“पौष पौर्णिमेच्या पवित्र स्नानासह, आजपासून प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ सुरू झाला आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो. तुम्हाला माझ्या मनापासून सलाम आणि अभिनंदन. भारतीय आध्यात्मिक परंपरेचा हा महान उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे.” अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रयागराजमधील महाकुंभची सुरुवात अपेक्षेपेक्षा अधिक भाविकांच्या उपस्थितीनं झाली आहे. दुपारी तीनपर्यंत पवित्र संगम स्थळावर 1 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या महाकुंभमध्ये 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा याआधी व्यक्त होत होती. मात्र महाकुंभच्या पहिल्याच दिवसाला भाविकांच्या मोठ्या संख्येनं पुढच्या 45 दिवसात महाकुंभच्या पवित्र स्थानी 50 कोटी भाविक येतील अशी शक्यता आहे. मुख्य म्हणजे, या सर्वात भारताच्या सर्वराज्यातील भाविकांचा समावेश आहे. (Maha Kumbh)
शिवाय जगभरातील अनेक देशांमधून आलेल्या परदेशी नागरिकांचा मोठा सहभाग आहे. पवित्र संगम स्थानावार स्नान करण्यासाठी पहाटेपासून कडाक्याच्या थंडीमध्ये हे परदेशी भाविक सामिल झाले आहेत. स्थानिक भाविकांसोबत त्रिवेणी स्नानाचे महत्त्व कसे आहे, हे जाणून घेण्यात या परदेशी नागरिकांची संख्या अधिक आहे. भारतातील हा महाकुंभ म्हणजे, एक अद्भूत आणि अद्वितीय अनुभव असल्याचे या परदेशी नागरिकांनी सांगितले आहे. तिर्थराज प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ सुरु झाले आहे. पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे, यात परदेशी नागरिकांची मोठी गर्दी आहे. प्रयागराजमध्ये कडाक्याची थंडी आणि प्रचंड धुके आहे. या कडाक्याच्या थंडीमध्ये संगमस्थानावर हे परदेशी भाविक स्नान करत आहेत. (Social News)
भारतीय पेहराव , गळ्यात रुद्राक्षाचे माळा आणि कपाळावर मोठे टिलक लावलेले परदेशी नागरिक लक्ष वेधून घेत आहेत. 144 वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभाच्या पहिल्या अमृत स्नानात सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इटली, जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, स्विडन, पोर्तुगाल यासह अनेक देशांतील भाविकांनी हजेरी लावली आहे. यापैकी अनेक परदेशी भाविकांनी आखाड्यात राहून सेवा केली आहे. तसेच यापैकी अनेकांना अमृत स्नानाचे महत्त्व आणि सूर्य उपासना याची माहिती आहे. या सर्वांनी स्नान केल्यावर सूर्याची उपासन केली आहे. शिवाय प्रयागराजमधील बडे हनुमान मंदिर आणि अक्षयवटवृक्षाचे दर्शन घेण्यासाठीही या भाविकांनी गर्दी केली आहे. प्रयागराज महाकुंभ हा या अमृत स्नान केल्यावर या दोन स्थानांचे दर्शन घेतल्यावर पूर्ण समजला जातो. या परदेशी भाविकांमध्ये योग करणारेही अनेक उपासक आहेत. ब्राझिल मधून मोठा गट प्रयागराजमध्ये आला असून यातील सर्व सदस्य हे हरिद्वार येथील योग प्रशिक्षण केंद्रात योगाचे प्रशिक्षण घेत आहेत. येथेच त्यांना महाकुंभची माहिती मिळाली. (Maha Kumbh)
प्रयागराजमधील दृष्य पाहून त्यांना प्रथम गर्दीची भीती वाटली, मात्र भारतीयांनी आपल्याला वेगळे असल्याची जाणीव होऊन दिली नाही. भारतीयांची ही आध्यात्मिक आणि सामाजिक एकीची ताकद प्रशंसनीय असल्याचे या नागरिकांनी अभिमानानं सांगितले. याशिवाय भारतातून परदेशात रहायला गेलेल्या अनेक भारतीयही या महाकुंभसाठी पुन्हा आपल्या देशात आले आहेत. यामध्ये जर्मनीचे नागरिक असलेले जितेश प्रभाकर हे मुळचे म्हैसूरचे आहेत. त्यांची जर्मन पत्नी, सास्किया नॉफ आणि आदित्य या मुलासह ते महाकुंभ मध्ये आले आहेत. यानिमित्त प्रयागराज मध्ये पुढचे काही दिवस राहून ते आखाड्यामध्ये होत असलेल्या होम, हवन आणि कथांमध्ये सहभागी होणार आहेत. परदेशात स्थायिक झालेल्या आणि आता महाकुंभसाठी भारतात परत आलेल्या भाविकांना आता नवे प्रयागराज दिसत आहे. भारतातील हा बदल खूप मोठा असल्याचे त्यांचे मत आहे. एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आवश्यक तेवढ्या सुविधा देणे हे कठिण काम असते, पण उत्तरप्रदेश प्रशासनानं हे काम चोखपणे केल्याचे प्रशस्तीपत्रक ही मंडळी देत आहेत. (Social News)
===============
हे देखील वाचा : America : एकीकडे शपथविधी तर एकीकडे जळत असलेल्या लॉस एंजेलिसची छाया !
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
या सर्व भाविकांच्या सुरक्षतेसाठी रॅपिड अॅक्शन फोर्स, पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल तैनात आहेत. प्रयागराजच्या बाहेरुन रोज लाखो गाड्या येत असून या गाड्या पार्किंगसाठीही ऑनलाईन व्यवस्था आहे. प्रवासी आधीच आपल्या वाहनाची जागा राखीव ठेऊ शकत आहेत. या सर्व सुविधांमुळे करोडो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत असले तरी त्यांची गैरसोय होत नाही. या पार्किंग स्थानापासून महाकुंभ स्थळापर्यंत काही अंतरावर बस आणि रिक्षाची सोय आहे. अन्य अंतर भाविकांना पायी पार पाडावे लागत आहे. या सर्व मार्गावर मार्गदर्शक सूचना लिहिल्या असून भाविकांच्या आरामासाठी तंबूंची आणि त्यांच्या आहाराचीही व्यवस्था कऱण्यात आली आहे. (Maha Kumbh)
सई बने