बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा! अश्या शब्दात ज्याचं वर्णन केलं जातं, असं आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, शूरवीरांची भूमी जिथे शिवाजी महाराजांसारख्या राजांनी जन्म घेतला आणि सर्वधर्मसमभाव शिकवला, माताभगिनींचा आदर करायला शिकवला. याच मातीत अनेक स्वातंत्र्य सैनिक जन्माला आले, अनेकानी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही. अनेक समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट सोसले. अशा या महाराष्ट्राचे वर्णन करताना राम गणेश गडकरी म्हणतात मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा. समर्थ रामदासांनी सुद्धा मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे सांगितले आहे.
अशा या महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० रोजी करण्यात आली आणि तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) म्हणून साजरा होऊ लागला. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली. पंडितजींनी या महाराष्ट्राची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपवली. या दिवशी महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते. याची पार्श्वभूमी अशी की स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देणं नाकारलं होत.

या बाबतीत सरकारचा निषेध करण्यासाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी कामगारांचा भव्य मोर्चा फ्लोराफाऊंट (Hutatma Chowk) येथील चौकात जमला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमला. पोलिसांनी लाठीचार्ज केला तरीही मोर्चा आवरेना शेवटी मुंबई (Mumbai) राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात १०६ आंदोलकांना हौतात्म्य आलं. या बलिदानापुढे नमतं घेत शेवटी सरकारने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. आणि याच हुतात्म्यांच्या बलिदानार्थ १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात आली.
१ मे जसा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तसाच कामगार दिवस (International Workers’ Day) किंवा जागतिक श्रमिक दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. या सगळ्याची सुरवात झाली ती १८८६ मध्ये शिकागो येथे. हायमार्केट येथे सगळ्या वर्कसने/लोकांनी एकत्र जमून संप केला. संपाचा कारणच हे होतं की कामाची वेळ ही आठ तासाची असावी.
४ मे रोजी जेव्हा पोलिसांनी संप थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा गर्दीमधून काही लोकांनी पोलिसांवर बॉम्ब टाकून हल्ला केला. या ब्लास्ट मध्ये सात पोलीस आणि ३७ नागरिकांचा मृत्यू झाला तर ६० पोलीस आणि जवळ जवळ ११५ लोक जखमी झाले. ही घटना हायमार्केट अफेयर या नावाने प्रसिद्धीस आली.

१८८९ मध्ये झालेल्या इंटरनॅशनल सोशियालिस्ट कॉन्फरन्समध्ये या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून घोषित करण्यात आला आणि कामाचे तास हे आठ असावेत याचे जागतिक पातळीवर प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आले.
भारतात १९२३ साली चेन्नई मध्ये पहिल्यांदा कामगार दिवस साजरा झालेला पाहण्यात आला. हा दिवस कामगार किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान या संघटनेकडून साजरा केला गेला. संघटना प्रमुख मल्ल्यापुरम सिंगरवेलु चेत्तीअर यांनी रेड फ्लॅग उंचावून आणि सभा अरेंज करून दिवस साजरा केला. रेड फ्लॅग हे कामगार दिनाचं निशाण मानण्यात येते.
कामगार दिवस हा जागतिक पातळीवर साजरा केला जात असला तरी काही देशांत हा दिवस वेगळ्या तारखांना आणि वेगळ्या महिन्यांमध्ये साजरा केला जातो.. उदारणार्थ – कॅनडा मध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा केला जातो.
शब्दांकन: सई मराठे / अमृता आपटे