Home » महाकालबाबांची महाशिवरात्र

महाकालबाबांची महाशिवरात्र

by Team Gajawaja
0 comment
Mahashivratri
Share

मध्यप्रदेशमधील उज्जैननगरी ही महाकाल बाबांची नगरी म्हणून ओळखली जाते. उज्जैनमधील भगवान महाकालेश्वराच्या मंदिराचे वर्णन महाभारत आणि कालिदास यांसारख्या महान कवींच्या ग्रंथातही आढळते. महाकालबाबांच्या दर्शनानं मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. याच महाकालबाबांचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनमध्ये भक्तांची अहोरात्र गर्दी असते. मात्र महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी हे मंदिरच काय, पण मंदिराच्या आसपासही पाय ठेवायला जागा नसते, एवढी भक्तांची गर्दी असते. भक्तांचा हा येणारा महापूर बघता, महाकाल मंदिरात आत्तापासून महाशिवरात्रीच्या नियोजनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या आठवडाभर आधी महाकालेश्वर मंदिरात विविध पुजाविधी सुरु होणार आहेत. यामध्येही भोलेबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्र (Mahashivratri) साजरी होणर आहे. उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यावेळी महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील चांदीचा मुलामा लावलेल्या भींती स्वच्छ करण्याचे काम सुरु झाले आहे. शिवाय या मंदिरातील चांदीचे रुद्र यंत्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. महाकालबाबांचा उत्सव 29 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे, त्यामुळेच मंदिर परिसरातील साफसफाई आणि सजावटीच्या कामांनाही वेग आला आहे. शिवनवरात्रीच्या काळात सकाळपासून दुपारपर्यंत महाकाल बाबांची विशेष अभिषेक पूजा होणार आहे. या नऊ दिवसात सायंकाळच्या आरतीच्या वेळी महाकालबाबांना विविध रूपात सजविण्यात येणार आहे. या सर्व विधींदरम्यान मंदिरातील पुजारी उपवास ठेवतात.

या नऊ दिवसांच्या काळात मंदिराच्या आवारातील कोटितीर्थ कुंडाजवळील श्री कोटेश्वर महादेवाची अभिषेक पूजा दररोज सकाळी 8 वाजता होणार आहे. महदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रमही केला जातो. महादेवला जेव्हा हळद चढवली जाते, तो सोहळा बघण्यासाठी हजारो भक्त गर्दी करतात. महादेवाला सकाळी 9.30 पासून हळद चढवण्यात येणार आहे. ही पूजा दुपारी एक वाजेपर्यंत होईल. त्यानंतर महाकालबाबांना भोग चढवण्यात येईल आणि त्यांची आरती करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळच्या पूजेसाठी दुपारी 3 वाजता बाबांचा नित्य शृंगार करण्यात येणार आहे.

भगवान महाकालची सायंकाळ आरती 5 वाजता होते. मात्र शिवनवरात्रीच्या काळात सकाळी 10.30 वाजता होणारी भोग आरती दुपारी 3 वाजता होणार असून सायंकाळची पूजा 5 ऐवजी 3 वाजता होणार आहे. या सर्वच सोहळ्याला भक्तांची गर्दी असते. महाशिवरात्रीला (Mahashivratri) महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त थांबून जातात. त्यामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून 8 मार्च आणि दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी महाकाल बाबांच्या भस्म आरतीसाठी ऑनलाइन बुकिंग होणार नाही. मंदिर व्यवस्थापन समितीने दोन्ही दिवस ऑनलाइन बुकिंग बंद केले आहे. दोन्ही दिवसांसाठी समितीकडून ऑफलाइन परवानगी दिली जाईल.

==========

हे देखील पहा : या देवाची स्थापना प्रत्यक्ष ‘श्री कृष्णांनी’ केली आहे

==========

महाकाल मंदिराचे महत्त्व हिंदूधर्मियांसाठी खूप मोठे आहे. एकमात्र असे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. पौराणिक ग्रंथामध्ये या मंदिराची महती सांगण्यात आलेली आहे. पुराणानुसार, उज्जैन शहराला अवंतिका असे नाव होते. देशातील हिंदू धर्मियांचे भक्तीस्थान म्हणून अवंतिकानगरीचा उल्लेख करण्यात येत होता. येथे भक्तांच्या हाकेला धावून आलेले भगवान शंकर आपल्या महाकाल रूपात प्रकट झाले. आणि याच भव्यरुपात महाकाल मंदिरात शिवलिंगाच्या रुपात स्थापन झाले. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये एक असलेले हे महाकालेश्वर दक्षिणमुखी आहे. येथेच ओंकारेश्वर महादेवाची मूर्ती महाकाल मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यात स्थापित आहे. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला गणेश, पार्वती आणि कार्तिकेयच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. दक्षिणेला शिवाचे वाहन नंदीची मूर्ती आहे. मात्र या मंदिरात नेहमी भक्तांना जाता येत नाही.

महाकाल बाबांचा उल्लेख उज्जैनचा राजा म्हणून करण्यात येतो. त्यामुळेच या महाकालबाबांची महाशिवरात्र मोठ्या भक्तीभावात साजरी केली जाते. महाकाल बाबांची पालखीही मोठ्या दिमाखात निघते, यानिमित्त अवघी उज्जैननगरी सजवण्यात येते. महाशिवरात्रीच्या (Mahashivratri)  दिवशी मंदिराजवळ मोठी जत्रा भरते आणि रात्रभर पूजा चालू असते. ही यात्रा पुढचे काही दिवस कायम असते. आता या मंदिराचे स्वरुप अधिक भव्य करण्यात आले आहे. तसेच भक्तांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरा महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भक्त महाकालबाबांच्या दर्शनास येतात. या सोहळ्यासाठी आत्तापासून तयारी सुरु झाली आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.