट आल्याची प्रतिक्रीया महिलांनी दिली आहे.
मसूद पेझेश्कियान यांचा जन्म २९ सप्टेंबर १९५४ रोजी महाबाद, वायव्य इराण येथे एका अझरी वडील आणि कुर्दिश आईच्या पोटी झाला. मसूद यांचे अझरी भाषेवर प्रभुत्व आहे. इराणच्या अल्पसंख्याक वांशिक गटांच्या घडामोडींचे ते अभ्यासक आहेत. मसूद हे हृदय शल्यचिकित्सक असून त्यांनी ताब्रिझ युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रमुख म्हणून काम केले आहे. १९९४ मध्ये त्यांची पत्नी, फतेमेह माजिदी आणि एका मुलीचा एका कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेनं मसूद यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पत्नी आणि मुलीच्या मृत्युच्या धक्क्यातून सावरत त्यांनी आपल्या डॉक्टरी पेशाचा समाजाच्या तळागळातील गरजूंना फायदा करुन दिला. मसूद यांनी पत्नीच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं नाही. दोन मुलं आणि एका मुलीचा त्यांनी एकट्यानं सांभाळ केला आहे. (Masoud Pezeshkian)
राजकारणात आल्यावर मसूद पेझेश्कियान यांना प्रथम देशाचे उपआरोग्य मंत्री म्हणून काम पाहिले आहे. पण राजकारणात नवखे असलेले मसूद कट्टरपंथी आणि सुधारणावादी यांच्यातील संघर्षात अडकले होते. त्याकाळातून बाहेर आलेल्या मसूद यांनी आपली सुधारणावादी विचारांची बाजू स्पष्ट केली. त्यामुळेच आत्ताची निवडणूक ही इराणमध्ये विचारांची निवडणूक म्हणून ओळखली गेली. या निवडणुकीत सुधारणावादी मसूद पेझेश्कियान आणि कट्टरतावादी रईस जलिली यांच्यात लढत झाली. मसूद पेझेश्कियान यांना १६.३ दशलक्ष मते मिळाली. तर जलिली यांना १३.५ दशलक्ष मते मिळाली.
राजकारणापेकक्षा मसूद पेझेश्कियान हे हार्ट सर्जन म्हणून अधिक लोकप्रिय आहेत. इराणमधील सर्वसामान्य त्यांना लोकांचा डॉक्टर या नावानं संबोधतात. त्यामुळेच त्यांचा विजय हा सर्वसामान्य इराणी नागरिकांचा विजय असल्याचे बोलले जाते. पेझेश्कियान हे कुराणचे शिक्षकही आहेत. ते शिया समुदायातील लोकांना नहज-अल-बलाघा शिकवतात. १९८० ते १९८८ पर्यंत चाललेल्या इराण-इराक युद्धादरम्यान पेझेश्कियान यांनी वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे. ताब्रिझचे खासदार असलेल्या पेझेश्कियान यांना सर्वात संयमी नेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेकदा हिजाबला विरोधही केला आहे. मतमोजणी सुरू असतानाच मसूद यांचे समर्थक आनंदोत्सवासाठी रस्त्यावर उतरले होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, मसूद पेझेश्कियान यांनी देशाच्या शिया धर्मशाहीत कोणतेही बदल न करण्याचे वचन दिले होते. मसूद पेझेश्कियान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना देशातील सर्व प्रकरणांमध्ये अंतिम मध्यस्थ मानतात. (Masoud Pezeshkian)
============================
हे देखील वाचा : ‘या’ दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होणार…
============================
मसूद यांच्या विजयाचे आंतरराष्ट्रीय स्तरातूनही अभिनंदन केले जात आहे. तज्ञांच्या मते मसूद यांची ओळक आधुनिक विचारांचा नेता अशी आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर इराणचे संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. इराणमध्ये फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स लागू करण्यावर आणि पाश्चात्य देशांकडून आर्थिक निर्बंध काढून टाकण्यासाठी धोरणे स्वीकारण्यावर पझाश्कियान आग्रही आहेत. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही एक संस्था आहे, जी मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी निधीवर लक्ष ठेवते. इराण २०१९ पासून FATF काळ्या यादीत आहे. यामुळे IMF, ADB, जागतिक बँक किंवा कोणतीही आर्थिक संस्था इराणला आर्थिक मदत करत नाही. या सर्व बदलांसाठी आता मसूद पेझेश्कियान कितपत यशस्वी होतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सई बने