Home » राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून

by Correspondent
0 comment
Share

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. हे पावसाळी अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.
पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांसह अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दोन दिवस एकाच ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे आमदार आणि त्यांचे पीए, अधिकारी या गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.


महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत दोन दिवसांचे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच तेच अधिवेशनाला येता येणार आहे. राज्यात आतापर्यंत साधारणपणे 35 हून अधिक आमदार, मंत्र्याना कोरोनाची बाधा झाली. त्यातून काही बरे झाले तर काहींवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी अधिवेशनासाठी सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले जाईल. तसेच अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे.विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत.


अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत. आमदार आणि मंत्री यांना फक्त एकच पीए हा विधिमंडळात बरोबर आणण्याची परवानगी दिलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या स्टाफच्या जेवणाची सोय देखील विधी मंडळाच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्शवभूमीवर होणारे अधिवेशन हे जितके आव्हानात्मक आहे तितकेच ते वेगळे ठरणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.