Home » राजकारण: एका ‘खुर्ची’मुळे घडलेले महाभारत

राजकारण: एका ‘खुर्ची’मुळे घडलेले महाभारत

by Correspondent
0 comment
राजकारण
Share

राजकारण

महाराष्ट्राचे राजकारण हा सध्या चर्चेचा विषय आहे. राजकारण्यांना ‘खुर्ची’ किती प्रिय असते आणि त्याच्यावरून कसे ‘महाभारत’ घडते याचे प्रत्यंतर नुकतेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रात राजकारणाची पातळी इतक्या खालच्या स्तराला गेली आहे की, कोणत्याही गोष्टीचे ‘भांडवल’ करून सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची चिखलफेक करून ”शिमगा’ करण्यात आनंद मानीत आहेत. ‘सारे काही खुर्चीसाठी’ चालू असणाऱ्या या ‘तमाशा’त’ आता खरोखरच एका ‘खुर्ची’ने  नव्याने भर घातली आहे. 

हे ‘खुर्ची’ प्रकरण म्हटले तर तसे साधे आहे. नवी दिल्लीत निलंबन केलेल्या राज्यसभेतील काही खासदारांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गेले होते. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे देखील होते. हे सर्वजण उपोषणार्थी खाली बसले होते आणि शरद पवार उभे राहून त्यांच्याशी बोलत होते . वयोमानानुसार शरद पवार यांना खाली बसता येत नाही हे लक्षात घेऊन संजय राऊत यांनी स्वतःच त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणली. त्याचे छायाचित्र व्हायरल होताच भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर आणि इतर नेत्यांनी यांनी लगेच जसे काही हातात कोलीत मिळाल्यासारखे  संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.

Sanjay Raut's real guru is Sharad Pawar' What is the answer of Shiv Sena? |  Sharad Pawar was given a chair by Sanjay Raut, BJP leaders criticize Sanjay  Raut over viral photo |

वास्तविक एका ज्येष्ठ नेत्याला बसण्यासाठी कोणीतरी खुर्ची आणून दिली यामध्ये लगेच टीका करण्यासारखे काय होते हे समजायला मार्ग नाही मात्र सत्तारूढ पक्षातील नेत्यांची कोणत्याही  ‘कृती’ ची लगेच दखल घेऊन त्यावर टीका करणे हा विरोधकांनी जणू काही आपला ‘धर्म’ मानला आहे. आणि त्यातूनच पुढे ‘महाभारत’ कसे घडेल याचीही तजवीज त्यांनी करून ठेवली आहे असे दिसते.  

आपल्यावरील टीकेची संजय राऊत यांनीही तातडीने दखल घेतली आणि खास पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी भातखळकर यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी, मराठी भाषेत ज्याला ‘अश्लील’ म्हणून  समजले जाते असा एक हिंदी शब्द वापरला. मात्र नंतर त्याचे त्यांनी समर्थनही केले. त्यासाठी त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनीही  तो शब्द कसा वापरला याची व्हिडीओ क्लिप दाखविली.  त्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘मूर्ख’, ‘शतमुर्ख”, ‘पढतमूर्ख” असा युक्तिवादही त्यांनी केला. परंतु राऊत यांच्या त्या शब्दामुळे पुढे ‘महाभारत’ घडलेच. 

भाजप नेत्यांनी तो शब्द ‘अश्लील’ आहे म्हणून  राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यासाठी मुंबईत पोलीस ठाण्यासमोर जाऊन निदर्शनेही केली. अर्थात त्याला पार्श्वभूमी होती ती मुंबईचे भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर अशाच प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची. 

आशिष शेलार यांनीही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बोलताना अशीच खालची पातळी गाठली होती. मराठी भाषेत अनेक शब्दांचे द्वैअर्थी अर्थ निघू शकतात. त्यामुळे  बोलताना — विशेषतः महिलांवर टीका करताना  योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. मात्र आशिष शेलार यांनी ती काळजी घेतली नसावी. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगानेही  लगेच दखल घेतली आणि शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि या गुन्ह्यात आपणास अटक होऊ नये म्हणून शेलार यांनी जामीनही मिळविला. 

Mumbai Mayor Kishori Pednekar complaint against Ashish Shelar | "…एवढे तास  कुठे निजला होतात", आशिष शेलारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर महापौर  पेडणेकरांची थेट ...

एका शब्दामुळे कसे ‘महाभारत’ घडू शकते  त्याची ही वरील उदाहरणे पाहता राजकीय नेत्यांनी परस्परांवर टीका करताना ‘विवेकबुद्धी’ वापरण्याची किती गरज आहे हे कळून येते. हल्ली राजकारण करताना सत्तारूढ तसेच विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीचे ‘राजकारण’ केले जाते आणि त्यानिमित्ताने परस्परांवर टीका करण्याची  संधी शोधली  जाते. विशेषतः महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून त्याला ‘पायउतार’ करण्याच्या खटाटोपात या ‘टीकेच्या राजकारणाने ‘ फार खालची पातळी गाठली आहे. 

हे ही वाचा: राज्य सरकार ‘स्थिर’ परंतु कारभार ‘अस्थिर’

मध्यंतरी मुख्यमंत्र्याबद्दल असेच अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची नामुष्कीही घडली होती. मात्र त्या घटनेपासून कोणीही ‘बोध’ घेतला नसावा अशीच सध्याची परिस्थिती आहे. परस्परांना राजकीय शह-काटशह  देऊन कोणीतरी मिळविलेली

‘सत्तेची खुर्ची’ त्याच्याकडून हिसकावून घेण्याच्या प्रयत्नांत संपूर्ण राजकारणाचाच विचका होऊन गेला आहे. हे कोणाच्याच लक्षात कसे येत नाही, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन साधक-बाधक चर्चा करून तोडगा काढण्याची गरज आहे. नाही तर भावी काळात जनतेच्या दृष्टीने राजकीय नेते म्हणजे ‘फुकट करमणुकीची’ साधने बनण्याचीच शक्यता आहे. एका ‘खुर्ची’ प्रकरणाने त्याची जाणीव करून दिली आहे.

– श्रीकांत नारायण

 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

इतर लेख: भाजपविरोधी आघाडी : ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ‘खलनायिका’ ठरणार ?

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.