महाकुंभमेळा प्रयागराज येथे सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवघी राहिला असतांना आता या भागात मोठ्या प्रमाणात साधू संतांचा वावर वाढला आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. असे मानले जाते की अमृत कलशासाठी देव आणि दानवांचे जे युद्ध चालू होते, त्यात अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले. ते थेंब ज्या ठिकाणी पडले, तिथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. यावेळी हा कुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे. महाकुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. त्यामुळेच या कुंभमेळ्यात लाखो भाविक सामिल होतात. जसे सामान्यांना या कुंभमेळ्याचे आकर्षण असते, तसेच साधूसंतांनाही असते. त्यातही नागा साधू या कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून हजर होतात. आकाशाला वस्त्र मानणारे हे नागा साधू म्हणजे, एक गुढ मानलं जातं. भारतीय साधुंच्या आखाड्यांच्या परंपरेत नागा साधुंचे स्थान खूप वरचे आहे. (Prayagraj)
अंगावर कोणताही कपडा परिधान न करणारे हे साधू भगवान शंकराचे परम भक्त असतात. युद्ध कलेत तज्ञ असणारे हे नागा साधू फक्त महाकुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने दिसतात. अन्यवेळी हे नागा साधू कुठे आणि कसे राहतात, हे कोडं आहे. या कोड्यामुळेच नागा साधुंबद्दल सर्वसामान्यांना मोठं आकर्षण वाटतं. त्यामुळे महाकुंभमध्ये या नागा साधुंना बघण्यासाठीही मोठी गर्दी होते. प्रयागराजमध्ये नव्या वर्षात होणा-या महाकुंभसाठी प्रशासनाची तयारी सुरु असतांना या महाकुंभमेळ्याचे जे प्रमुख आकर्षण आहे, ते साधू संत प्रयागराजमध्ये यायला लागले आहेत. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाच्या तारखा महत्त्वाच्या असतात. या दिवशी लाखो संत आणि भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. साधु संत स्नान करण्याचा हा क्रमही वर्षानुवर्ष ठरलेला आहे. प्रत्येक आखाड्याचा मान येथे ठरलेला असतो. या सर्वात आणखी मोठा गट असतो, तो नागा साधुंचा. हे नागा साधू भारतातील सनातन परंपरेतील ऋषी-संन्यासी असून त्यांची कठोर तपश्चर्या, त्याग आणि आध्यात्मिक साधना मोठी असते. (Social News)
दर 12 वर्षांनी एकदा भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या स्नानासाठी हे नागासाधू मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यांच्या स्नानाच्या वेळी सर्वसामान्यांसाठी संगमस्थान बंद करण्यात येते. हे साधू स्नानासाठी भल्यापहाटे मोठ्या मिरवणुकीतून जातात. त्यांची ही मिरवणूक बघण्यासाठी भाविकांची गर्दी होते. नागा साधूंची राहण्याची पद्धती आणि त्यांची तपश्चर्या यामुळे त्यांच्याबद्दलचे कुतूहल कायम वाढत आहे. नागा साधू समाजापासून दूर राहून ध्यानधारणेत जीवन व्यतीत करतात. नागासाधू भगवान शंकराचे भक्त मानले जातात. भगवान शंकराला अराध्य दैवत मानून ते ध्यान करतात. त्यामुळेच त्यांच्या अंगावर अनेक रुद्रांक्षांच्या माळा असतात. कुंभमेळ्यात, वेगवेगळ्या आखाड्यांमधील नागा साधू एकमेकांना भेटतात, विचारांची देवाणघेवाण करतात आणि त्यांचे सामाजिक बंध दृढ करतात. नागा साधू युद्ध कलेत पारंगत असतात. त्यांना तलवार, त्रिशूळ आणि इतर शस्त्रे कशी वापरायची हे माहित असते. त्यांच्या शरीरावर कुठल्याही तापमानाचा परिणाम होत नाही, असे सांगितले जाते. (Prayagraj)
=====
हे देखील वाचा : महाकुंभसाठी प्रयागराज तयार
========
कारण नग्न वावरणारे नागा साधू कडाक्याच्या थंडीमध्ये अत्यंत उत्साहानं पवित्र नदिमध्ये स्नान करतात. हे नागा साधू आपल्या शरीराला कठोर करण्यासाठी थंड प्रदेशात जास्त राहत असल्याचे सांगितले जाते. जिथे माणसांची चाहूल नसते, अशा ठिकाणी हे नागा साधू राहत असतात. नागा साधू म्हणजे नेमके कोण, असा प्रश्नही अनेकांना पडतो, तसेच हे साधू नग्न का राहतात, असाही प्रश्न असतो. त्यामागे महान आदिगुरु शंकराचार्य यांचे विचार आहेत. आदिगुरू शंकराचार्यांना जाणीव होती की, येणा-या युगात परकीय शक्तींना तोंड देण्यासाठी आध्यात्मिक शक्ती पुरेशी पडणार नाही. यासाठी तरुण साधूंनी व्यायाम करून आपले शरीर बळकट करावे आणि शस्त्रे वापरण्यातही प्रावीण्य मिळवावे यावर भर दिला. त्यामुळे जिथे मठ तिथे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले. या सर्वांना कठोर नियम टाकण्यात आले. तसेच सर्व परिस्थितीला तोंड देता येईल, असे श्रम त्यांच्याकडून करुन घेण्यात आले. त्यातूनच नागा साधूंचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. आता भारतातील प्रत्येक आखाड्यांमध्ये नागा साधूंची मोठी संख्या आहे. हे सर्व नागा साधू महाकुंभमेळ्यात एकत्र येतात. येत्या महाकुंभमेळ्यातही मोठ्या संख्येनं नागा साधू येणार आहेत. (Social News)
सई बने