नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती त्यामुळे दलित चळवळीकडे ते आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले.
दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. त्यामुळे त्यांना उपेक्षितांचे जीवन जवळून बघता आले. अर्थात त्यांचे स्वतःचे जीवनदेखील अत्यंत गरिबीत गेले. गरीबी माणसाला पोटासाठी, जगण्यासाठी काय काय करायला लावते हे त्यांनी अगदी जवळून बघीतले.
१९७३ मध्ये नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. ढसाळ हे १९६० नंतरच्या मराठी कवींमधले एक प्रतिभाशाली कवी होते. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. आंबेडकरी चळवळीशी, विशेषत: दलित चळवळीशी त्यांची बांधिलकी होती. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीप चित्रे यांचा प्रभाव दिसतो. नामदेव ढसाळ हे खऱ्या अर्थाने ‘विद्रोही’ कवी होते.
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या ‘दलित पँथर’ (Dalit Panthers) या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या आणि साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरिरीने भाग घेतला.
कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, ‘दलित पँथर’शी ढसाळ यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते. नामदेव ढसाळ यांनी गोलपीठा, खेळ, तुही यत्ता कंची, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, प्रियदर्शनी, या सत्तेत जीव रमत नाही असे एकूण नऊ काव्यसंग्रह लिहिले. हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस अशा दोन कादंबऱ्या लिहिल्या. दलित पँथर – एक संघर्ष हे वैचारिक पुस्तक लिहिले. त्यांनी अंधारयात्रा हे नाटकही लिहिले. त्याचे लेखन म्हणजे एक जळजळीत अनुभव असे आणि त्यात वास्तवता होती. जी सामान्य पांढरपेशी माणसापासून, त्याच्या कल्पनेपासून खूप दूर होती.
नामदेव ढसाळ यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार यांचे देखील ते मानकरी होते.
नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रेव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्या आजाराशी झुंजतच त्यांची वाटचाल सुरू होती. त्यानंतर त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. १३ जानेवारी २०१४ या दिवशी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु १५ जानेवारी २०१४ या दिवशी त्यांचे निधन झाले.
लेखक- सतीश चाफेकर