‘माहेरची साडी’ हा चित्रपट पाहिला नाही, असा मराठी मनुष्य सापडणे कठीण. काहींना तर हा चित्रपट पाठही असेल आणि यात काही नवलही नाही. सशक्त अभिनय, समकालीन प्रेक्षकांना भावणारे कथानक आणि आणि तितकीच भावनिक गाणी या कारणांमुळे हा चित्रपट अनेक चालला. आज या चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ‘माहेरची साडी’ चित्रपटातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या काही गोष्टी.
“माहेरची साडी” हा चित्रपट १८ सप्टेंबर १९९१ रोजी प्रदर्शित झाला होता. विक्रम गोखले, अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, आशालता, उषा नाडकर्णी, किशोरी शहाणे आदींच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाने धुवांधार यश मिळवले. पुण्यातील “प्रभात” चित्रपटगृहात तो तब्बल १२७ आठवडे चालला. मुंबईतील “चित्रा” चित्रपटगृहात त्याने ७० आठवडे मुक्काम ठोकला होता. गिरगावातील “रॉक्सी” आणि “सेंट्रल सिनेमा” अशा चित्रपटगृहांत एकूण १०१ आठवडे हा चित्रपट दाखवला जात होता. त्या वेळी तिकिटांची किंमत ही तीन ते दहा रुपये अशी होती. मात्र बॉक्स ऑफिसवर मिळविलेला या चित्रपटाने गल्ला होता बारा-तेरा कोटी रुपये.
माहेरच्या साडी चित्रपटातील मुख्य भूमिका अलका कुबल या अभिनेत्रीने गाजवली. परंतु याआधी दिग्दर्शकांच्या डोक्यात वेगळ्या अभिनेत्रीला घेण्याचा विचार होता. ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय ठरलेला ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट. या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी गुणी अभिनेत्री म्हणून भाग्यश्रीचे नाव घेतले जाते. मैने प्यार किया चित्रपटातील भूमिकेमुळे चित्रपट सृष्टीतले भाग्यश्रीचे वजन वाढले होते. तिला नवनवीन भूमिकांसाठी विचारणा होत होत्या. याच सुमारास दादा कोंडके यांचे नातू निर्माते आणि दिग्दर्शक विजय कोंडके त्यांच्या आगामी ‘माहेरची साडी’ या चित्रपटासाठी मुख्य पात्रांची निवड करत होते. बॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध चेहरा मराठी चित्रपटांत चांगली कमाई करू शकेल, असा विजय कोंडके यांना ठाम विश्वास होता. परंतु भाग्यश्रीने दीड वर्षापर्यंत काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातील भूमिका निखळपणे साकारणाऱ्या अलका कुबल यांना या चित्रपटासाठी विचारण्यात आले.
२०१७ मध्ये माहेरची साडीचा सिक्वल येतोय, असे जाहीर करण्यात आले. या चित्रपटातील अलका कुबलचा लहान मुलगा आणि त्याचे आयुष्य, यावर हा सिक्वल आधारित असेल. पण या सिक्वलमध्ये नायिकेची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता आहे. आत्ताच्या आघाडीच्या अभिनेत्री चित्रपटातील मुख्य भूमिकेला न्याय देऊ शकतील का, अशा चर्चा सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं बरं? …असो!
ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर यांनी ट्विटर द्वारे ‘माहेरची साडी’ या चित्रपटाबाबतचा एक किस्सा शेअर केला. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला, तेव्हा ग्रामीण भागातील थिएटरमध्ये प्रचंड गर्दी उसळायची. जे मिळेल ते वाहन करून लोक चित्रपट बघायला जायचे. एसटी सुद्धा तालुक्यातील थिएटरमध्ये लोकांना सोडून मग डेपोत जायची, असे दिलीप ठाकूर यांनी संगीतले.
या चित्रपटानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील अलका कुबल यांची ‘सोशिक सून’ अशी ओळख तयार झाली. अलका कुबल यांच्या या भूमिकेला तोड नाही! इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. खरं यश यालाच म्हणावं का?
लवकरच तिशीत पदार्पण करणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे क फॅक्ट्सतर्फे खूप खूप अभिनंदन.