– रश्मी वारंग
आषाढ महिना आला की वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. ही वारी म्हणजे फक्त वारकरी समुदायासाठीच नाही तर पंढरीच्या विठुरायावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आनंदनिधान आहे. अनेक घरांमध्ये वारी ही परंपरा आहे. अशा या वारीचे मूळ आणि तिची परंपरा जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक विशेष गोष्टी हाती लागतात.
वारी आणि संतपरंपरा यांचे नाते अतूट आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. संत एकनाथ, संत तुकाराम यांनी ही परंपरा पुढे नेली. वारी त्या आधीही अस्तित्वात होती. पण तिला सध्याचे सुविहित असे रूप प्राप्त झाले नव्हते. वारी या शब्दाचा अर्थ आहे ‘येरझार’. वारंवार केली जाते ती वारी. या वारीवरूनच वारकरी हा शब्द निर्माण झाला. संत ज्ञानदेवांच्या आधीही अनेक भक्त एकत्र येऊन पंढरपूरला (Pandharpur ) दिंडी नेत.

पंढरपूरचे मूळ नाव ‘पंडरंगे’. वैकुंठीचा देव विष्णू पंढरपुरी आपल्या भक्ताच्या पुंडलिकाच्या भेटीला आला आणि पुंडलिकाने दिलेल्या विटेवर तो उभा राहिला. ही पंढरीच्या विठूरायाची कथा सर्वज्ञात आहे. त्याशिवाय कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही म्हणून रुक्मिणी रुसून पंढरपूरजवळील दिंडीरवनात येऊन राहिली आणि तिची समजूत काढण्यासाठी गोपवेष धारण करून कृष्ण तिच्या मागे आला अशीही एक कथा सांगितली जाते.
एकूणच भगवान विष्णूंचे रूप असणाऱ्या या विठ्ठलाची पंढरपूराशी नाळ जोडली गेली. त्याचे दर्शन घेण्यासाठी लोकं येऊ लागले. त्याकाळात प्रवासाची फारशी साधने नसल्याने एकट्याने प्रवास त्रासाचा आणि असुरक्षित होता. त्यामुळे छोट्या छोट्या समूहाने लोक पंढरपुरी जात. त्याच समूहाचे दिंडीत आणि दिंडीचे रूपांतर वारीत झाले.

आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशा चार वारी केल्या जातात. ह्या चारही वारी करणे प्रत्येक वारकऱ्याला शक्य होत नाही. पण या चारपैकी एक तरी वारी वर्षभरात अवश्य करावी असा नेम आहे. पंढरीची वारी पायीच करावी असाही नेम होता पण काळाच्या ओघात वाहनांच्या सुलभतेने हा नियम पाळण्याचे बंधनही आता उरलेले नाही.
वारीसोबतच रंगणारा पालखी सोहळा हे वारीचे खास वैशिष्ट्य. त्याविषयी पुढच्या लेखात अवश्य जाणून घेऊ.
======
हे देखील वाचा: अवघाचि संसार……’पायी वारी ते ऑनलाइन वारी’
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.