भारताचे मोठे सौभाग्य आहे की या देशात अनेक महान आणि मोठ्या लोकांनी जन्म घेत देशाला, समाजाला योग्य देश देत वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले. आजपर्यंत या देशात अनेक महान लोकं होऊन गेले ज्यांनी देशहितासाठी अतुलनीय योगदान दिले. यातलेच एक मोठे आणि महत्वाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशिवाय कायम भारताचा इतिहास अपूर्ण राहील. त्यांनी त्यांच्या कार्याने देशाला विकासाच्या मार्गावर नेले.
आज ६ डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिवस. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुःखद निधन झाले. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६८ वी पुण्यतिथी आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी असलेले भीमराव रामजी आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले आणि त्यामुळे आजचा दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.
७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. बाबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातील, देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करतात. महापरिनिर्वाण दिवस साजरे करण्याचे महत्त्व जाणून घेऊया.
परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. महापरिनिर्वाण हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ मुक्ती किंवा मोक्ष असा होतो. परिनिर्वाण हे बौद्ध धर्माच्या अनेक मुख्य तत्वांपैकी एक आहे. यानुसार जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. यासोबतच तो जीवन चक्रातूनही मुक्त राहतो. म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. पण निर्वाण मिळवणे सोपे नाही. त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावे लागते. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या वयाच्या ८० व्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात.
६ डिसेंबरच्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे जनक आणि समाजसुधारक डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस, त्यांच्या योगदानाला आणि जीवनातील आदर्शांना विनम्र अभिवादन केले जाते. डॉ. आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहे.
डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक विषमता, जातीय भेदभाव, अस्पृश्यता, वंचित वर्गाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले. सामाजिक कार्य करताना त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देखील मोठा लढा दिला. शिवाय देशाचे पहिले संविधान तयार करत ते भारतचे पहिले कायदा मंत्री देखील झाले. बाबासाहेबांनी आपल्या लेखणीतून अनेक विचार मांडले त्यांनी अनेक विषयांची विविध प्रकारची भरपूर पुस्तकं लिहिली.
महापरिनिर्वाण दिनी आपण बाबासाहेबांना महान विचारवंत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून आदरांजली वाहतो. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांची विचारधारा आजही समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी केवळ दलित आणि मागासवर्गीयांसाठीच लढा दिला नाही तर संपूर्ण भारतीय समाजासाठी समान, न्याय आणि प्रगतीशील राष्ट्राचा पाया घातला. बाबासाहेबांचे अनुयायी असे मानतात की, ते गुरू भगवान बुद्धांसारखे अत्यंत प्रभावी आणि सद्गुरु होते आणि त्यांच्या कृतीमुळे त्यांना निर्वाण प्राप्त झाले आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ६ डिसेंबर रोजी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दिवे आणि मेणबत्त्या पेटवतात. यावेळी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात येते. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवरही गर्दी जमते.