Home » काँग्रेस – रणांगणात जिंकलेली, मैदानात हारलेली

काँग्रेस – रणांगणात जिंकलेली, मैदानात हारलेली

by Team Gajawaja
0 comment
Mahayuti vs MVA
Share

दैव देते आणि कर्म नेते या म्हणीची तंतोतंत प्रचिती कोणाला पाहिजे असेल तर ती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाकडे बघितली तर येऊ शकेल. नेत्यांची निष्क्रियता आणि कार्यकर्त्यांचा कर्मदरिद्रीपणा असूनही महाराष्ट्रातील मतदार वेळोवेळी काँग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकतात. परंतु मतदारांच्या या समर्थनाची किंवा उपकाराची जाणीव काँग्रेस नेते ठेवत नाहीत, हे गेल्या दोन अडीच दशकांमध्ये वारंवार दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित भरघोस यश मिळाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने जे ‘पहिले पाढे पंचावन्न गिरविले’ त्यावरून हेच दिसून आलं आहे. (Mahayuti vs MVA)

लोकसभा निवडणुकीत भाजप आत्मविश्वासाने भरलेला होता. त्याच्या जोडीला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळविलेले शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे गट होते. त्या तुलनेत काँग्रेस पक्षातील अर्धे-अधिक नेते पक्ष सोडून गेलेले, कार्यकर्त्यांची वानवा त्यात भरीस भर मित्रपक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे फुटीमुळे गलितगात्र झालेले गट! त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा बहुतेकांचा कयास होता, तो निकालांनी खोटा ठरविला. महाविकास आघाडीने 30 खासदारांसह दणदणीत यश कर मिळविले. त्यात 13 खासदार असलेल्या काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष असल्याचा फायदा मिळाला. अन्य कोणता पक्ष असता तर या यशाने त्याला हुरुप आला असता आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्याने कंबर कसली असती. मात्र अवसानघात करायची सवय लागलेल्या काँग्रेसने तसे काही केले नाही, हे विधान परिषद निवडणुकीत दिसून आले.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे पहिल्या पसंतीची 15 मते अधिक होती. त्या मतांचे पक्षाने व्यवस्थित नियोजन केले असते तर महाविकास आघाडीचे जयंत पाटील सहज निवडून आले असते. मात्र या अप्रत्यक्ष निवडणुकीचे नियोजन करण्यात काँग्रेस अपयशी ठरला. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अप्रतिम नियोजन करत आपला नववा उमेदवार निवडून आणला आणि लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून आपण सावरलो असल्याचा संदेश दिला. (Mahayuti vs MVA)

ही निवडणूक काही केवळ एका उमेदवाराला निवडून आणणे किंवा अन्य पक्षावर कुरघोडी करणे, एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण किती तयारीत आहोत हे दाखविण्याची ती एक संधी होती. या मतदानाच्या केवळ एक आठवडा आधी महायुतीतील पक्षांनी मुंबईत मेळावा घेतला. अत्यंत घाईघाईने बोलाविलेल्या त्या मेळाव्यालाही बऱ्यापैकी गर्दी जमली होती. मेळाव्यात बोलणाऱ्या सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी गाफीलपणा दूर ठेवण्याची तसेच आपसातील एकोपा कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये अवघ्या दोन लाख मतांचा (0.3 टक्के) फरक आहे हे त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने ठासून सांगितले होते. आपण एकदिलाने काम केले तर हाय अंतर भरून येणे अवघड नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.

जी गोष्ट त्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कानाआड केली हेच विधान परिषदेने दाखवून दिले. एकीकडे महायुती पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची तपशीलवार बेगमी करत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करावा यासाठी संजय राऊत आग्रह धरत होते तर कुठलाही एक चेहरा नसावा म्हणून नाना पटोले एक बाजू लावून धरत होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. किंबहुना त्याचा महायुतीला जो हवा होता तोच परिणाम झाला. (Mahayuti vs MVA)

काँग्रेसच्या या बेफिकिरीमुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला एवढेच या निवडणुकीचे फलित नाही. काँग्रेसची अनेक मते फुटली अशीही चर्चा निकालानंतर सुरू झाली. याचा अर्थ निवडणुकीत जनाधार मिळाला तरी एकसंघपणाआणि एकदिली या काँग्रेसमध्ये अजूनही आलेल्या नाहीत. तसे नसते तर पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष आषाढी वारीमध्ये गेलेले असताना त्यांच्याच पक्ष सहकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या नसत्या. अरविंद शिंदे हे निवडणुकीच्या काळात निष्क्रिय राहिले म्हणून पुण्यात भाजपचा पराभव झाला असा शोध या नेत्यांनी लावला आणि त्यांनी शिंदे यांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या. एवढे कशाला, आता ‘गद्दारांची’ नावे जाहीर करू आणि त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. तिकडे काँग्रेसचे अनेक आमदार आम्ही क्रॉस व्होटिंग केले नाही, म्हणून आणाभाका घेत आहेत.

काँग्रेस जेव्हा ऐन भरात होती, केंद्रात आणि राज्यात तिची एक हाती सत्ता होती त्यावेळी हे सर्व प्रकार लोकांच्या अंगवळणी पडले होते. राजकारण म्हणजे काँग्रेसच्या वेगवेगळ्या गटांनी एकमेकांच्या विरोधात डाव प्रति डाव टाकायचे असेच लोकांना वाटायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीचे भान स्वतःला काँग्रेस नेते म्हणून घेणाऱ्या मंडळींना अजूनही आलेले नाही. पक्षश्रेष्ठी उर्फ हाय कमांड यांच्या नावाने सर्वत्र मिरवायचे आणि इतिहासातील पुण्याईच्या बळावर मतदारांना मतांची गळ घालायची, ही काँग्रेसची शैली झालेली आहे. त्यांच्या याचनेला प्रतिसाद देऊन मतदार जेव्हा भरभरून यश देतो तेव्हा त्याची बूज राखायची दानतसुद्धा काँग्रेसची मंडळी दाखवत नाहीत. (Mahayuti vs MVA)

फार दूर जाण्याची गोष्ट नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होता. त्यावेळी 105 आमदार असलेला भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्या खालोखाल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना यश मिळाले. परंतु काहीही प्रयत्न न करता किंवा हातपाय न हलवता म्हटले तरी चालेल, काँग्रेसचे 27 आमदार निवडून आले. हा आकडा पाहून बाकीच्या मंडळींना सोडा खुद्द काँग्रेसच्याच लोकांना आश्चर्य वाटले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालानंतर अचानक भाजपशी काडीमोड घेतला. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करणे अशक्य झाले. एक महिन्यापेक्षा जास्त राज्यात कुठलेही सरकार नव्हते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात शरद पवार होते. त्यावेळीसुद्धा त्या प्रयत्नांना काँग्रेसने सुमारे एक महिना दाद दिली नव्हती. अखेर अजित पवार यांच्या त्या सुप्रसिद्ध बंडानंतर काँग्रेसच्या मंडळींना जाग आली आणि शिवसेना व राष्ट्रवादीसोबत त्यांनी सरकार स्थापन करण्याची तयारी दाखविली.
भारताच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं की भारत लढाईत जिंकतो आणि तहात हरतो. त्यात थोडासा बदल करून तीच गोष्ट काँग्रेसबद्दल बोलता येऊ शकते. म्हणजे काँग्रेसचे कसे आहे, की काँग्रेस निवडणुकीच्या रणांगणात जिंकते आणि राजकारणाच्या मैदानात हारते. ही त्या पक्षाची पूर्वीची सवय नाही, ही अगदी अलीकडे लागलेली खोड आहे.

याचे एक समर्पक उदाहरण 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत दिसते. त्यावेळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष 17 जागांवर विजय मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला, तर भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले. मग आपले सरकार येणार या आनंदात काँग्रेस एवढा गाफील बसला की तोपर्यंत नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने त्वरेने हालचाल करून दोन अपक्ष आमदार तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पार्टी ह्या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांचा पाठिंबा भाजपने मिळविला. काँग्रेसला जाग आली तोपर्यंत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या राजकारणात परत येऊन मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. (Mahayuti vs MVA)

====================

हे देखील वाचा : आज नकद, उद्या मतदान… महायुतीची खेळी फळणार?

====================

आताही तेच घडताना दिसत आहे. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या न्यायाने काँग्रेसला अवचित व अनपेक्षित असे यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. त्यामुळे आता विधानसभा फत्ते झाली आणि पुढला मुख्यमंत्री आपलाच अशी खुशीची गाजरे काँग्रेसची मंडळी खात आहेत. नाना पटोले यांच्यासारख्या प्रदेशाध्यक्षाला तर आपण ‘वर्षा’वर पोचलो आहोतच असा भास होत आहे. परंतु प्याला आणि ओठांमध्ये जर- तरच्या अनेक गोष्टी असतात (There are lots of ifs between the cup and lips), अशी एक इंग्रजी म्हण आहे. मविआ आणि महायुती यांच्या मतांमध्ये अगदी किरकोळ फरक आहे आणि विधानसभा निवडणुकीत तो भरून काढणे फारसे अवघड नाही. समोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा धुरंधर राजकारण पटू असताना आणि त्यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासारखे कसलेले राजकीय मल्ल आहेत. अशा अवस्थेत विधानसभेची निवडणूक ही आपल्या हातचा मळ आहे या धुंदीत काँग्रेस आहे. त्यामुळे परत रणांगणात जिंकून मैदानात हारण्याची काँग्रेसवर येणार, हे सांगायला भविष्यवेत्यांची गरज नाही.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.